11 December 2018

News Flash

पिंपळपान : बोर

१९६६च्या मार्च महिन्यात ‘तेजू’ या जवळपास निर्मनुष्य अशा केंद्रात गेलो.

‘कर्कन्धु कोलबदरमामं पित्त कफापहम्।

पक्वं पित्तानिलहरं स्निग्धंसमधुरंसरम्।

पुरातनं तृट्शमनं श्रमघ्नं दीपनं लघु।।’

सु. सू. अ. ३९

माझ्या ८४ वर्षांच्या आयुष्यातील सर्वात मंतरलेला काळ म्हणजे भारतीय विमान दलातील १७ वर्षांची चाकरी! १९६६ ते ६८ या दोन वर्षांच्या काळात अरुणाचल प्रदेशातील तेजू व मेघालयातील शिलाँग येथे मी दोन वष्रे अत्यंत आनंदाची अनुभवली. १९६६च्या मार्च महिन्यात ‘तेजू’ या जवळपास निर्मनुष्य अशा केंद्रात गेलो. त्या युनिटमध्ये आम्ही एकूण सात जणच होतो. त्या प्रदेशात पहाट सकाळी चार वाजताच होत असते. पहिल्याच दिवशी सकाळी उठल्याबरोबर बाहेर पडलो तर सर्वत्र विविध प्रकारच्या बोरांची छोटी झाडे होती. मी अधाशासारखी पाचपंचवीस बोरे खाल्ल्याचे मला अजूनही आठवते. दुपारी त्या युनिटमध्ये अगोदरपासूनच असलेल्यांना विचारले, ‘आणखी कोणती फळांची झाडे येथे आहेत?’ ते जवान खूप हसले. यातच सर्व काही आले. काही किलोमीटर परिसरात बोराशिवाय अन्य झाड नव्हते.

बदर (संस्कृत), बेर (हिंदी), कुल (पंजाबी), बोरडी, संजित (गुजराती), झुझुब (इंग्रजी), झुझुबीर (फ्रेंच) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या बोरांचे लहान कण्टकयुक्त वृक्ष असतात. पूर्वी मुंबई, पुण्यामध्ये संध्याकाळी रस्त्यांवर ‘चणिया-मणिया’ या नावाने सुकलेली पण खूप मजेदार चव असणारी छोटी बोरे हातगाडीवर विकली जात. सुकवलेल्या बोराच्या पिठास बेरचुनी म्हणतात. सुकी बोरे प्रामुख्याने तिबेट व चीनमधून येतात. औषधांकरिता आवर्जून चिनी बोरे वापरण्याचा प्रघात आहे. उन्नाब या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बोरामध्ये साखर असते. बोराच्या सालीत व पानात कषय द्रव्य असते. फळे मधुर चवीची, शरीर स्निग्ध करणारी आणि रुची आणणारी असतात. बोराच्या झाडाची साल श्रेष्ठ दर्जाची ग्राही, व्रणशोधक व व्रणरोपक आहे. बोराची पाने चावून खाल्ल्यास, कोयनेलसारख्या कडू व किळसवाण्या पदार्थाची रुची समजत नाही.

हट्टी हिवतापात अंगास शिथिलता आल्यास, जुलाब होत असल्यास बोराच्या सालीचा काढा घ्यावा. सालीच्या काढय़ाने जखम धुतल्यास ती लवकर भरून येते. सुक्या खोकल्यात बोर, साखर आणि गुलाब फुले यांच्या एकत्र मिश्रणाच्या गोळय़ा त्वरित गुण देतात. विविध लहानमोठय़ा किडे, मुंग्या यांच्या चाव्यावर बोराची पाने वाटून लेप लावावा. उत्तर हिंदुस्थानात बोरापासून केलेले सरबत ‘उन्नाव सरबत’ या नावाने विकले जाते. बोराच्या विविध लहानमोठय़ा आकारांपैकी मोठी बोरे काळजीपूर्वक बघून खावीत, कारण त्यात कीड लवकर होते.

First Published on November 9, 2017 12:35 am

Web Title: ber fruit