03 March 2021

News Flash

कर्करोगावरील उपचार पद्धती

शस्त्रक्रियेचा मूळ उद्देश हा शरीरातील कर्करोगाच्या गाठी काढून टाकण्यासाठी केला जातो.

 

कर्करोगावर उपचार करण्यासाठी तीन मुख्य उपचार पद्धती उपलब्ध आहेत. शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिओथेरपी या तीन पद्धतींचा वापर कर्करोगाच्या उपचारांसाठी केला जातो. शस्त्रक्रियेचा मूळ उद्देश हा शरीरातील कर्करोगाच्या गाठी काढून टाकण्यासाठी केला जातो. शस्त्रक्रिया करताना रोगाचा संपूर्ण नायनाट करणे म्हणजेच शरीरातून कर्करोगाच्या गाठी काढून टाकणे अतिशय गरजेचे असते. अन्यथा हा आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे कर्करोगाची शस्त्रक्रिया करताना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्लय़ाने करावी आणि काढलेली गाठ तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टकडे तपासण्यास द्यावी. आजच्या घडीला कर्करोगावरील उपचार पद्धती व्यक्तीकेंद्री असून त्यामध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरेपी, रेडिओथेरेपी आणि हार्मोनल थेरेपी अशा विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे आजार किती पसरला आहे, त्याचा स्तर किती आहे हे प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतर ठरविले जाते.

  • व्यक्तीकेंद्री उपचार म्हणजे काय?

रुग्णांचा आजार सारख्याच अवयवाचा असला तरी ते जैविकदृष्टय़ा वेगळे असतात. रुग्णाची शारीरिक स्थिती व उपचारांची गरज तसेच परिस्थिती वेगळी असल्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या व्यक्तीकेंद्री तपासण्या करून उपचार ठरविले जातात.

  • केमोथेरेपी

कर्करोगावर नियंत्रण आणणारी औषधे देऊन उपचार केले जातात. या उपचार पद्धतीला केमोथेरेपी म्हटले जाते. बहुतांश वेळा ही औषधे सलाईनद्वारे रक्तवाहिन्यांना दिली जातात, तसेच याव्यतिरिक्त तोंडावाटे घेण्याच्या औषधांच्या रूपातही दिली जाते.

  • डेफिनेटिव्ह केमोथेरेपी

या उपचार पद्धतीचा वापर मुख्यत्वे रक्ताच्या कर्करोगासाठी वापरली जाते. तसे पाहता कर्करोगासाठी जेव्हा फक्त किमोथेरेपीचा अवलंब केला जातो. तेव्हा डेफिनेटिव्ह केमोथेरेपी म्हटले जाते.

  • निओअॅडज्युव्हन्ट केमोथेरेपी

कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी शस्त्रक्रिया ही उपचार पद्धती वापरली जात असती तरी आजार मोठा असेल तर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी किमोथेरेपीचा अवलंब करून रोगाचे प्रमाण कमी केले जाते. ही उपचार पद्धती छातीच्या गंभीर कर्करोगासाठी वापरली जाते.

  • ॅडजुव्हन्ट केमोथेरेपी

साधारणपणे शस्त्रक्रिया केल्यानंतर केमोथेरेपीचे उपचार केले जातात. त्यावेळी अ‍ॅडज्युव्हन्ट किमोथेरपी केली जाते. महिलांमध्ये आढळणाऱ्या अंडाशयाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रियेनंतर अशा प्रकारच्या केमोथेरेपीचा उपचार केला जातो.

केमोथेरपीचे उपचार दररोज, आठवडय़ाने, तीन आठवडय़ाने किंवा महिन्याने दिले जातात. ते किती प्रमाणात द्यायचे हे रोगाचे निदान, पातळी, रुग्णाचे वय, शारीरिक क्षमता यावरून ठरविले जाते. किमोथेरपीचे उपचार करण्यापूर्वी रक्ताच्या काही चाचण्या करणे आवश्यक असते.

तिसरी महत्त्वाची उपचार पद्धती ही रेडिओथेरपी असून त्यात एक्स-रे किंवा कोबाल्ट गॅमा किरणांचा वापर कर्करोग बरा करण्यासाठी केला जातो. ई. बी. आर. टी. म्हणजे एक्स्टर्नल बीम रेडिओथेरपी आणि ब्रॉकीथेरपी हे रेडिओथेरपीच्या उपचाराचे दोन प्रकार आहेत.

  • एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी

साधारणपणे रेडिओथेरपीचा स्त्रोत शरीराबाहेर ठेवून रेडिओथेरपीचे उपचार केले जातात. लिनियर एक्सलेटर व कोबाल्ट या उपलब्ध असलेल्या मशीनद्वारे हे उपचार केले जातात.

  • ब्रॉकीथेरपी

किरणांचा ( रेडिएशन) स्त्रोत रोगामध्ये किंवा रोगाच्या बाजूला ठेवून जेव्हा उपचार केले जातात, त्या उपचार पद्धतीला ब्रॉकीथेरपी असे म्हणतात. गर्भाशयाच्या कर्करोगात ही उपचार पद्धती सर्रासपणे वापरली जाते.

शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी या तीन उपचार पद्धती गरजेच्या असून कर्करोगाचा उपचार घेताना या तिन्ही उपचार पद्धती जिथे उपलब्ध आहेत, अशाच ठिकाणी उपचार घेण्याचा प्रयत्न करावा.

बऱ्याचदा रुग्णांना अत्यंत तातडीने उपचार घेण्याचे सल्ले दिले जातात आणि कुठल्याही तपासणीशिवाय अर्धवट शस्त्रक्रिया केली जाते. मात्र अशा शस्त्रक्रियेनंतर पुन्हा उपचार घ्यावे लागतात. यातून रुग्णांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान होते. त्यामुळे रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी दबावाला बळी न पडता कर्करोगाच्या गाठीसंबंधी तपासण्या पूर्ण करून, कर्करोगाचा स्तर लक्षात घेऊन योग्य उपचाराची निवड करावी.

कर्करोगाचे उपचार सुरू करण्यापूर्वी वेगवेगळ्या डॉक्टरांकडून सल्ले घेतले जातात. वेगवेगळ्या डॉक्टरांचे मत घेतल्यामुळे रुग्णाला मदत होत असते. मात्र हे मत उपचार सुरू होण्यापूर्वी घ्यावेत. उपचार सुरू झाल्यावर मात्र एकाच डॉक्टरांची उपचार पद्धती आणि त्यांचे मत घ्यावे.

आपल्या आजाराविषयी उपचार पद्धती, खाण्याच्या पद्धती याची माहिती डॉक्टरांकडून घ्यावी. त्याबरोबरच रुग्णाला पडलेल्या शंकाचे डॉक्टरांकडून निरसन करून घ्यावे.

रेडिओलॉजी विभागप्रमुख, कामा अ‍ॅण्ड अ‍ॅडलब्ज रुग्णालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 12:45 am

Web Title: cancer treatment methods
Next Stories
1 प्रकृ‘ती’ : रजोनिवृत्तीनंतरचा रक्तस्राव
2 आयुर्मात्रा : लोणी
3 वातप्रकोप टाळण्यासाठी..
Just Now!
X