21 February 2018

News Flash

मन:शांती : मानसिक आजार.. का?

सिरोटोनिन कमी झाल्याने (मेंदूच्या विशिष्ट भागात) ऑब्सेसिव्ह कम्प्लसिव्ह डिसॉर्डरची लक्षणे दिसू लागतात.

डॉ. अद्वैत पाध्ये | Updated: January 16, 2018 2:02 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

‘डॉक्टर, आमच्या घरात तर काहीच ताणतणाव नाही, टेन्शन घेण्यासारखं काही घडलं नाही, आर्थिक बाबतीत सर्व छान आहे. मुलं छान आहेत. मग का माझ्या पत्नीला डिप्रेशन यावं?’

‘कुठलाही मनोविकार होण्यामागे फक्त बाहेरच्या वातावरणातील सध्याच्या गोष्टीचाच परिणाम होतो असं नाही तर आधी घडलेल्या घटनांचा त्या व्यक्तीने केलेला विचार, त्या व्यक्तीचा स्वभाव तसेच मेंदू, शरीरात होणारे जीवरासायनिक असंतुलन अशी विविध घटकांचा एकत्रित परिणाम होत असतो. याला बायोसायकोसोशल मॉडेल किंवा मनोजैविक सामाजिक प्रारूप असं म्हणतात.

खूप पूर्वी हिप्पोक्रेटसने नैराश्य हे शरीरात ब्लॅक बाइल या जीवरसाचे प्रमाण वाढल्याने होते, असे म्हटले होते. शरीरात चार प्रकारचे जीवरस असतात, त्यांच्या पातळीत चढउतार झाल्याने विविध मनोविकार होतात, असे त्याचे म्हणणे होते; जे आजचे संशोधन बघता खरे होते असेच म्हणता येईल.

आपल्या मेंदूच्या पेशी ऐकमेकांना चिकटलेल्या नसतात, त्यांच्यामधील जागांमध्ये विविध जीवरासायनिक संप्रेरके (न्यूरोट्रान्समीटर) असतात. त्या संप्रेरकांद्वारे संदेशवहनाचे काम होत असते. त्यातूनच विचार, भावना, वागणे, विविध संवेदना, त्यांचे नियंत्रण, बौद्धिक, स्मरणविषयक कार्यही पार पाडायला त्यांची मदत होते. पण याच जीवरासायनिक संप्रेरकांची पातळी कमीजास्त झाल्याने विविध मनोविकार होताना दिसतात. त्याचबरोबर आपल्या मेंदूतच स्वायत्त आणि परास्वायत्त  (सिम्पथेटिक, पॅरासिम्पथेटिक) चेतासंस्था असतात. त्यातील स्वायत्त चेतासंस्थेच्या अतिरिक्त  उद्दीपनामुळे भयगंडासारखे विकार होतात. डोपामिन जास्त आणि सिरोटोनिन कमी झाल्याने स्क्रिझोफेनियाची विविध लक्षणे दिसू लागतात तर सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, डोपामिन यांमधील असंतुलनामुळे नैराश्याची विविध लक्षणे दिसतात. सिरोटोनिन कमी झाल्याने (मेंदूच्या विशिष्ट भागात) ऑब्सेसिव्ह कम्प्लसिव्ह डिसॉर्डरची लक्षणे दिसू लागतात. यात संबंधित व्यक्ती विशिष्ट गोष्टींनी पछाडल्यासारखी वागू लागतात.

शरीरातील संप्रेरकांचा व मनाचा, मेंदूचा जवळचा संबंध असतो. थॉयराइडचे प्रमाण रक्तात वाढल्याने चिंतेचे विकार तर कमी झाल्याने नैराश्याचे विकार होतात. अनुवांशिकतादेखील या विकारांवर प्रभाव टाकते. घरात कोणाला मनोविकार असेल तर इतर व्यक्तींना  होण्याची (भाऊ , बहीण, रक्ताची नाती) शक्यता बळावते. मनोविकार नाही झाले तरी व्यक्तिमत्त्व दोषांच्या रूपात तरी नक्कीच आढळून येते. स्किझोफ्रेनियासारख्या आजारांचे आणि स्मृतिभ्रंशांच्या (अल्झायमर) गुणसूत्रांचे शोध लागत आहेत, ज्यामुळे औषधोपचार अधिक प्रभावी होऊ शकतील.

