डॉ. अभिजीत जोशी
एखाद्या दिवशी अचानक आपले खूप आवडते कपडे आपल्याला बसत नसल्याचं आपल्या लक्षात येतं आणि जाडी वाढत चालल्याचा ‘अलार्म’ पावलोपावली डोक्यात वाजू लागतो. काहींच्या बाबतीत कधीतरी ‘रुटीन चेकअप’मध्ये रक्तातली साखर वाढल्याचे दिसते किंवा असह्य़ पाठ आणि कंबरदुखी उपटते आणि लोक हवालदिल होतात. असं काहीही घडलं की ‘आता व्यायाम सुरू करायलाच हवा,’ ही जाणीव होते. मग डॉक्टरांना गाठून काटेकोर ‘डाएट’ आखले जाते, कमीत कमी श्रमात अधिकाधिक व्यायाम कसा होईल याचीही चर्चा होते आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण जीवनशैली आरोग्यदायी करायचीच असा संकल्प होतो. पण..

दररोज व्यायाम करण्याचा अनेकांचा संकल्प बहुधा पहिल्याच दिवशी मोडतो! सकाळी उशिरा उठल्यामुळे किंवा कार्यालयात जायची घाई यामुळे व्यायामाला वेळच झाला नाही, उद्यापासून व्यायाम नक्की सुरू करू, असे ठरवले जाते. पण तो दिवस येतच नाही. काही दिवसांनी पुन्हा आपल्या आरोग्याच्या तक्रारींची जाणीव झाल्यावर व्यायामाची आठवण होते आणि स्वत:शीच ओशाळे व्हायला होते. मग कारणे शोधायला सुरुवात होते. घरात किंवा कार्यालयात मला फार काम असते, सकाळी घाई होते आणि संख्याकाळी दिवसभराच्या कामाचा थकवा असल्यामुळे मला व्यायाम जमत नाही. कारणांची यादी संपत नाही आणि व्यायामाला मुहूर्तही सापडत नाही! खरे तर व्यायाम आपल्या मनात असतो. मनातला आळशीपणा काढून टाकला तरच नियमित व्यायाम होऊ शकतो.
हा आळशीपणा काढून टाकण्याच्या प्रक्रियेत आपल्या रोजच्या जीवनात काही छोटे बदल करून दैनंदिन कामांमध्येच थोडा थोडा व्यायाम सुरू करता येईल. अर्थात असा व्यायाम हा खऱ्या व्यायामाला पर्याय नक्कीच नव्हे. जसे आपण रोज जेवण्यासाठी वेळ देतो तसा व्यायामासाठी द्यायलाच हवा. आठवडय़ाला १५० मिनिटांचा ‘मॉडरेट’ व्यायाम निरोगी आरोग्यासाठी गरजेचा असतो. हा व्यायाम करताना हृदयाचे ठोके इतर वेळीपेक्षा दुप्पट होतात. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास जीवनशैलीतल्या काही बदलांच्या आधारे करता येईल.

काय कराल?
घराजवळच काही काम असेल किंवा तुमच्या कामाचे कार्यालय चालत जाण्याच्या टप्प्यात असेल तर आवर्जून चालत जा किंवा सायकल वापरा.
अनेक जण कार्यालयात अगदी पहिल्या वा दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठीही लिफ्ट वापरतात. हे टाळून जेवढे शक्य असेल तेवढे जिने चढून जा.
कार्यालय घराजवळ नसेल तर आठवडय़ातील एक किंवा दोन दिवस ‘इकोफ्रेंडली’ वाहतुकीसाठी ठरवा. या दिवशी कार्यालयात जाण्यासाठी गाडी वा रिक्षा न वापरता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. घरी परतताना एक वा दोन स्टॉप अलीकडेच उतरा आणि चालत घरी या. संध्याकाळी कामाचा थकवा येतो हे मान्य, पण आपल्या आठवडा सुट्टीच्या आदल्या दिवशी असे केल्यास ते जमू शकेल.
रविवारची सुट्टी घरात बसून घालवण्यापेक्षा बाहेर पायी फिरणे, लहान मुलांबरोबर बागेत खेळणे अशा शरीराला व्यायाम देणाऱ्या गोष्टीत घालवा.
मोठय़ा कंपन्यांच्या स्वत:च्या व्यायामशाळा असतात. अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी व्यायामाला वेळ होत नाही हे कारण देऊच नये!
कार्यालयीन कामाच्या मध्ये घेतल्या जाणाऱ्या छोटय़ा ‘ब्रेक’मध्ये काही मिनिटे का होईना, पण पायी फिरून या. या फिरण्यात मित्रांमधल्या गप्पाटप्पा टाळाव्यात.
कार्यालयातील आपल्या खोलीत केवळ अहवाल वाचण्यासारखी कामे करताना ‘स्टेशनरी बायसिकल’वर सायकल चालवत काम करणे शक्य आहे. अर्थातच हे सर्वाना शक्य नाही. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ते जरूर करावे.
व्यायामाची काही लहान उपकरणे कार्यालयात नेता येतील, वा घरीही सहज वापरता येतील. हाताने वाकवण्याची रबराची टय़ूब (थेरप्युटिक बँड), छातीच्या स्नायूंना व्यायाम देणारा ‘चेस्ट बेंडर’, हाताच्या व्यायामासाठी वापरले जाणारे ‘हँड ग्रिपर’ ही उपकरणे सहज हाताळण्याजोगी आहेत. अर्थात हे व्यायामही शिकून घ्यावे लागतात, शिवाय ते स्नायूंचे व्यायाम आहेत. तरीही एकूणच व्यायामाचा ‘मूड’ तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
dr.abhijit@gmail.com
(शब्दांकन-संपदा सोवनी)