आयुर्वेदामध्ये निरोगी माणसाची व्याख्या करताना त्याचे दोष, धातू, मल, आत्मा, इंद्रिये, मन यासोबतच अग्नीसुद्धा समस्थितीत पाहिजे असे सांगितले आहे. अग्नी हा मेंदूपासून पायापर्यंत सर्वत्र पसरला असून इतर अवयवांप्रमाणेच तो मनुष्याला जिवंत ठेवण्याचे कार्य करतो. मानवाच्या मृत्यूनंतर त्याचे सर्वाग थंडगार पडते, हे आपण प्रत्यक्ष अनुभवतोच. या अग्नीचे अनेक प्रकार आहेत. बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी त्वचेमध्ये असलेल्या उष्णतेविषयी आपण जाणून घेऊ या.

थंडीमध्ये शरीराच्या उष्णतेचा समतोल राखणे महत्त्वाचे असते. त्याच वेळी बाहेरचे थंड हवामान सहन करण्यासाठी, त्वचेतील उष्णता वाढत असल्यामुळे साहजिकच या ऋतूत त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. सर्दी, खोकला, दमा, सांधेदुखी, आमवात, केसात कोंडा होणे, सोरायसिससारखे त्वचाविकार, तळपायांना भेगा पडणे असे विकार या थंडीत वाढतात. या वेळी शरीराच्या आतील व त्वचेवरच्या उष्णतेला योग्य स्थितीत ठेवण्याचे उपाय करावे लागतात.

त्वचेच्या उष्णतेच्या समतोलासाठी शरीरातील अग्नीसुद्धा योग्य मात्रेत हवा. थंडीत पचनशक्ती चांगली असते त्यामुळे भूकही थोडी जास्त लागते. शरीरातील अंतर्गत उष्णता टिकवून ठेवण्यासाठी टरफलयुक्त सुकी फळे, डिंक, मेथी, अहाळीव, खोबरे अशा उष्ण पदार्थाचे सेवन करावे. त्वचेच्या उष्णता नियमनासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यस्नान करावे. सध्याच्या जीवनशैलीत मोठय़ा शहरांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता जाणवू लागली आहे. प्रत्येक जण ‘ड’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या, इंजेक्शन, ग्रॅन्युएल्स घेत असतो. असे  कृत्रिम ‘ड’ जीवनसत्त्व पाण्यात विरघळत नसल्याने ते गरजेपेक्षा जास्त झाल्यास शरीरात साठून त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे रोज १५ मिनिटे ते अर्धा तास आपला चेहरा, हात, पाय किंवा शरीराच्या जास्तीत जास्त भागावर ऊन पडू द्यावे.

थंडीतला साधा आणि सर्वानी करायचा प्रथम उपाय म्हणजे ‘अभ्यंग’. सकाळी अंघोळीपूर्वी तासभर अगोदर सर्वागाला तेलाचे मालीश करून ते त्वचेत जिरू द्यावे आणि नंतर गरम पाण्याने स्नान करावे. अभ्यंगासाठी तिळाचे तेल उत्तम आहे. परंतु खोबरेल तेलही चालू शकते. सकाळसारखेच रात्री झोपतानासुद्धा टाळूवर, दोन्ही तळपायांना अभ्यंग करावे. तसेच थोडे कोमट करून एकेका कानांत घालावे आणि अध्र्या तासाने काढून टाकावे. शक्य असेल त्यांनी संपूर्ण थंडी जाईपर्यंत अभ्यंगानंतर सर्वागाला उटणे लावून मग गरम पाण्याने अंघोळ करावी.

थंडीत त्वचेप्रमाणे ओठही फुटतात. ओठांना दिवसांतून तीन ते चार वेळा घरचे तूप, घरच्या ताकावरचं लोणी, दुधावरची साय लावावे.

ओठांप्रमाणे टाचांनाही भेगा पडतात. त्यातून रक्त येते. यासाठी पायात कायम पायमोजे किंवा घरात चालताना स्लीपर्स वापराव्यात. टाचा किंवा तळपायांच्या भेगांना खोबरेल तेलाप्रमाणेच कोकम तेल चोळून लावावे. तळपायांची आग होत असेल तर ‘शतधौत घृत’ किंवा गाईचे तूप हातांनी किंवा काशाच्या वाटीने रोज रात्री चोळावे. घरच्या तूपात ज्येष्ठमध पावडर मिश्रण करून टाचेच्या भेगांवर चोळावे. खूप चांगला उपयोग होतो. पायांना तेल चोळल्याने डोळ्यांचीही उष्णता कमी होते.

थंडीच्या कडाक्यात खूप सकाळी लवकर किंवा रात्री-अपरात्री बाहेर फिरणे टाळावे. कानात कापूर, गळ्याला मफलर, स्वेटर व पायात बूट घालून जाणे केव्हाही चांगले. थंडीत दातखीळ बसते, कुडकुडायला होते. अशा वेळी कोणताही पेनबाम कानशिलावर, दोन्ही तळहात, तळपाय आणि छातीवर चोळावा. चहा, कॉफीसारखी गरम पेये प्यायला द्यावीत. आल्याचा रस आणि मधाचे चाटण द्यावे. आल्याचा तुकडा चावून खायला देऊन वर गरम पाणी प्यायला द्यावे. गरम पाण्यात पाय बुडवून बसवावे. लोकरीच्या कापडाने सगळ्या अंगावर घर्षण करावे.