मानसशास्त्रीय कारणांमध्ये एखाद्या घटनेचा आपण कसा विचार करतो, आपला दृष्टिकोन, आपले व्यक्तिमत्त्व दोष, बौद्धिक क्षमता हे घटकही महत्त्वाचे असतात. नापास होणाऱ्या सर्वानाच नैराश्य येत नाही, पण नापास होणे म्हणजे महाभयानक, मी कोणाला तोंड दाखवू शकणार नाही असा विचार करणारी व्यक्ती निराश होईल. निराशावादी, परावलंबी, जबाबदारी टाळणाऱ्या मानसिकतेच्या व्यक्तींना नैराश्य लवकर येते. अतिचिकित्सक, अतिव्यवस्थित व्यक्तींना चिंता, नैराश्य, ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर होण्याची शक्यता जास्त असते.

एकलकोंडया, संशयी व्यक्तींना स्क्रिझोफेनिया, सायकोसिसचे विकार जास्त लवकर होतात वा टिकून राहतात, तर बॉर्डरलाइन व्यक्तिमत्त्व दोषांच्या व्यक्ती पटकन आक्रस्ताळेपणा, अतिक्रोध, नैराश्य, व्यसनांना बळी पडतात, तर अहंकारी व्यक्ती समस्याच नाकारतात त्यामुळे उपाय/उपचारदेखील!

अतिबुद्धीला योग्य न्याय न मिळाल्यास नैराश्य पटकन येते तर गतिमंद, मतिमंद मुलांमध्ये सायकोसिस, स्क्रिझोफेनिया, मंत्रचळ (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) हे विकार जास्त आढळतात. थोडक्यात, आपला दृष्टिकोन, व्यक्तिमत्त्व दोष, बौद्धिक पातळी, भावनांक हे मनोविकार व्हायला, दीर्घकालीन राहायला वा बळावायला महत्त्वाचे घटक ठरतात!

व्यक्तिगत आयुष्यात येणारे ताणतणाव उदा. जोडीदाराचा वियोग/घटस्फोट, अपयश, आर्थिक नुकसान, बेकारी, सामाजिक पातळीवर होणारी हेटाळणी, निंदा, दुजाभाव, सामाजिक आपत्ती (दंगली), नैसर्गिक आपत्ती या गोष्टी चिंता, नैराश्य, होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. कुटुंबातील व्यक्तींचे आंतरसंबंध, त्यातील तणाव, अढी यामुळेदेखील नैराश्य, चिंता बळावू शकते.

त्याचबरोबर कुटुंबात मनोविकार झालेल्या व्यक्तीचा होणारा सकारात्मक/नकारात्मक स्वीकार, मनोविकाराचा पूर्ण स्वीकार हा घटक उपचारांचे यशापयश ठरवायला महत्त्वाचा असतो. कुटुंबाकडून होणारे अतिलाड, जपणूक किंवा हेटाळणी, दुर्लक्ष, उपचारात, विकार बरा होण्यात बाधा ठरतात.

थोडक्यात जैविक, मानसिक, सामाजिक/कौटुंबिक सर्व घटक हातात हात घालून मनोविकार व्हायला किंवा तो बळावायला मदत करतात. त्यामुळे उपचारदेखील औषधोपचार, मानसोपचार /समुपदेशन, गट मानसोपचार, पुनर्वसन असे एकत्रितपणे घ्यावे लागतात!

-डॉ. अद्वैत पाध्ये – Adwaitpadhye1972@gmail.com

First Published on January 16, 2018 2:02 am

Web Title: cause of mental disorders
  1. Ramkrishna Phadtare
    Jan 17, 2018 at 1:18 pm
    माफी असावी... विषय स्पष्टपणे कळाला नाही, साधारण व्यक्तीला ह्या मोठ्या मोठ्या आजारांची नावे आणि त्याचे होणारे परिणाम अस्पष्ट आहेत. मनः शांती मानसिक आजार का? ह्या प्रश्नचिन्हात लेखक आपण अर्जुन असल्याचे सांगताना आढळले, पण चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूची मानसिक अवस्था ही त्यालाच कळेल तेव्हा आपण ा महाभारतातले संजय वातलात. जे सर्वकाही पाहून पण काहीच करू शकत नाहीत. रामकृष्ण सु फडतरे 9860578835
    Reply