18 November 2017

News Flash

स्तन्यदा मातेचा आहार

बाळंतपणाच्या वेळी मातेच्या शरीराची झालेली झीज भरून काढणे.

लोकसत्ता टीम | Updated: September 7, 2017 1:41 AM

रंजिता शर्मा-चोबे (आहारतज्ज्ञ)

स्तन्यदा मातेचा आहार कसा असावा?

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे आईचे पिवळे दूध ज्याला चिक किंवा ‘कोलेस्ट्रम’ असे म्हणतात, हे नवजात शिशूसाठी अतिशय पोषक असून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे कार्य करते. त्यासाठी बाळंतपण झाल्याबरोबर नवजात शिशूला आईचे दूध पाजले गेले पाहिजे. आईचे दूध हे बाळाच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. स्तनपानामुळे आईला तसेच बाळाला खूप फायदे होतात. आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक ती सर्व पोषकतत्त्वे योग्य त्या प्रमाणात उपलब्ध असतात. सर्वसाधारण अवस्थेपेक्षा पोषणाच्या दृष्टीने स्तन्यदा मातेला वेगळे मानले जाते.

स्तन्यदा मातेच्या आहाराची गरज वाढण्याची कारणे

 • बाळाचे योग्य पोषण
 • मातेचे कुपोषण टाळणे
 • बाळंतपणाच्या वेळी मातेच्या शरीराची झालेली झीज भरून काढणे.
 • बाळाला चांगल्या दर्जाचे व योग्य त्या प्रमाणात स्तनपान करण्यासाठी आईने स्वतच्या आहारावर भर देणे गरजेचे आहे. कारण जर मातेचे जेवण हे पोषकदृष्टय़ा योग्य असेल तरच आईचे व बाळाचे स्वास्थ्य चांगले राहू शकते.

स्तनपान देणाऱ्या मातांनी खालील गोष्टी आर्वजून कराव्यात

 • दिवसभरातून पाच ते सहा वेळेस खावे.
 • आहारात दूध, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, अंडी, सर्व प्रकारची धान्ये जसे नागली, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू यांचा आर्वजून समावेश करावा.
 • दिवसभरात पिण्याच्या पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे (तीन लिटर) तसेच ताज्या फळांच्या रसाचे सेवन करावे.
 • सकाळच्या व दुपारच्या न्याहारीत पौष्टिक पदार्थ खावेत. जसे राजगिरा खीर, नागली शिरा, कडधान्याची उसळ, डिंकाचे लाडू, आळीव लाडू (खोबरे टाकून), आळीव खीर, अशा पदार्थामुळे दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच दुधाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.
 • आहारात आयोडिनयुक्त मिठाचा वापर करावा.
 • लोहयुक्त पदार्थाचा वापर करावा.
 • जसे हिरव्या पालेभाज्या, आळीव, खजूर, अंजीर, मनुके, बीट, गूळ, शेंगदाणे जेणेकरून शरीरातील कमी झालेले रक्त भरून काढण्यास
 • मदत होईल. लोहयुक्त पदार्थ खात असतांना जीवनसत्त्व ‘क’ घेणे अतिशय आवश्यक असते. त्यासाठी लिंबू, टोमॅटो, संत्री, मोसंबी, मनुके आदींचा वापर करावा.
 • मातेने नेहमी आनंदी वातावरणात स्तनपान करावे.
 • आहारात डांगर, गाजर, पपई, आंबा, पेरू, अननस यांचा समावेश करावा.
 • आहारात पौष्टिक चटण्या जसे तिळाची, जवस, खुरसणी तसेच कोशिंबिरीचा वापर करावा.

स्तनपान देणाऱ्या मातांनी खालील गोष्टी टाळाव्यात

 • अधिक तिखट व वारंवार तळलेले पदार्थ खाऊ नये.
 • चहा किंवा कॉफीचे अधिक सेवन करू नये.
 • स्तनपान करणाऱ्या मातांनी तंबाखू, धूम्रपान, मद्यपान करू नये.
 • बाहेरील उघडय़ावरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत.
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत.

वरील गोष्टी योग्यरीत्या स्तनदा मातांनी अमलात आणल्या तर नक्कीच माता आपल्या शिशूंना चांगल्या प्रकारे स्तनपान करू शकतील. आपल्या देशाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

First Published on September 7, 2017 1:41 am

Web Title: breast feeding mom diet