तरुण वयातच हल्ली अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. आपली बदललेली जीवनशैली, सततचे ताण-तणाव ही त्याची काही कारणे असली तरी रक्तदाब नेमका कशामुळे वाढतो हे तपासून त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक ठरते. नुकत्याच झालेल्या ‘रक्तदाब दिना’च्या निमित्ताने तरुण वयातील उच्च रक्तदाबाबद्दल माहिती घेऊया..

उच्च रक्तबदाब पूर्वस्थिती आणि उच्च रक्तदाब
रक्तदाब १२०-८० असला तर तो सामान्य समजला जातो. हा रक्तदाब जेव्हा वरचा रक्तदाब १२० ते १३० आणि खालचा रक्तदाब ८० ते ९० असा वाढतो, तेव्हा त्याला ‘प्री- हायपरटेन्शन’ (उच्च रक्तदाब पूर्वस्थिती) असे संबोधतात. तर १३०-९० च्या वर रक्तदाब गेल्यास त्याला उच्च रक्तदाब म्हटले जाते.

nagraj manjule
“मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत
Video Man Throws Back shot Basketball From 85 Ft Distance Breaks Guinness World Record Viral Clip Will Shock You
८५ फुट लांबून बास्केटबॉलचा बॅक शॉट मारला; Video पाहून म्हणाल, “याच्या पाठीला डोळे…”
तरुणाईचा बीपी

लक्षणे कोणती?
’ उच्च रक्तदाबाचे मुख्य लक्षण म्हणजे तीव्र डोकेदुखी. अनेकदा तरुण वयात अशी डोकेदुखी सुरू झाल्यावर साहजिकपणे लोक आधी डोळे तपासतात. चष्मा तर लागला नाही ना, ते पाहतात. डोळे आणि इतर नेहमीची तपासणी झाल्यावर जेव्हा रक्तदाब तपासून पाहिला जातो तेव्हा एकदम १५०-९०, १६०-१०० असा रक्तदाब वाढल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारचा ताण असताना अशी डोकेदुखी उद्भवू शकते.
’ डोकेदुखीबरोबरच छातीत जडपणा येणे आणि श्वास घ्यायला थोडा त्रास होणे हीदेखील लक्षणे दिसतात. आपल्या नेहमीच्या हालचालीपेक्षा जरा जास्त व्यायाम झाला किंवा नेहमीपेक्षा जास्त जिने चढून गेले तर अशा प्रकारे घाम येणे, थकवा जाणवणे, छातीत जडपणा येणे हे जाणवू शकते.

कुणी अधिक काळजी घ्यावी?
’ ज्यांच्या घरी उच्च रक्तदाब वा मधुमेह आहे त्यांनी विशी उलटताना आणि तिशीपासूनच वर्षांतून एकदा तरी रक्तदाबाची तपासणी जरूर करून घ्यावी.
’ ज्यांची जीवनशैली उच्च रक्तदाबाला पोषक आहे, सततचा ताण आहे, त्यांना उच्च रक्तदाबाशी सबंधित लक्षणे दिसत असतील तर लगेच तपासणी करून घेणे गरजेचे.

संभाव्य कारणे काय?
’ तरुणपणातच उच्च रक्तदाबाची तक्रार असते तेव्हा प्रथम त्या व्यक्तीच्या घरातच ती समस्या आहे का, आई-वडील वा आजी-आजोबांना उच्च रक्तदाब होता का ते विचारले जाते. अशा व्यक्तींना विशीतच उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
’ जीवनशैली हेही एक महत्त्वाचे कारण ठरू शकते. काही जण अगदी तरुण वयात शिक्षण वा नोकरीच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी सर करतात. अशा लोकांमध्ये सततचा ताण असू शकतो. इतरांमध्येही रोजची तणावपूर्ण जीवनशैली हे उच्च रक्तदाबाचे कारण होऊ शकते.
’ मद्यपान व धूम्रपानाची सवय
’ अति कामामुळे रात्रीची जागरणे. तरुण वयात हे अधिक होते.
’ या सर्व कारणांमुळे हळूहळू उच्च रक्तदाबाची लक्षणे उद्भवू शकतात. काही लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची वेळेत तपासणी झाली नाही आणि ते दुर्लक्षित राहिले तर अचानकपणे हृदयविकाराचा वा मेंदूचा झटकाही येण्याची शक्यता असते. अशा रुग्णांमध्ये वरचा रक्तदाब अचानकपणे १७०-२०० इतका जास्तही वाढू शकतो. याला ‘अ‍ॅक्सिलरेटेड हायपरटेन्शन’ म्हणतात. धूम्रपानाची सवय असलेल्यांमध्ये अशा परिस्थितीत हृदयविकाराचा धोका अधिक असतो.
’ तरुण वयातील रुग्णांमध्ये या सगळ्याव्यतिरिक्त इतरही काही वैद्यकीय कारणांमुळे रक्तदाब वाढू शकतो. (उदा. अ‍ॅड्रेनल ग्रंथीचा टय़ूमर, रेनल आर्टरी स्टेनोसिस, कोऑप्टेशन ऑफ एओटा, इ.) त्यामुळे रक्तदाब वाढण्याचे नेमके कारण शोधून त्यावर उपचार करणे गरजेचे.
’ काही रुग्णांमध्ये केवळ डॉक्टर समोर असल्याच्या भीतीनेही रक्तदाब वाढू शकतो. याला ‘व्हाइट कोट सिंड्रोम’ म्हणतात. यात अनेकदा रक्तदाब मोजून खात्री करावी लागते.

प्रतिबंध कसा करावा?
’ नियमित व्यायाम गरजेचा
’ आहारात खूप जास्त मीठ टाळावे
’ महाविद्यालयीन किंवा नोकरी करणाऱ्या तरुण मंडळींची घोळकी रस्त्यावर खाण्यापिण्याची दुकाने वा गाडय़ांभोवती हटकून दिसतात. एकीकडे धूम्रपान, बरोबर चहा, मधूनच तळलेले काही पदार्थ असा बेत असतो. आरोग्यासाठी या गोष्टी नक्कीच बऱ्या नाहीत आणि ठरवल्यास त्या टाळणे शक्य आहे.
’ कार्यालयातील काम बैठे असेल तरी थोडा वेळ पायी चालून येण्यासाठी वेळ काढा.
’ कितीही काम असले तरी रात्री पुरेशी झोप महत्त्वाची.
’ ताणतणाव कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच योगासने व प्राणायाम शिकून घेऊन करता येईल. ताणावर निश्चित उपाय नसला तरी त्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करता येतो.
’ रुग्णांनी केवळ उच्च रक्तदाबावरील औषधे घेऊन रक्तदाब नियंत्रणात राहीलच असे नाही. त्याबरोबरीने जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे.

त्वरित डॉक्टरकडे जाणे कधी आवश्यक?
’ छातीत व डोक्यात जडपणा जाणवणे, अचानक घाम येणे, हृदयात धडधड होणे या लक्षणांमध्ये लगेच डॉक्टरांकडे जायला हवे.

 डॉ. मनोज दुराईराज, हृदयरोगतज्ज्ञ manojdurairaj@hotmail.com (शब्दांकन- संपदा सोवनी)