19 January 2019

News Flash

पथ्य अपथ्य! : हृदयरोग : आहारातील पथ्य

विविध प्रकारच्या आसवांचा अत्यंत गुणकारक उपयोग हदयरोगामध्ये दिसून येतो.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

ओल्या हळदीच्या आणि आल्याच्या एकत्रित लोणच्याचा खूप चांगला उपयोग हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी होतो. सध्या ओल्या हळदीचा खाण्यासाठी उपयोग कमी झाला आहे. परंतु ठरावीक ऋतूत मिळणारी ओळी हळद लोणच्याच्या स्वरूपाने साठवून ठेवता येते. जुने तांदूळ, त्यातही साळीचे लाल तांदूळ हृदयरोगी व्यक्तींनी सेवन करण्यास हरकत नाही. तांदळाबरोबरच शास्त्रकारांनी हृदयरोगात केवळ गहूच सांगितले असून इतर अपथ्यात वर्णन केलेल्या धान्यव्यतिरिक्त विशेष उल्लेख केलेला दिसून येत नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे. मूग आणि कुळथाचा हृदयरोगी व्यक्तींना विशेष गुण होताना दिसतो. कुळथाचे आणि मुगाचे आलेयुक्त काढण नियमित सेवन करण्यास हरकत नाही. चांगला फायदा होतो. काही विशिष्ट फळभाज्यांचा हृदयावर गुणकारक परिणाम होतो. त्यात पडवळ, तोंडली, दुधी भोपळा, वांगी व कोबीचा समावेश आहे. कच्चा कोबी किंवा वाफवलेली कोबी हृदयरोगी व्यक्तींनी नियमित सेवन करायला हरकत नाही. कांदा ही नियमित आहारात असावा, फायदा होतो. (आयुर्वेद शास्त्रकारांनी आज प्रचलित असणारे ‘सलाड’ प्रकार अपथ्यामध्ये समाविष्ट केले आहेत, ते त्यांच्या गुणांमुळे!) यावरील भाज्या तयार करताना हृदयाला पोषक ठरणाऱ्या मसाल्यांचा वापर अधिक करावा आणि शेंगदाणे, चणाडाळ टाकावे म्हणजे भाज्यांचा योग्य फायदा होतो. वांग्याची भाजी करताना तिळाचे किंवा खुरासनीचे सारण भरून केल्यास रुची निर्माण होऊन लाभही होतो. हृदयरोगी व्यक्तींनी फलाहार जास्त करावा. डाळिंब, द्राक्ष, लिंबू, संत्री, आंबे खायला शास्त्र आग्रह करते. पिवळी लहान केळी हृदयासाठी हितकारक ठरतात, तर कोहळाही चांगला फायदा हृदयाला देतो.

हृदयरोगाच्या पथ्य विचारांमध्ये ‘मदिरा’ सेवन करण्याची परवानगी भाष्यकारांनी दिली आहे. गेल्या एक-दोन तपांपासून विश्वामध्ये मद्यसेवन आणि हृदयरोग यांचा संबंध प्रयोगाच्या निष्कर्षांतून लावण्याचा प्रयत्न सुरू असून रेड वाइन आणि हृदयरोग यांची मैत्री जुळवलेली दिसून येते. परंतु हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने मदिरेचा वापर हदयरोगाच्या चिकित्सेसाठी केला आहे, ते मद्याच्या काही गुणांमुळे! मद्य हे अग्नी वाढवणारे, रुची उत्पन्न करणारे, तीक्ष्ण, उष्ण, कडू, गोड, तिखट रसाचे, किंचित तुरट आणि पचायला हलके असते. स्वर, आरोग्य, प्रतिभा आणि त्वचेची कांती वाढवणारे आहे. निद्रानाश, अतिनिद्रता यावर गुणकारी ठरणारे, मात्र पित्त वाढवणारे आणि रक्तातील दोष वाढवणारे असल्याचे शास्त्रीय वर्णन आहे. मद्य स्थुलांना कृश करणारे आणि कृश व्यक्तींना स्थूल करणारे असून सूक्ष्म गुणांमुळे शुद्धी करणारे आहे. योग्य मात्रेतच वात-कफ विकृती कमी करणारे आणि अधिक मात्रेत विषाप्रमाणे मारक ठरते. त्यातही शास्त्राने नवीन मद्य पचायला जड आणि त्रिदोष निर्माण करणारे आणि जुने मद्य त्रिदोषनाशक असून त्याच्या व्यक्तिपरत्वे वापर सांगितला. यामध्ये वारुणी किंवा प्रसन्ना हे मद्य तांदळाच्या पिठापासून, पुनर्नवा मूळ किंवा ताड, खजूर यांच्या पेंडीतील रसापासून तयार करतात, ते योग्य सांगितले आहे. हे मद्य पचायला हलके, तीक्ष्ण असले तरी आरोग्यास हितकारक आहे. साखरेपासून बनविलेले ‘शर्कर’ हा मद्यचाच प्रकार गोड आणि अल्प मदकारी असला तरी हृदयाला हितकारक सांगितला आहे.

