18 October 2018

News Flash

पिंपळपान : निवडुंग

वई निवडुंग किंवा चौधारी निवडुंग आणि सेहुंड किंवा त्रिधारी निवडुंग यांच्या कांडय़ांमध्ये खूप चीक असतो.

सुधा भिन्नती दोषाणाम्।

निवडुंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या जातीमध्ये त्रिधारी, चौधारी आणि फण्या निवडुंग यांना खूप मोठे महत्त्व आहे. त्रिधारी किंवा चौधारी निवडुंग एककाळ लहानमोठय़ा शहरांच्या बाहेर ओसाड डोंगरात मोठय़ा प्रमाणावर असे. फण्या निवडुंगाची लहान लहान झुडपे आता बघावयासही मिळत नाहीत, इतकी ही वनस्पती अतिदुर्मीळ झालेली आहे. ‘स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी सिंहगर्जना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी बरोबर १०० वर्षांपूर्वी केली. त्या काळात पुणे व महाराष्ट्रातील अनेक गावे प्लेगग्रस्त होती. स्वाभाविकपणे या शहरातून बहुसंख्य जनता ग्रामीण भागात राहावयास गेली. त्या वेळेस लोकमान्य टिळकांसकट अनेक मंडळींनी रानोमाळ असणाऱ्या फण्या निवडुंगाची लालचुटूक फळे खाऊन गुजराण केल्याच्या कथा मराठी साहित्यात आहेत.

महर्षि अण्णासाहेब पटवर्धनांचे चरित्रात फण्या निवडुंग या वनस्पतीपासूनच्या पिकलेल्या फळाचे तयार केलेल्या काढय़ाचे गुणधर्म आणि प्रत्यक्ष फायदा मुळातून वाचण्यासारखा आहे. हे गुणधर्म वाचल्यामुळे मी व माझे गुरुजी वैद्य बा. न. पराडकर यांनी पुण्याजवळील विविध छोटय़ा टेकडय़ांतून असणाऱ्या फण्या निवडुंगाच्या जाळ्यांना भेट देऊन पिकली लाल, लाल फळे प्रत्यक्ष गोळा करायचे ठरविले. त्या काळात आमच्याकडे एक अतिहौशी वैदू अण्णा शिंदे येत असे. फण्या निवडुंगाची बोंडे खूप गोड आणि अतिचविष्ट असतात, पण त्यावर अत्यंत सूक्ष्म अशी काटेरी लव असते. त्यामुळे त्यांच्या स्पर्शाने आपल्या त्वचेला अतिशय असह्य़ खाज सुटते. त्यामुळे फण्या निवडुंगाची बोंडे काढताना आपल्या हातात खांद्यापर्यंत सुरक्षितता म्हणून ग्लोव्हज्सारखे कपडे वापरणे अत्यंत आवश्यक असते. ही फळे खूप रसाळ, गोमटी असून त्यांच्यापासून आम्ही नवजीवन नावाचे गोड औषध लहान बालकांच्या हट्टी कफ आणि खोकल्याकरिता आवर्जून वापरतो.

वई निवडुंग किंवा चौधारी निवडुंग आणि सेहुंड किंवा त्रिधारी निवडुंग यांच्या कांडय़ांमध्ये खूप चीक असतो. वनस्पतीशास्त्राप्रमाणे दोन्ही प्रजाती भिन्न प्रकारच्या आहेत. अनेकांना बऱ्याच वेळा तीव्र पोटदुखी, फुप्फुसातील हट्टी कफामुळे होणारा खोकला, दमा, दीर्घकाळाचा ताप आणि अनेक कफप्रधान रक्तविकारांचा सामना करावा लागतो. त्याकरिता सुरुवातीच्याच श्लोकात सांगितल्याप्रमाणे निवडुंगाच्या चिकाचा वापर माझ्या लहानपणी अनेकानेक वैद्य करत असत. एका मोठय़ा बत्ताशावर निवडुंगाचा चीक पाच ते सात थेंब टाकून, तो बत्तासा खाल्ल्याबरोबर दहा-पाच मिनिटांत पोटदुखी थांबल्याचा अनुभव मी स्वत: घेतलेला आहे. रानोमाळ असणाऱ्या निवडुंगाच्या फांद्यांना धारदार सुरीने छेद घ्यावा. तात्काळ चिकाची धार वाहणे सुरू होते. असा ताजा चीक गोळा करावा आणि प्रवाळ पंचामृत या पोटदुखीवरील औषधाकरिता भावनाद्रव्य म्हणून अवश्य वापरावा. आपल्याला निवडुंगाचे काटे जरूर टोचतात, पण त्यांच्या कांडातील चीक अमृताप्रमाणे गुण देतो, हे विसरून चालणार नाही. पुण्यात बुधवार पेठेत निवडुंग्या विठोबाचे मंदिर आहे, किती जणांना माहीत आहे?

First Published on December 7, 2017 12:51 am

Web Title: article on cactus