X

पिंपळपान : जिरे

इराणमधूनही जिऱ्याची मोठी आयात केली जाते.

‘‘जीरकं कटुकं रूक्षं वातहवद्दीपनं परम्।

गुल्माघ्मानातिसारघ्नं ग्रहणीकृमिहवत् परम्।।’’

तुमच्या आमच्या सर्वाच्याच स्वयंपाकघरात जिऱ्याला एक अढळस्थान आहे. जिरे आपल्या मसाल्यामध्ये असल्याशिवाय स्वयंपाकाला रुची येत नाही. जिऱ्याची लागवड प्रामुख्याने गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशातील रतलाम व जबलपूरमध्ये मोठय़ा प्रमाणात होते. इराणमधूनही जिऱ्याची मोठी आयात केली जाते. जिऱ्याची रुची कडू व किंचित गरम असते. त्याला एक विशेष सुगंध असतो. जिऱ्यात चार टक्के सुवासिक तेल आहे. या तेलामुळे जिरे आपल्या पचनांसंबंधीच्या अनेक विकारांत भूक वाढवून व सत्वर पचन करून लहान व मोठय़ा आतडय़ातील तुंबलेला वायू तात्काळ मोकळा करते.

सुमारे ३५ वर्षांपूर्वी मला मानणारे एक रुग्णमित्र आले. त्यांनी एका व्यक्तीची ओळख करून दिली. या व्यक्तीने आपल्या शीघ्रपतन या विकाराच्या उपचारासाठी मुंबईतील अनेक डॉक्टर, वैद्यांचे उंबरठे झिजवले. मात्र हा विकार बरा झाला नाही. त्यामुळे त्याला बरे करावे, असे या रुग्णमित्राने सांगितले. मी त्याचे पोट तपासले आणि त्याला पुणे येथील माझ्या पंचकर्म रुग्णालयात प्रवेशित व्हावयास सांगितले. पुण्यात आल्यावर त्याला मी दिवसातून दोन वेळा जिरे चूर्ण कोमट पाण्याबरोबर दिले. त्याचा शीघ्रपतन हा विकार त्याला दिवसातून अनेक वेळा होत असे. मात्र माझ्या औषधाने त्याचे शीघ्रपतन खूपच कमी झाले. वर्षांनुवर्षे ज्यांना अंगावर पांढरे जाणे, धुपणी वा श्वेतप्रदन असा त्रास होतो अशा मायभगिनींना मी नेहमी ठेचलेल्या जिऱ्याचे पाण्यात भिजवलेले चूर्ण घ्यावयास सांगतो. त्यांचा हा त्रास बहुधा दोन आठवडय़ांत कमी होतो.

हा रुग्ण मुंबईत ज्या डॉक्टर, वैद्यांकडे गेला, ते सर्व या रुग्णाला शुक्रधातू बलवान होण्यासाठी शिलाजीत, रौप्य, सुवर्ण, ताम्र अशी टॉनिक औषधे देत. माझ्या रुग्णालयात त्या रुग्णाला लागोपाठ तीन दिवस मात्रा बस्ति-तेलाची पिचकारी व दशमुळांच्या काढय़ाचा एनिमा- निरूहबस्ति दिला. त्यानंतर त्याला जिरकाधारिष्ट भोजनोत्तर दोन वेळा घ्यावयास सांगितले. त्याला पुन्हा कधीही शीघ्रपतनाचा त्रास झाला नाही. लघवीला जोर नसणे, कष्टाने होणे, गरमीपरमा या विकारांत जिरेचूर्ण पिठीसाखरेबरोबर द्यावे. कफवातप्रधान मूळव्याधीमध्ये मोड खूप वाढले असल्यास थंड पाण्यात जिरे वाटून त्याचा मोडावर दाट लेप करावा.

पोटात जिरेचूर्ण द्यावे. उन्हाळय़ामध्ये खूप पाणी पिऊन जेव्हा अरुची या विकाराचा त्रास होतो, अन्न नकोसे होते, त्यावेळेस जिरेचूर्ण किंवा जिरकाद्यारिष्ट आठवणीने घ्यावे. किडा-मुंगी चावल्यास वा विंचूदंशात जिरेचूर्णाचा तुपास मिसळून लेप लावावा, तात्काळ गुण येतो. आपल्या नेहमीच्या वापरातील स्वयंपाकातील जिरे, शहाजिरे व कडूजिऱ्यापासून खूप भिन्न आहे. बाजारात मिळणारे शहाजिरे बहुधा बनावट असते. कडूजिरे पूर्णपणे स्वतंत्र वनस्पती आहे. ज्यांना नेहमी अजीर्ण, अपचन, अरुची, उदरवात या लक्षणांचा सामना करावा लागतो, ती मंडळी आपणहून हिंगाष्कचूर्ण घेतात. माझ्याकडे येणाऱ्या अशा रुग्णांना मी पाचक चूर्ण देत असतो. जीर्ण अपचन विकारासाठी काही काळ जिरकाद्यारिष्ट दोन्ही जेवणानंतर घेण्याचा सल्ला देतो.

Outbrain