18 January 2019

News Flash

पोटाचा घेर वाढलाय?

कंबरेचे नितंबाजवळील घेराशी असलेले गुणोत्तर काढले की चरबीचे प्रमाण निश्चित करता येते.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

गेल्या दशकभरापासून वजन हा आरोग्याचा महत्त्वाचा घटक मानला जाऊ  लागला आहे, मात्र त्यात अंतर्विरोध दिसतो. ज्यांना वजन खरोखरीच कमी करण्याची गरज आहे, अशा व्यक्ती त्याकडे फारशा काळजीने, जाणिवेने पाहात नाहीत तर दुसरीकडे केवळ सुंदर दिसण्यासाठी पोट खपाटीला लावून साइज झिरो बनणाऱ्यांची संख्या वाढतेय. वजन कमी करणे ही काहीशी गुंतागुंतीची क्रिया असते. खाण्यावर नियंत्रण, सकस आहार तसेच शारीरिक हालचाल, आजार अशा अनेक घटकांवर ते अवलंबून असते. त्यातच पोटाचा वाढलेला घेर म्हणजे शरीराच्या मधल्या भागातील वाढलेली चरबी कमी करणे हे अधिकच गुंतागुंतीचे आहे. काही वेळा हात पाय बारीक होऊनही पोट मात्र आत जात नाही. या भागात चरबी नेमकी का वाढते ते पाहू या.

शरीराच्या मधल्या भागातील स्थूलता (सेंट्रल ओबेसिटी) म्हणजे काय?

हा स्थूलपणा साधारण तीन प्रकारांत गणला जातो. एकतर कंबरेखालचा घेर, दुसरे म्हणजे वाढलेले पोट किंवा काहीजणांमध्ये या दोन्ही बाबी एकत्रितपणेही येतात. नितंब, कंबरेखालचा घेर आणि मांडय़ांवर अधिक चरबी जमा झाल्याने शरीराच्या या भागाचा घेर वाढतो आणि तो कंबरेपेक्षा अधिक मोठा दिसू लागतो. त्यामुळे शरीराला पेर या फळासारखा आकार येतो, तर काहीजणांच्या पोटाच्या पुढच्या भागात चरबी वाढते. त्यामुळे कंबर ही नितंबांपेक्षा मोठी दिसू लागते. साधारणपणे वृद्ध माणसांमध्ये पोट वाढलेले दिसते. त्याला कारण शरीरातील चरबीचे वितरण योग्य प्रकारे होत नाही. चयापचय क्रिया मंदावल्याचे ते लक्षण असते. इतरांमध्ये मात्र पोटाचा आणि कंबरेखालचा घेर वाढवण्यासाठी बरीच कारणे असतात. मासिक पाळी सुरू असणाऱ्या स्त्रियांच्या ओटीपोटाची चरबी पुरुषांच्या तुलनेत अर्धी असते तर मासिक पाळी बंद झालेल्या स्त्रियांमध्ये पुरुषांएवढेच चरबीचे प्रमाण असते. यकृत, लहान आतडे, स्वादुपिंड अशा महत्त्वाच्या अवयवांना संरक्षण देण्यासाठी पोटाच्या आतल्या भागात चरबीचे थर असतात. मात्र त्वचेखाली असलेल्या चरबीपेक्षा ही चरबी वेगळी असते. ही चरबी वाढली की पोट पुढे आलेले दिसते. त्यालाच शरीराच्या मधल्या भागातील स्थूलता म्हणतात.

आरोग्याला कोणते धोके असतात?

हृदयविकार, उच्च रक्तदाब, आकडी, इन्शुलिनला अवरोध, यकृताची सूज, दमा, अल्झायमर तसेच स्तन किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाशी या साठलेल्या चरबीचा संबंध असतो. हायपोथायरोडिझम, पॉलिसिस्टिक ओव्हरी यांमुळेही मधल्या भागातील स्थूलता वाढू शकते. मद्यपान हे पुरुषांच्या पोटाचा घेर वाढण्याशी थेट संबंधित आहे. स्त्रियांमध्ये मात्र तसे होत नाही.

स्थूलतेशी संबंधित जोखमीच्या घटकांवरूनही स्थूलता मोजली जाते.

