20 February 2019

News Flash

पिंपळपान : गोखरू

गाईच्या पायाला गोखरूचा काटा टोचतो म्हणून गोक्षुर व खुरांचा वेध घेतो म्हणून गोखरू असे नाव पडले आहे.

गोखरू

गोक्षुरं शरणं गच्छामि। माम रक्षतु गोक्षुर:।।

(शंभर वर्षे जगण्याकरिता गोखरू, निरामय आयुष्याकरिता गोखरू)

डॉ. वा. ग. देसाई यांच्या मते zygophylleoe (झायगोफिलिए) या वर्गात गोखरूचा समावेश होतो. हा वर्ग उष्ण कटिबंधात, परंतु सुक्या जमिनीत होतो. गोखरू पसरणारे लहान औषध ट्रेलिंग प्लँट आहे. या वर्गात क्षुप आणि झाळकट वृक्ष आहेत. या वर्गाचे सताप वर्गाशी साम्य आहे. भारतात सर्वत्र रेती प्रदेशात, रूक्ष जमिनीत, कोकणात कातळावर, राजस्थान, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कच्छ, काठेवाड, बिहार, बंगाल, तामिळनाडू असा सर्वत्र होतो. दक्षिण भारतात समुद्रकाठी होतो. मराठवाडय़ात क्वचित प्रसंगी उकिरडय़ावर, पडीक जमिनीत होतो. गोखरूच्या फळांच्या आकारापेक्षा किंचित लहान चपटय़ा आकाराची फळे असणारे क्षुद्र गोखरू किंवा क्षुद्र सराटे ही एक जात सर्वत्र आढळते. त्याचा औषधांत उपयोग नाही. बडा गोखरू नावाची आणखी एक गोखरूची जात सर्वत्र आढळते. त्याचा औषधांत उपयोग नाही. बडा गोखरू या नावाची आणखी एक गोखरूची जात आहे. त्याला पहाडी गोखरू, दक्षिण गोखरू या नावांनी ओळखले जाते. याला नेमके चार कोटे असतात. या प्रकारांशिवाय हसक नावाची एक जात सिंध, पंजाब, बलुचिस्तान इत्यादी प्रदेशांत आढळते. याचे फळ एका टोकास जाड आणि दुसऱ्या टोकास निमुळते असून त्यास पंख आणि दोन बिया असतात. गोखरूचे मूळ बारीक असून चिकट आणि जास्तीत जास्त लांबी १२ सेंटिमीटर, रंग फिक्कट उदी, चव गोडसर तुरट, किंचित सुगंध असतो. मुळापासून चार ते पाच नाजूक फांद्या निघून त्या जमिनीवर सपाट पसरलेल्या असतात, त्या लोहयुक्त असतात.

गाईच्या पायाला गोखरूचा काटा टोचतो म्हणून गोक्षुर व खुरांचा वेध घेतो म्हणून गोखरू असे नाव पडले आहे. काटे असतात म्हणून कण्ट, फळाची सहा अंगे असतात म्हणून त्यास षडंग, काहींना तीन काटे असतात म्हणून त्रिकण्ट, उसासारखा गोड वास मुळांना येतो म्हणून इक्षुगन्धा, गोखरूचे काटे चवीला गोड म्हणून स्वादुकण्टक, फळे काटेरी असतात म्हणून त्याल कण्टफल असे म्हणतात.

औषधांत प्रामुख्याने फळे आणि मुळे असतात. चूर्णाकरिता फळे, काढय़ासाठी मुळांचा विशेषत्वाने उपयोग केला जातो. संपूर्ण पंचांग ताजे असल्यास त्याचे गुण अधिक असतात. नेहमीच्या वापरासाठी लहान गोखरूचे फळ वापरावे. त्यात शोधन गुण अधिक असतात. बडा गोखरूमध्ये पिच्छिल्ल गुण अधिक आहेत. त्यामुळे त्याचा वापर रसायन, पुष्टिकारक योग, मधुमेह, मूतखडा, प्रदर इत्यादी विकारांत विशेष लाभप्रद आहे. गोखरू, मधुर रस, शीतवीर्य मधुर विपाक, स्निग्ध, गुरू, बल्य गुणाचे आहे. चरकसंहितेप्रमाणे गोखरूचा उपयोग कृमिघ्न, अनुवासनोपग, मूत्रविरेचनीय आणि शोथहर म्हणून सूत्रस्थान अ. ४ मध्ये सांगितला आहे.

सुश्रुताचार्यानी गोखरूचा उपयोग वाताश्मरीभेदनासाठी सांगून, लघु पंचमुळे, कण्टक पंचमुळे, विदारीगंध व वीरतर्वादि गणांत गोखरूचा समावेश केला आहे. औषधीसंग्रह या पुस्तकात गोखरूचा उपयोग स्नेहन, वेदनास्थापन, मूत्रजनन, संग्राहक आणि बल्य म्हणून सांगितला आहे. डॉ. वा. ग. देसाई यांच्या मते गोखरू शीतस्वभावी असून मूत्रपिंडास उत्तेजक आणि मूत्रेन्दियाच्या श्लेषमल त्वचेवर रोपणकार्य होते. गोखरू मूत्रल असल्यामुळे अनुलोमक आहे. लहान प्रमाणात दिल्यास ग्राही आणि मोठय़ा प्रमाणावर दिल्यास सारक गुणाचा लाभ होतो. गोखरू वृष्य, गर्भस्थापक, शीतवीर्य असूनही वातपित्तशामक आहे. गोखरूत वेदनास्थापन हा गुण अल्प प्रमाणात आहे. गोखरू दीर्घकाळ पडून राहिल्यास कीड लागते. असे गोखरू वापरू नये. गोखरूचे शरीरात विविध प्रकारे कार्य चालते. पण प्रामुख्याने चार महत्त्वाचे गुणच शरीरातील विविध स्रोतसांच्या रोगांवर अ‍ॅण्टिबायोटिक्सपेक्षाही व्यापक वाईड स्पेक्ट्रमसारखे काम करताना दिसतात. मूत्रोत्पत्ती, शोथहर, कृमिघ्नता, शीतवीर्य या गुणांमुळे किमान २५ रोग आणि लक्षणांवर गोखरूचा अनिवार्य वापर आहे.

– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on February 6, 2018 4:13 am

Web Title: caltrops fruit