17 October 2019

News Flash

औषधे घ्यावीत नेटकी..

मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार अनेकदा एकत्रितरीत्या आढळतात.

(संग्रहित छायाचित्र)

चांगल्या औषधांचे वाईट परिणाम

एकाच वेळी अनेक आजारांवर औषधे घेण्याची वेळ येते तेव्हा जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. विशेषत: वृद्धांना ही समस्या जाणवते आणि त्याचे दुष्परिणामही सहन करावे लागतात. हे दुष्परिणाम कमीत कमी करण्यासाठी आणि उपचारांचा प्रभाव वाढवण्यासाठी नेमके काय करावे, हे सांगणारा लेख..

मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार अनेकदा एकत्रितरीत्या आढळतात. या आजारांवरील औषधे देताना डॉक्टरांना सावधगिरी बाळगावी लागते. औषधांचे दुष्परिणाम, औषधा-औषधांमधील प्रक्रिया, औषधे व आजारांमधील प्रक्रिया आणि औषधांच्या डोसांचे प्रमाण या सर्व बाबी लक्षात घेऊन औषधे देणे गरजेचे असते, तरीही आजमितीला योग्य औषधे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात आणि त्याचा सर्वाधिक फटका वृद्धांना बसतो. रुग्णाला एवढी औषधे देण्याची खरंच गरज आहे का, असा प्रश्न डॉक्टरांनी स्वत:ला विचारला तर अनेक वृद्धांची काही औषधे कमी होऊ शकतात.

अनेक औषधे घ्यायची असल्याने काही वेळा नेमकी कोणती औषधे केव्हा, किती प्रमाणात घ्यायची त्याबाबत गोंधळ होतो. काही वेळा रुग्ण घेत असलेल्या इतर औषधांविषयी माहिती नसल्याने डॉक्टरांकडून औषधे लिहिताना त्रुटी राहू शकतात. दोन वेगवेगळे डॉक्टर वेगळ्या कंपनीची मात्र एकाच प्रकारचे औषध लिहून देऊ शकतात आणि त्यामुळे रुग्णाला अधिक औषधे घ्यावी लागतात.

त्याचप्रमाणे औषधा-औषधांमधील परिणामही महत्त्वाचा असतो. काही वेळा दुसरे औषधे आधीच्या औषधांच्या उपचारांवर परिणाम करते. उदा. कॅल्शिअम आणि लोहाच्या गोळ्या एकत्र दिल्या जात नाहीत. औषधांचा इतर आजारांवरही परिणाम होतो. उदा. वेदनाशामक गोळ्या घेतल्याने रक्तदाब वाढतो आणि मूत्रपिडांची कार्यक्षमता घटते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना ही औषधे दिली जात नाहीत.

बहुऔषधे पद्धती म्हणजे काय?

एकाच वेळी पाचपेक्षा अधिक औषधे घेण्याच्या पद्धतीला बहुऔषधे पद्धती (पॉलीफार्मसी) म्हटले जाते. दहापेक्षा अधिक औषधे घेणे हे जास्त जोखमीचे असते. वेगवेगळ्या आजारांवरची औषधे घेणाऱ्या रुग्णांमध्ये हे सर्रास आढळते. स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडांची ठिसूळता असे आजार त्याचप्रमाणे वेदना, झोप कमी होणे, दीर्घकाळ चालणारे उपचार, वयासोबत दिसणारी लक्षणे अशा अनेक कारणांमुळे औषधांची संख्या वाढते आणि त्यामुळे ४० टक्क्यांहून जास्त वृद्धांमध्ये अनेक औषधे देण्याची वेळ येते बहुऔषधे अनेकदा गरजेची असतात, मात्र त्यांचा वापर नीट केला नाही तर उपयोगितेपेक्षा ती दुरुपयोगी ठरण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांना दिलेली औषधे आणि त्याचे परिणाम यावर सातत्याने लक्ष ठेवावे लागते.

बहुऔषधांमुळे रुग्णांना कोणते परिणाम सहन करावे लागतात?