* उच्च रक्तदाब

* कोलस्टेरॉल

* उच्च ट्रायग्लिसराइड्स

* रक्तातील जास्त शर्करा

* कुटुंबातील हृदयविकार

* शरीराची हालचाल नसणे

* धूम्रपान

शास्त्रीय पद्धती

बायोइलेक्ट्रिक इम्पेडन्स, डेक्सा, सीटी आणि एमआरआयमधून मधल्या भागातील चरबीचा अगदी योग्य अंदाज येतो. शरीरातील चरबी मोजण्यासाठी अल्ट्रासाऊंड पद्धतीचाही उपयोग करतात.

चरबीचे प्रमाण कमी कसे करावे?

तुमच्या वजनात पाच ते दहा टक्के घट केली तरी तुमचे आरोग्य चांगल्या प्रमाणात सुधारते. आहारावरील नियंत्रण हा वजन घटवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. सकस आहार, कमी प्रमाण आणि अन्न व पेयातील उष्मांक कमी केले की वजन नियंत्रणात येते. आठवडय़ात अडीच ते पाच तासांपर्यंत मध्यम क्षमतेचा व्यायाम करावा. मध्यम क्षमतेचा म्हणजे वेगाने चालणे उदा. एक मिनिटात १०० पावले. पोटाचे वजन कमी करण्यासाठी विशिष्ट व्यायाम प्रकारही आहेत. मात्र केवळ पोटाचे व्यायाम केल्याने चरबी कमी होणार नाही तर एकूणच शरीराची हालचाल वाढवावी लागेल.

चिमटा काढूनही मोजता येते स्थूलता..

कॅलिपरनेही मधल्या भागातील स्थूलता मोजता येते. पोटावरील कोणत्याही भागात चरबी मोजण्यासाठी याचा वापर करता येतो. म्हणजे बेंबीपासून एक इंच दूर भागात नेमकी किती चरबी जमा झाली आहे ते कॅलिपरने मोजता येते. पण कॅलिपर हाताशी नसेल तर तुमचा अंगठा आणि चाफेकळी हे काम करण्यासाठी पुरेशी आहे. कोणत्याही भागात एक इंचापेक्षा जास्त भाग चिमटीत आला तर तुम्ही स्थूल आहात हे समजून जा.

स्थूलता कशी मोजतात?

बॉडी मास इंडेक्स हा तर आता सर्वाना माहिती झालेला आहे. शरीराची उंची व वजन यांचे प्रमाण म्हणजे बीएमआय. वजनाला मीटरमधील उंचीच्या वर्गाने भागले म्हणजे बीएमआय मिळतो. साधारणपणे १८.५ ते २४.९ हा सामान्य बीएमआय समजला जातो. २५ ते २९.९ हा वजन वाढले असल्याचा तर ३० पेक्षा जास्त इएमआय हा स्थूलतेचा निदर्शक असतो.

कंबरेचे नितंबाजवळील घेराशी असलेले गुणोत्तर काढले की चरबीचे प्रमाण निश्चित करता येते. यात कंबरेचा घेर मोजतात आणि नितंबांकडे सर्वाधिक घेर असलेल्या जागेशी त्याचे गुणोत्तर काढले जाते. श्वास बाहेर टाकताना कंबरेचा घेर मोजला जातो. हे प्रमाण पुरुषांमध्ये ०.९ तर स्त्रियांमध्ये ०.८५ पेक्षा कमी असावे.

मधल्या भागातील स्थूलता मोजण्यासाठी कंबरेचा घेर हा सर्वात जास्त वापरला जाणारा निदर्शक आहे. बेंबीजवळ पोटाचा घेर किती आहे यावरून स्थूलता जाणून घेता येते. पुरुषांमध्ये १०२ सेंटीमीटर (४० इंच ) तर स्त्रियांमध्ये ८८ सेंटीमीटर (३५ इंच) हा सामान्य घेर समजला जातो.

डॉ. रेखा भातखंडे

gastro111@gmail.com

एक लक्षात ठेवा, चयापचय मंदावल्याने आपले वजन वाढत नाही तर वजन वाढल्याने चयापचयाचा वेग मंदावतो.

First Published on April 17, 2018 4:27 am

Web Title: best ways to lose and reduce belly fat