‘‘माषपर्णी रसे तिक्ता वृष्या दाहज्वरापहा।

शुक्रवृद्धिकरी बल्या शीतला पुष्टिवर्धिनी॥’’ (रा. नि.)

समस्त भारतीयांच्या आहारात उडदाच्या डाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिंबी वर्गातील उडदाचे तीन प्रकार बघावयास मिळतात. काळे, हिरवे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उडदाखेरीज उडदी नावाची एक छोटी उडदाची जात अनेकांच्या वापरात आहे. आषाढ महिन्यात ज्वारी, बाजरी, तूर अशांची विविध शेतात पेरणी केली जाते, त्याचबरोबर एक जोडपीक म्हणून उडदाची लागवड आग्रहाने केली जाते. त्याची कापणी अश्विन किंवा कार्तिक महिन्यात होते. ‘तीन पखिया’ प्रकारचा उडीद फक्त दीड महिन्यात तयार होतो, पण त्यात विशेष गुण नसतात. प्राचीन काळापासून काळे उडीदच सर्वश्रेष्ठ समजले जातात. आग्रहाने मांसाहार करणारी मंडळी विविध प्रकारच्या प्राण्यांना मांसालाच फक्त पुष्टीदायक असे समजतात, पण शाकाहारी मंडळींसाठी उडीद अत्यंत पुष्टीदायक आहे. जी मंडळी अत्यंत कृश आहेत, खूप खूप टॉनिके घेऊनही शरीरात मांस किंवा मेद धातूंची निर्मिती होत नाही, त्यांनी आपल्या आहारात उडदाची डाळ, उडदाची चटणी, उडदाचे लाडू अशांची अवश्य योजना करावी. ज्यांनी आपली लैंगिक ताकद गमावलेली आहे, त्यांनी आपल्या आहारात उडीद डाळ अवश्य ठेवावी आणि त्याचे चांगले पचन व्हावे म्हणून दशमूलारिष्ट किंवा पिप्पलादि काढा भोजनोत्तर घ्यावा.

उडदाच्या शुक्र व ओजवर्धक गुणामुळेच त्याला वृषांकुर, मांसल, धान्यवीर अशी सार्थ संस्कृत नावे आहेत. आयुर्वेदीय शास्त्रकारांनी जीवनीय गणांतील दहा वनस्पतींमध्ये उडदाला मोठे स्थान दिले आहे. उडीद जरी समस्त भारतात सर्वत्र होत असला तरी ज्या प्रदेशात तुलनेने कमी पाऊस पडतो, पण शेतातील माती किंचित गोडसर चवीची आहे, तेथील उडदाचे पीक मोठय़ा प्रमाणावर येते. आपल्या देशात तुलनेने कडधान्ये कमी प्रमाणात होतात. तूर वगैरे डाळी परदेशातून मोठय़ा प्रमाणावर येतात, पण उडीद मात्र  खूप मोठय़ा प्रमाणावर स्वदेशातच उपलब्ध होतात. या सबंध उडदाचा वरचा रंग हिरवा असला तरी आतील डाळ सफेद रंगाची असते. मात्र काळ्या रंगाच्या उडदाची डाळ आतून काळीच असते. काळ्या उडदाची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस, पण हिरव्या उडदाची लागवड अश्विन महिन्यात केली जाते. चांगल्या उडदाच्या वाढीस किमान तीन  महिने तरी जावे लागतात. मानवी जीवनात अनेकानेक कडधान्यांना मोठेच स्थान आहे. निघंटुकारांनी  ‘स्वादु विपाके मधुरोथ सांद्र: सन्तर्पण स्तन्य रुचिप्रदश्च॥’ (निघण्टु) असे वर्णन केले आहे. ज्यांचा अग्नि अत्यंत मंद आहे. त्यांनी उडदाची डाळ जरूर टाळावी. उडदाच्या डाळीचे सेवन करताना आले, लसूण, हिंग, पुदिना अशांचा चटणी स्वरूपात वापर करावा. हाडे किंवा सांधेदुखी विकारात उडदाच्या डाळीचे गरम गरम पोटीससंबंधित अवयवावर बांधावे. तुम्हा-आम्हाला हवेहवेसे वाटणारे डोसे, इडली- सांबार अशा पदार्थात उडदाचा आग्रहाने समावेश केला जातो हे सांगावयास नकोच.