X

रक्तदान चळवळीस रक्तमोक्षण पूरक

आयुर्वेदाने रक्ताच्या अशुद्धीमुळे निर्माण होणाऱ्या अनेक रोगांचे वर्णन केले आहे.

वर्षां ऋतू संपून शरद ऋतूला सुरुवात झाली आहे. या ऋतूत पित्तदोष वाढून उष्णतेचे विकार होऊ  नयेत म्हणून आयुर्वेदाने रक्तमोक्षण सांगितले आहे. सध्या सुरू असलेल्या रक्तदान चळवळीला हे रक्तमोक्षण पूरक ठरेल.

रक्तदानास पात्र असणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींनी रक्तदान करावे. आयुर्वेदीय संकल्पनेचा केलेला सदुपयोग रक्तदान चळवळीला नक्कीच पूरक ठरेल. यासाठी रक्तपेढय़ा आणि आयुर्वेदीय चिकित्सक यांचा समन्वय होणे आवश्यक आहे. आयुर्वेद या भारतीय वैद्यकाने विशेष अशी पंचकर्म चिकित्सा सांगितली आहे. रक्तमोक्षण हे त्यामधील एक महत्त्वाचे कर्म आहे. रक्तमोक्षण म्हणजे शरीरातील रक्ताचा काही अंश बाहेर काढून घेणे. आयुर्वेदात रक्तदानाचा प्रत्यक्ष उल्लेख नाही. मात्र रक्तमोक्षणाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. या कर्मामुळे अनेक रोगांना प्रतिबंध होऊ  शकतो, तसेच यामुळे अनेक रोग बरे होतात, असे सांगितले आहे. आधुनिक काळात विचारांची जोड दिल्यास रोगप्रतिबंधासाठी रक्तदान करण्याची मानसिकता समाजामध्ये निर्माण होईल असे वाटते.

भारतीय कालमानानुसार शरद ऋतू म्हणजे ‘ऑक्टोबर हीट’चा काळ होय. या काळात शरीरात पित्तदोष वाढून रक्त दूषित होऊन अनेक रोग निर्माण होतात. उदा. अंगावर पित्त येणे, तोंड येणे, हातापायाची आग होणे, पायांना भेगा पडणे, डोळे लाल होणे, लघवीला आग होणे अशा अनेक व्याधी शरीरात निर्माण होतात. असे ऋतुजन्य आजार होऊ  नयेत म्हणून आयुर्वेदाने या काळात रक्तमोक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. योगायोगाने १ ऑक्टोबर हा रक्तदान दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. त्यामुळे आधुनिक काळातही आयुर्वेदीय संकल्पनेचा आधार घेऊन रक्तदान करण्यासाठी सर्वानीच पुढे यायला हवे.

आयुर्वेदाने रक्ताच्या अशुद्धीमुळे निर्माण होणाऱ्या अनेक रोगांचे वर्णन केले आहे. या रोगांसाठी रक्तमोक्षण हे एक महत्त्वाची आणि प्रमुख चिकित्सा म्हणून सांगितली आहे. असे रोग होऊ  नयेत म्हणूनही रक्तमोक्षणाचा अवलंब आयुर्वेदात केला जातो. या सर्व रोगांना टाळण्यासाठी रक्तमोक्षण आवश्यक आहे. रक्तदान केल्यास त्या रक्तदात्याला या सर्व रोगांपासून स्वत:चा बचाव करता येईल, तसेच वरीलपैकी एखादा रोग कोणाही व्यक्तीला झाल्यास आणि ती व्यक्ती आधुनिक परिमाणानुसार रक्तदान करण्यास पात्र असेल तर त्या रोगाची चिकित्सा म्हणूनही रक्तदानाचा उपयोग होईल. हल्ली त्वचाविकारांचे प्रमाण बरेच वाढले आहे. अनेक प्रकारचे त्वचारोग रक्ताच्या अशुद्धीमुळे निर्माण होतात. अशा त्वचारोगांसाठी रक्तमोक्षण ही एक उत्तम चिकित्सा आहे.

आयुर्वेदाने रक्तमोक्षण करण्यापूर्वी काही प्रमाणात गाईच्या तुपाचे सेवन करण्यास सांगितले आहे. सध्याच्या काळात रोगप्रतिबंधासाठी रक्तदान करण्यापूर्वी वैद्यांच्या सल्ल्याने गाईचे तूप सेवन केल्यास तेही उपयुक्त ठरेल. रक्तदानानंतर काही दिवसांतच दिलेले रक्त शरीरात तयार होते आणि अशुद्ध रक्तामुळे होणाऱ्या रोगांना आपण दूर ठेवू शकतो. या विश्वासाने रक्तदान दिनाच्या निमित्ताने ऑक्टोबर महिन्यात रक्तदानास पात्र असणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींनी रक्तदान करावे. तसे केल्यास रक्तदान करणाऱ्या आणि रक्त घेणाऱ्या अशा दोघांनाही याचा आरोग्यदायी लाभ होईल. आयुर्वेदीय संकल्पनेचा केलेला सदुपयोग रक्तदान चळवळीला नक्कीच पूरक ठरेल, असा विश्वास वाटतो. यासाठी रक्तपेढय़ा आणि आयुर्वेदीय चिकित्सक यांचा समन्वय होणे आवश्यक आहे.

अर्थात शरद ऋतू सोडूनही रक्तमोक्षण व्याधीला अनुसरून करता येऊ शकते. त्यामुळे एरवीही रक्ताचे विकार असणाऱ्या व्यक्तींनी रक्तदान केल्यास त्याचा सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने दुहेरी फायदा होऊ  शकतो. रक्तदाता आणि रक्ताची गरज असलेला रुग्ण यांना आरोग्य टिकवण्यासाठी या रक्तदानाच्या उपयोग होऊ  शकेल. अर्थात यासाठी रक्तदाता हा आधुनिक परिमाणानुसार रक्तदानाला पात्र असला पाहिजे. प्राचीन भारतीय शास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे आधुनिक शास्त्र या दोन्ही शास्त्रांचा समन्वय साधून आपण सामाजिक आरोग्य चांगले राखण्यासाठी असे प्रयत्न करू शकतो.

Outbrain