12 December 2017

News Flash

मृत्यूचा खेळ!

मोठय़ा माणसांच्या आत्महत्यांमध्ये मानसिक आजारांचा वाटा ५० टक्के किंवा त्याहून कमी असतो.

संपदा सोवनी  | Updated: August 3, 2017 1:34 AM

डॉ. भूषण शुक्ल, बालमानसोपचारतज्ज्ञ

मुंबईत एका ‘टीनएजर’ मुलाच्या आत्महत्येनंतर ‘ब्लू व्हेल’ या जागतिक ‘ऑनलाइन’ गेमचे नाव पुन्हा चर्चेत आले. या मुलाच्या आत्महत्येस हा गेम कारणीभूत ठरला असावा, अशी शंका व्यक्त झाल्यानंतर त्या गेममध्ये करायला सांगितली जाणारी भयंकर ‘टास्क’देखील ‘व्हायरल’ झाली. ब्लेडने हातावर कापून घेणे, सुया टोचून घेणे, उंच इमारतीच्या भिंतीवर उभे राहणे अशा या ‘टास्क’विषयी वाचणेही भीतीदायक वाटेल असे आहे. मुले स्वत:चा इजा करून घेण्यापर्यंत कशी जात असतील..आभासी जग आणि रोजचे खरे जगणे यातील संतुलन ढळते आहे का..ते ढळू नये म्हणून काय करावे.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मानसोपचारतज्ज्ञांकडून शोधण्याचा हा प्रयत्न.

स्वत:ला इजा करून घेणे ही धोक्याची घंटा

‘ब्लू व्हेल’ हा खेळ खेळणाऱ्यांच्या मनावर कसाकसा परिणाम होत जातो, आणि स्वत:ला इजा करून घेण्यापासून आत्महत्येपर्यंत मंडळी कशी पोहोचतात याचा मानसिक दृष्टीकोनातून अभ्यास झालेला नाही. या खेळाविषयीच्या अनेक गोष्टी अजून आपल्याला माहीत नाही. ‘ब्लू व्हेल’ काही काळ बाजूला ठेवला तर वरवर त्यापेक्षा कमी धोकादायक वाटणारे अनेक ‘डेअर गेम्स’ पूर्वीपासून मुलांमध्ये खेळले जातात. ‘टीनएजर’ मुलांमधील आत्महत्या हा विषय लक्षात घेता त्यात आणि मोठय़ा माणसांच्या आत्महत्यांमध्ये काही फरक असल्याचे दिसून येते. मोठय़ा माणसांच्या आत्महत्यांमध्ये मानसिक आजारांचा वाटा ५० टक्के किंवा त्याहून कमी असतो. ‘टीनएजर’ मुलांमध्ये मात्र आत्महत्या करणाऱ्यापैकी ९५ टक्के मुलांना मानसिक समस्या असल्याचे दिसून येते. त्यातही एकटी पडलेली मुले स्वत:ला इजा करून घेण्यास सांगणाऱ्या खेळांकडे आकर्षित होऊ शकतात. काही जणांमध्ये त्याचे परिणाम लक्षात येऊ लागतात, काहींमध्ये ते दिसतही नाहीत. लहान मुलांच्या किंवा ‘टीनएजर’ मुलांच्या आत्महत्या ही मागे राहिलेल्यांसाठी खूप दु:खद घटना असते. या आत्महत्या नेमक्या कशामुळे होतात त्याचा अनेकदा थांग लागत नाही. त्यामुळे सरसकट मुलांच्या आई-वडिलांना जबाबदार धरणेही चुकीचे आहे.

स्वत:ला इजा करून घेण्याच्या मानसिकतेची प्रमुख लक्षणे-

  • मुले एकटी राहू लागतात
  • पालकांशी संवाद किंवा संपर्क कमी होतो
  • काही वेळा वागण्यात काहीतरी विचित्र बदल दिसून येतो. मुले काहीतरी लपवू लागतात. स्वत:ला इजा करून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागल्यास विनाकारण पूर्ण बाह्य़ांचे कपडे घालून फिरणे, किंवा घरात शॉर्टस् घालणाऱ्या मुलामुलींना अचानक पाय पूर्ण झाकणारे कपडे घालावेसे वाटणे, अशी काही छोटी लक्षणेही दिसतात. मूल मुद्दाम स्वत:ला इजा करून घेत असेल, तर पालकांनी तो धोक्याचा इशारा मानायला हवा आणि लगेच वैद्यकीय मदत घ्यायला हवी.

आभासी आणि खऱ्याची सरमिसळ

‘ऑनलाइन’ खेळल्या जाणाऱ्या काही खेळांमध्ये व्यक्तीच्या खऱ्या दैनंदिन जगण्याची आभासी जगाशी बेमालूम सांगड घातलेली असते. अनेकदा खऱ्या आणि आभासी जगातील सीमारेशा इतकी पूसट होते, की आभासी गोष्टीही खऱ्याच आहेत, अशी समजूत होऊ लागते. त्यांच्याविषयी व्यक्तीच्या मनात खऱ्या भावना निर्माण होतात. एखादी गोष्ट (खरी किंवा आभासी) किंवा व्यक्तीविषयीही अति भावनिक जवळीक निर्माण होणे हे काही प्रमाणात सामान्य आहे. अनेकांच्या बाबतीत काही दिवसांनी या भावना निवळतात आणि व्यक्ती पूर्वीसारखी वागू लागते. पण या प्रकारची भावनिक जवळीक प्रमाणाबाहेर जात असेल किंवा मुलांच्या दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होत असेल तर त्याकडे गांभीर्याने बघायला हवे. ‘ऑनलाइन’ जगाच्या बाबतीत असे घडू नये म्हणून मुलांच्या हातात मोबाईलच द्यायला नको, असा विचार काही जण करतात. आजच्या परिस्थितीत हे शक्य नाही आणि तो खरा उपायही नाही. मुलांच्या हाती मोबाईल आणि इंटरनेट येणारच. पण लहानपणापासून त्यांना त्यापासून स्वत:ची ‘स्पेस’ कशी राखायची हे शिकवायला हवे. यासाठी काही गोष्टी करता येतील.

  • घरात सर्वानी रोजचा काही काळ ‘इंटरनेट’शिवाय राहायला हवे. सर्वाचे मोबाइल पूर्णत: बाजूला ठेवले आहेत, असा काही वेळ तरी हवाच- (उदा. एकत्र जेवणाची वेळ). मुलांच्या हातात सतत मोबाइल देण्याची आवश्यकता नसते. अगदी लहान वयापासून मोबाईल सतत बाळगण्याची सवय लागू देणे चुकीचेच.
  • मुलांना वागण्याचे काही नियम घालून देऊन ते पाळायला शिकवायला हवे. मोबाईल किती वेळ मुलांकडे असावा याचे काही नियम आधीच घालून द्यायला हवेत. ते पाळले न गेल्यास त्यासाठी एक-दोन दिवस मोबाईलशिवाय राहण्यासाखी शिक्षाही हवी.

First Published on August 3, 2017 1:34 am

Web Title: blue wheel game issue blue whale suicide challenge social media games