बहुऔषधांमुळे औषधांचे दुष्परिणाम, औषधाला प्रतिरोध आणि जास्त खर्च असे अनेक परिणाम होतात. त्याचप्रमाणे मानसिक गोंधळ, स्मरणशक्तीवर तात्पुरता परिणाम व त्यातून रुग्णाच्या हालचालीवरही बंधने येतात.

फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन (एफडीसी) म्हणजे काय?

दोन किंवा त्यापेक्षा अधिक औषधे एकाच कॅप्सूलमधूनही दिली जातात. मात्र अशा प्रकारच्या औषधांबाबतही डॉक्टर फारसे समाधानी नाहीत. अशा औषधांमधून गरज नसलेल्या रुग्णांनाही तेवढय़ाच प्रमाणात इतर डोस मिळतात आणि त्यामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना अधिक त्रास होतो.

अयोग्य औषध कशाला म्हणतात?

बहुऔषधे देताना अयोग्य औषधे देण्याचे प्रकार घडू शकतात. ज्या औषधांच्या गुणांपेक्षा दुष्परिणाम अधिक होतात आणि ज्यांना अधिक चांगले पर्याय उपलब्ध आहेत, अशा औषधांना अयोग्य औषधे म्हटले जाते. त्याचप्रमाणे उपचारांच्या निकालानुसारही औषधांची योग्यायोग्यता ठरते. उदाहरणच द्यायचे झाले तर पित्ताचा (अ‍ॅसिडिटी) त्रास असलेल्या रुग्णांना तोंडावाटे वेदनाशामक गोळ्या देऊ नयेत.

औषधांची संख्या कशी कमी करता येईल?

दीर्घकाळ उपचार सुरू असताना काही विशिष्ट परिणामांसाठी देण्यात येणारी औषधे काही काळानंतर थांबवता येतात. अर्थात रुग्णांची स्थिती, औषधाचे फायदे आणि जोखीम यावर डॉक्टर त्याबाबत निर्णय घेऊ शकतात. उदा. बायपास शस्त्रक्रियेनंतर रक्त पातळ करण्यासाठी दिले जाणारे औषध इतर कोणत्याही मोठय़ा शस्त्रक्रियेपूर्वी थांबवले जाते. डॉक्टर व रुग्ण या दोघांनीही बहुऔषधांबाबत एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. रुग्णाला औषधे घेणे त्रासदासक किंवा चिंताजनक वाटते आहे का? रुग्ण स्वत: औषधे घेतो की इतर (कुटुंबातील सदस्य, केअरटेकर) कोणी औषधे घेण्यास मदत करते? रुग्ण स्वतच्या औषधांचा पुरेसा आणि सुरक्षित ठिकाणी साठा करतात का? डॉक्टर साधारण किती कालावधीनंतर औषधांचा पुन्हा आढावा घेतात? रुग्णांना सर्व औषधांचा खर्च परवडणारा आहे का? रु ग्ण सर्व सूचना तंतोतंत पाळतो आहे का? औषधाच्या दुकानदाराकडून औषधांमध्ये काही बदल केले जात आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली की औषधांचे प्रमाण कमी करता येईल आणि त्यामुळे होणारे दुष्परिणामही थांबवता येतील.

औषधांची साखळी

काही वेळा बहुऔषधांमुळे दिसत असलेल्या परिणामांना नव्या आजाराची लक्षणे म्हणून पाहण्याची गफलत होते. त्यामुळे मग ही नवी लक्षणे कमी करण्यासाठी आणखी औषधे दिली जातात. त्यातून नव्या औषधांची वाढणारी साखळी सुरू होते. रक्तदाब कमी असल्याने औषधे घेत असलेल्या रुग्णांचे गुडघे सुजतात. त्यामुळे डॉक्टर लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे देतात. त्यामुळे शरीरात पोटॅशिअमची कमतरता होते. त्यामुळे मळमळ वाढते. त्यावर उपचार करण्यासाठी उलटी थांबवण्याच्या गोळ्या दिल्या जातात आणि त्याने मानसिक गोंधळ वाढतो. परिणामी अधिक गोळ्या दिल्या जातात.

– डॉ. रेखा भातखंडे,

gastro111@gmail.com

First Published on August 14, 2018 3:45 am

Web Title: bad consequences of good medicines