आसपासच्या मोठय़ा रस्त्यावर कधीपायी हिंडत असाल तर दुतर्फा अनेकानेक लहानमोठे वृक्ष तुमचे मोठय़ा प्रसन्नपणे स्वागत करताना दिसतात. त्यात थोर ऋ षींसारखा तपस्वी वटवृक्ष खूप खूप मोठय़ा चिवट पारंब्यांनी ‘वृक्षाणां अश्वत्थोऽहम्’  असा दिलासा देत; मी पाठीशी आहे, ‘चालेल तो वाचेल’ असा संदेश देत असतो. भरपूर पिवळ्या फुलांनी बहरलेला शिरीषवृक्ष तुमचे मन मोहीत करत असतो. आंबा, जांभूळ अशा वृक्षांच्या पानांची, वाऱ्यामुळे होणारी सळसळ तुम्हाला तरुणाईची साथ देत असते. अशावेळेस एक पान आपल्यासमोर येऊन पडते, ते असते फिक्कट, पांढरट, किंचित तपकिरी रंगाचे, पिंपळपान! खूप धावपळीच्या जीवनात एखादी घटना अशी घडते की आपले संपूर्ण जीवनच बदलून टाकते.एरवी ‘रुटीन’ वाटणारे जीवन तुम्हाला अशी संधी देते की आपले भावी आयुष्य आपण नव्या हिमतीने घडवू शकतो. एकेकाळी ग्रामीण जीवनात एखादा गावकरी खोटेपणा करून तो पुन्हा नाकारण्याचा खोटा उद्योग करत असला तर त्याला गावातील पुरातन पिंपळाच्या वृक्षाखाली नेऊन ‘आता तू खरे ते सांग!’ असे सुनावले जात असे. बहुधा तो मग सत्यच बोलत असे. ‘ऋ तं वच्मि। सत्यं वच्मि।’ ‘पिंपळवृक्षाला सहस्र वंदना करून या वृक्ष आख्यानाला सुरुवात करूया!’

अर्जुन

अर्जुनस्य त्वचा सिद्धं क्षीरं योज्यं हृदामये।

(चक्रधर हृद्रोग चि/ १०)

मानवी जीवन दिवसेंदिवस खूप ‘फास्ट’ होत चालले आहे. शहरवासीय, श्रीमंत-गरीब, तसेच ग्रामीण भागातील शेतकरी, कामकरी सर्वजण विलक्षण स्पर्धेत आहेत. त्यामुळे खडीवाल्यांसकट बहुतेक मंडळींना केव्हान्केव्हा, धाप, छातीवर दाब येणे, छातीत डाव्या बाजूला ठरावीक ठिकाणी दुखणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. विशेषत: चाळिशीनंतर असा त्रास झाला की काही आयुर्वेदप्रेमी रुग्ण मित्रमंडळी, तडक वैद्यांकडे जातात. अशावेळी सर्वाना ‘अर्जुनाची’ हटकून आठवण येते. अर्जुनाला विविध नावांनी संबोधले जाते. देवसाल, शक्रतरू, इन्द्रू, नदीसर्ज, अर्जुनाव्हय, ककुभ, क्षीरस्वामी, सेव्य, सर्पण, धूर्तपाद्य, धनंजय, पार्थ, धाराफल, अर्जुनसादडा. आपल्या प्राचीन ग्रंथातील वनस्पतींच्या विविध नावांमुळे त्यांची नामनिश्चिती, गुणकर्म व औषधीप्रयोग यांची माहिती व्हायला मदत होते. अर्जुनाचे झाड वयात आले की एखाद्या ऋषिमुनीसारखी दधीची ऋ षींसारखी, त्याची साल आपोआप गळून पडते. मानवाच्या आरोग्यासाठी ती देवासारखी उपयोगी पडते म्हणून त्या झाडाला देवसाल, शक्रतरू, इन्द्रू अशी इंद्राची नावे आहेत. नदीकाठी याची चांगली वाढ होते म्हणून याला नदीसर्ज असे अन्वर्थक नाव आहे. ‘श्री रामरक्षा स्तोत्र अर्जुनं सुखसंपदाम्।’ असे वचन आहे. ‘जो मिळविला जातो’ असाही अर्जुनाचा अर्थ निघतो. याशिवाय शब्दाचा यौगिक अर्थ श्वेत, स्वच्छ, धवल असा आहे. पाच पांडवांतील अर्जुनाशी या वृक्षाचा काहीच संबंध नाही, तरीपण काही ग्रंथकारांनी अर्जुन शब्दावरून अर्जुनाला पार्थ असे पर्यायी नाव वापरले आहे. धनंजय म्हणजे ज्याच्या वापराने धनलाभ होतो तो धनंजय. अनेक वृक्षांपासून चीक मिळतो. पण याचा गोंद, चीक हा सुंदर, पारदर्शक, स्वच्छ, बल्य व पौष्टिक आहे. त्यामुळे अर्जुनाला क्षीरस्वामी असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. ज्याचा पसारा आकाशासारखा विशाल आहे, त्यामुळे ककुभ ‘दिग्व्यापकत्वात्’ असे सार्थ नाव आहे. ज्याचे बुद्धिपुरस्सर सेवन केले जाते, त्याला सेव्य असे नाव मिळाले. अर्जुन वृक्षाकडे बघण्याचा विविध प्रकारचा दृष्टिकोन भरपूर पर्यायी नावांनी लक्षात येतो. अर्जुनाची साल बाहेरून पांढरी दिसते, म्हणून धवल; विस्ताराने खूप मोठा म्हणून इन्द्रद्रू; काण्ड दृढ म्हणून वीरवृक्ष; राळ-सर्जवृक्षासारखा आणि नदीकाठी चांगला रुजतो म्हणून नदीसर्ज नाव पडले असावे, असे काहींचे मत आहे.

अर्जुन व लाल रंग ऐन हे दोन्ही एकाच वर्गातील वृक्ष आहेत. अर्जुन साल पांढरट, किंचित लालसर वर्णाची असते. अर्जुनाच्या सालीचा चटकन तुकडा पडतो. त्यात तंतुमय रेषा नसतात. त्यामुळे त्याचे चूर्ण एकदम गुळगुळीत शंखजिरे चूर्णासारखे असते. अर्जुन वृक्ष ६० ते ८० फूट उंच असणारे तपस्वी ऋ षींसारखे उभे असतात. मध्य प्रदेशात अर्जुन वृक्ष हा संरक्षित वृक्ष म्हणून वनखात्याच्या अनुज्ञेविना तोडता येत नाही. विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अर्जुनाचे वृक्ष खूप मोठय़ा प्रमाणावर आहेत. अर्जुनाला पंख्यासारखी छोटी फळे वा बिया असतात. त्या रुजवून त्यांची रोपे सहज करता येतात. अर्जुनाची झाडे नदी, ओढे यांच्या काठावर उतारावर लावावी. त्यामुळे अधिक चांगली रुजतात. अर्जुनाची सालच प्रामुख्याने औषधी प्रयोगाकरिता वापरली जाते. वजनाने हलकी असते, अशी ही साल तुरट रसामुळे घट्ट बनलेली असते. अर्जुनाचा डिंकही पौष्टिक, हृदयाला बल देणारा आहे.