‘सीताफलं गण्डगात्रं कृष्णबीजं तथव च।’

द्र. गु. वि/७२

आपण फळांच्या हंगामाप्रमाणे आंबा, फणस, चिकू, अंजीर, संत्रे, मोसंबी, पपई अशा फळांचा रसास्वाद घेत असतो. पण तुलनेले सीताफळाचा आस्वाद फार क्वचित घेतो. कारणे दोन महत्त्वाची आहेत. सीताफळाच्या बियांभोवतालचा गर खायला छान वाटतो, परंतु बिया चघळून थंकण्याचा स्वाभाविकपणे कंटाळा येतो, तसेच ताजे आणि खूप गोड चवीचे सीताफळ नेहमी मिळतेच असे नाही. गन्धगात्र (संस्कृत), शरिफा (हिंदी), अता काताल (असामी), अता लेमा (बंगाली), मौदरगोम (संताळ) अशा विविध नावांनी ओळखले जाणारे सीताफळ नुसतेच रुचकर आहे असे नसून आपले शारीरिक वजन वाढवायला सीताफळाची मोठी मदत होते.

सीताफळ एकाच वेळेस आपल्याला खाण्यात तृप्ती वाढवते, वजन वाढवायला मदत करते, शरीरातील उष्णता वाढवून वाताचे अनुलोमन करते. सीताफळाच्या बिया शिकेकाईबरोबर कुटून त्याचे मिश्रण केस धुण्याकरिता वापरले तर केसातील उवा, लिखा, खवडे महिनाभरात नाहीसे होतात. मात्र या बियांचे पाणी डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

सीताफळाची मूळ जन्मभूमी वेस्ट इंडिजमधील बेटे आहेत, असे वनस्पती शास्त्रज्ञ सांगतात. सीताफळात जवळपास ६५ टक्के आद्र्रता-ओलावा आणि ६० टक्के साखर असते. बियांमध्ये एक विशेष प्रकारचे तेल आणि राळ असते. त्यामुळेच बियांवरचा गर आणि बिया दोघांचेही योगदान मोठे आहे. ज्यांना हिस्टीरियासारख्या रोगांमुळे अचानक मूच्र्छा येते, त्यांनी सीातफळाच्या पानांच्या रसाचे नियमित काही काळ नस्य करावे. हट्टी जखमेवर पू झाला असल्यास पानांचे वाटून पोटीस करावे आणि जखमेवर बांधावे.

पूर्वी ग्रामीण भागात अकाली गर्भपात करण्यासाठी सीताफळाच्या बियांचा वाटून केलेला लेप योनीबाहेरील बाजूस लावून मासिक धर्म येण्यासाठी उपयोग केला जात असे. आपल्या समाजात दिवसेंदिवस लहान-मोठय़ा शहरात खवय्यांची संख्या वाढत आहे. नेहमीची पक्वान्ने, श्रीखंड, जिलेबी, बुंदीचे लाडू खाऊन कंटाळा आला असेल तर ‘सीताफळ रबडी’ हा पदार्थ आवश्यक खाऊन बघा. मात्र त्यानंतर दोन तास पाणी पिऊ नये. दुर्मीळ रामफळाचे गुण सीताफळासारखे आहेत.