विविध प्रकारच्या आसवांचा अत्यंत गुणकारक उपयोग हदयरोगामध्ये दिसून येतो. मध, घायटीची फुले, मनुके, द्राक्षं, गूळ, सुरा आदींपासून आसव तयार करतात. मद्य वर्गामध्ये ठेवूनही शास्त्रकारांनी आसवांना वेगळे स्थान दिलेले दिसून येते. सर्व प्रकारची आसवे हे हदयाला हितकारक असून काही प्रमाणात वात वाढवणारी आणि त्यातील मिश्रित औषधी गुणांची आहेत. प्रचलित असणारी ‘रेड-वाइन’ किंवा वाइनचे इतर प्रकार शास्त्राने वर्णन केलेल्या या वर्गात ढोबळ विचाराने मोडतात. मद्यद्रव्यांमध्ये द्राक्ष, ऊस, मध, साली व ब्राह्मो हा तांदळाचा हेमंत ऋतूत येणारा प्रकार शास्त्राने उत्तम वर्णन केला आहे. इतर मद्य बनविण्याची द्रव्ये खरंतर मद्य द्रव्ये नसून त्याची नक्कल आहे आणि त्या मद्य प्रकारांमध्ये जे मिसळले जाते, त्याचे गुणच मद्यामध्ये येतात. त्या द्रव्यांना आकार द्रव्ये म्हणतात. ‘शुक्त’ मद्य प्रकार हृदयासाठी अत्यंत हितकर समजला जातो.

कंद, मूळ, फळे, तेल, सौंधव या वस्तूंपैकी एक किंवा अनेक वस्तू द्रव्यात घालून त्याचे संधान केल्याने शुक्त तयार होते. गूळ, उसाचा रस, मध, द्राक्ष आदींपासून तयार करतात. हे शुक्त वातानुकोमक अर्ता उष्ण, तिदवा, रूक्ष गुणाचे हृदयाला बल देणारे, रुची वाढवणारे, दीपन करणारे, स्पर्शाला मात्र शांत-थंड असते. मात्र दृष्टिदोष निर्माण करणारे, पंडूत्वनाशक, कृमिघ्न आहे. हा प्रकार वाइनशी जुळणारा वाटतो. हृदयरोग असताना मधाचे सेवन अत्यंत लाभकारी ठरते. विविध प्रकारच्या मधाचे सेवन हदयरोग व्यक्तींनी नियमित केल्यास फायदा होतो. सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपताना केवळ मध घेतल्यास उपयुक्त ठरते. हिरडय़ांवरील, भल्लातकावरील मध वाहिन्यांमध्ये अडथळा असणाऱ्यांनी सेवन करावा. हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी पाणी उकळून नंतर असेल त्या अवस्थेत सेवन करावे. या पाण्यात उकळताना शुद्ध सोन्याचे वेढे टाकल्यास अधिक गुणकारक ठरू शकते. हृदयरोगींच्या आहाराची खरी ‘किल्ली’ त्या घरातील स्त्रीच्या हातात असते. घरातील स्त्रीला स्वयंपाक करण्याचे आव्हान असते.

विविध लोकांच्या सांगण्यावरून विविध प्रकारचे प्रयोग स्त्रिया आपल्या घरातील व्यक्तींवर करतात. परंतु स्वयंपाकात नेहमी आले, लसूण, सुंठ, कांदा यांचा वापर अधिक करीत राहावा. लाभ होतो. चहामध्ये आल्याऐवजी सुंठ व शेवटी दालचिनी सेवन केल्यास फायदा होतो. (केवळ तुळस, सुंठ, दालचिनीचा चहा दुधाशिवाय जास्त गुणकारी ठरतो.) धना-जिऱ्याचे जमेल तेथे अधिक वापर या रुग्णांच्या पदार्थासाठी करावा. हृदयरोग रुग्णांना कधी पोट फुगणे, लघवीला सतत जावे लागणे असा त्रास असताना ओवा सतत खायला दिल्यास फायदा होतो. ओव्याचाही उपयोग जास्त प्रमाणात असावा. या ठिकाणी लक्षात येते की, या मसाल्याच्या पदार्थाचा वापर भारतातच होतो. परदेशात नाही. जुन्या गुळाचा हदयरोग असणाऱ्या व्यक्तींना निश्चित फायदा होतो. या व्यक्तींनी दिवसातून २-३ वेळा जुन्या गुळाचा तुकडा खाऊन पाणी प्यावे. त्या व्यक्तींना कोथिंबिरीचा लाभ होतो. म्हणून सर्व आहारात कोथिंबीर टाकूनच सेवन करावे.

First Published on March 20, 2018 3:32 am

Web Title: best diet for heart patient