आमवात, संधिवात असलेल्या रुग्णांचे सांधे आखडतात. विशेषत: सकाळी उठताना खूप त्रास होतो. अशा वेळी लोकरीच्या कापडांनी दुखऱ्या किंवा आखडलेल्या सर्व सांध्यावर चांगले घर्षण करावे (चोळावे).यामुळे साध्यांवरील त्वचेवर उष्णता निर्माण होऊन सांधे मोकळे होतात. रात्री झोपतानासुद्धा दुखणारे सांधे लोकरीच्या कपडय़ात किंवा गरम शालीत गुंडाळून ठेवावे. म्हणजे सकाळी कमी त्रास होतो. सांधेदुखी असलेल्या रुग्णांनी अंघोळीपूर्वी व रात्री नियमितपणे कोमट तीळतेल, खोबरेल तेल, सुंठ पावडर घालून एरंडेल तेल आणि अ‍ॅलर्जी नसल्यास मोहरीचे तेल यापैकी एखाद्या तेलाने मालीश करावी. फक्त आमवात असणाऱ्या रुग्णांनी तेल मालीश न करता दुखऱ्या सांध्यावर फक्त शेक (वीट, वाळू, ओवा, मीठ) द्यावा.

थंडीमध्ये सर्दी-ताप-खोकला या आजारांचा त्रास होतो. यामध्ये बाह्य़ त्वचेप्रमाणे शरीरातील उष्णता वाढवणे आवश्यक असते. आहारातील सर्व थंड-आंबट पदार्थ टाळावेत. धणे-ज्येष्ठमध-तुळशीची पाने, आले, काळेमिरी, अळशी व पातीचा चहा घालून रोज सकाळी आणि रात्री गरम काढा प्या. सतत शिंका, नाक गळणे यासाठी नाकाला आतून साजूक तूप लावावे किंवा नाकात तूप टाकावे. कफ, खोकला, दमा असणाऱ्या रुग्णांनी रोज रात्री छातीला खोबरेल तेल चोळून गरम शेक द्यावा. दम लागल्यास आल्याचा रस आणि मधाचे चाटण करून गरमागरम कोरा चहा प्यावा. तापासाठी त्वचेवरील उष्णता कमी करण्यासाठी रक्तचंदनाचा लेप कपाळावर लावावा, मिठाच्या पाण्याच्या घडय़ा ठेवाव्यात, थंड पाण्याने (तीव्र ज्वर असल्यास) अंग पुसून काढावे. टाळूवर पांढरा कांदा किसून पुरचुंडीने बांधून ठेवण्यासारखे उपाय करावेत.

थंडीत अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. त्यासाठी त्वचेला खोबरेल तेल, कापूर किंवा तूप आणि मिरपूड वा आमसुलाच्या पाण्यात कापूर व मिरपूड घालून लावावे. बर्फाने शेकल्यास परिणाम दिसून येतो.

अतिश्रम, ताण, संताप, चिडचिड आणि अतिव्यायाम यामुळे मेंदूतील उष्णता वाढू शकते. यासाठी डोक्याला तेल लावून आंघोळ करावी. बाहेरून आल्यानंतर गरम पाण्याने हातपाय धुवावेत. यामुळे मेंदूला तरतरीतपणा येऊन थकवा कमी होऊन उत्साह वाढतो.

ज्या व्यक्तींची त्वचा मुळातच कोरडी आहे, त्यांची त्वचा थंडीत अधिकच सुरकुतलेली दिसते. साधारणपणे सर्वच त्वचारोग थंडीत बळावतात. या सर्वामध्ये औषधी मलमे उपयोगी आहेत. पण मुख्य औषध म्हणजे त्वचा कायम मऊ आणि स्निग्ध ठेवणे. यासाठी खोबरेल तेल किंवा कोकम तेल सतत चोळून त्वचेमध्ये जिरवणे, यांसारखा दुसरा उपाय नाही. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या त्वचेसाठी हा उपाय दररोज करण्याची गरज आहे. कोरडय़ा त्वचेपासून ते सोरायसिसच्या रुग्णांपर्यंत सर्वानीच त्वचा कायम स्निग्ध राहण्यासाठी तेल, तूप, कोकम तेल याचा वारंवार उपयोग करावा. त्वचेवर खवले पडले असतील तर लिंबाच्या रसात मध किंवा साखर घालून चोळावे. अंगाला खूप खाज येत असेल तर खोबरेल तेलात कापूर घालून ते तेल चोळावे.

थंडीत केसांमध्ये खूप कोंडा होतो. डोक्याची त्वचा कोरडी होत असल्याने खोबरेल तेलात कापूर घालून केसांच्या मुळांना लावावे. रात्री केसांच्या मुळांना चोळून तेल लावावे आणि रात्रभर ते त्वचेत मुरू द्यावे. आंबट दही, लिंबाचा रस, आवळ्याचा रस याचाही चांगला उपयोग होतो.

थंडीत शरीराची उष्णता संतुलित ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे संतुलित व चौरस आहाराची किंवा गरम आणि पौष्टिक आहाराची गरज आहे. त्याचप्रमाणे त्वचेतील उष्णतेचा समतोल राखण्यासाठी त्वचेची काळजी घेणे हेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी वरील उपाययोजना करा आणि तब्येत निरोगी ठेवा!

kanitkarrajeev@gmail.com