03 June 2020

News Flash

मानसिक आजार.. कारण काय?

सर्व व्यक्तींमध्ये मानसिक आजाराचे कुठले ना कुठले, कमी किंवा जास्त प्रमाणात जनुके असतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

वाणी कुल्हळी

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दोन वर्षांत आलेल्या रुग्णांचा अभ्यास केला गेला, तेव्हा लठ्ठपणामुळे होत असलेल्या मधुमेह, हृदविकार किंवा रक्तदाबापेक्षाही मनोविकाराचे प्रमाण अधिक आढळले. राज्याच्या विविध भागांतून मुंबईतील प्रमुख रुग्णालयांमध्ये आलेल्या साडेपाच लाखांपैकी ३१ टक्के रुग्णांना मनोविकारांच्या तक्रारी होत्या. मानसिक ताणतणाव तर सर्वानीच अनुभवलेले असतात, मात्र त्याचा नैराश्याकडे प्रवास कसा होतो, स्क्रिझोफेनिया, दुभंग व्यक्तिमत्त्व असे आजार कसे होतात याविषयी माहिती करून देणारा लेख..

मन म्हणजे मेंदू. भावनिक आणि बौद्धिक कार्य करणारा हा शरीराचा अवयव आहे. मेंदूचे काम बिघडल्यावर भावनिक किंवा बौद्धिक पातळीवर दिसणाऱ्या लक्षणांना आपण मानसिक आजार  म्हणतो. मानसिक आजाराचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मेंदूत होणारे सूक्ष्म बदल. हे बदल साधारणपणे तपासणीत दिसून येत नाहीत. यासाठी मेंदूचे काम दर्शवणारी, रक्तपुरवठा दाखवणारी किंवा पेशींमधील विशिष्ट बदल दिसणाऱ्या तपासण्या कराव्या लागतात. पण या तपासण्या संशोधनासाठीच वापरल्या जातात. कारण आजाराचे स्वरूप बहुतेक वेळा त्याच्या लक्षणावरून समजून येते आणि शिवाय या तपासण्या खूप महागडय़ा असतात. शरीराची रचना ठरवणारी जनुके प्रत्येक पेशीत असतात. ही जनुके आई-वडिलांकडून मिळतात आणि शिवाय गर्भावस्थेत त्यात काही बदल होतात. सर्व मानसिक आजारांमध्ये जीन्समधील दोष हे कारण असते. पण हे आनुवंशिकच असले पाहिजे असे काही नाही. कारण व्यक्तीच्या जीनमध्ये आपोआपही बदल होऊ  शकतात. जनुके जन्मापासून शरीरात असले तरीही मानसिक आजार जन्मानंतर बऱ्याच काळांनी होतात याचे कारण आजुबाजूला घडणाऱ्या घटना आणि आयुष्यात येणारे आव्हानात्मक प्रसंग.

मानसिक आजारांमध्ये अतिनैराश्याचे प्रमाण सर्वात जास्त असते. अतिनैराश्याचे दोन प्रकार असतात- एक युनिपोलर म्हणजे फक्त नैराश्याची लक्षणे असणारा आणि दुसरा बायपोलर म्हणजे नैराश्य आणि अतीव आनंदाची लक्षणे असणारा. या दोन आजारांत बायपोलरमध्ये जीनमधील बदल जास्त प्रमाणात आढळतो. मेंदू आणि शरीराचे आजार, मेंदूला इजा होणे, विषारी- अमली पदार्थाचे सेवन आणि आयुष्यातील ताण-तणाव यांमुळे कुठलाही मानसिक आजार उद्भवू शकतो किंवा वाढू शकतो. पण अतिनैराश्य येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. स्क्रिझोफेनिया, अतिसंशय (ओब्सेसिव कॅम्पल्सिव डिसॉर्डर), घाबरटपणा या आजारांमध्ये जनुकांमधील बदल जास्त महत्त्वाचे ठरतात. आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आनुवंशिकतेचा जास्त वाटा असतो.

स्क्रिझोफेनियामध्ये जनुकांमधील बदल आनुवंशिक असू शकतात किंवा गर्भवती मातेला फ्लू झाल्यास किंवा ती कुपोषित असल्यास भ्रूणावस्थेतील मुलाला स्क्रिझोफेनिया होण्याची शक्यता असते. पाश्चात्त्य देशात गरोदर महिलांची नीट काळजी घेतल्यामुळे स्क्रिझोफेनियाचे प्रमाण कमी झालेले आढळून आले आहे. ज्या महिलांमध्ये अतिसंशयाचे जीन असते, ते इतर वेळेला सुप्तावस्थेत राहते. मात्र अनेकदा गर्भारपणातील हार्मोनमधील बदलांमुळे लक्षणे दिसू लागतात आणि आजार सुरू होतो. अति अस्वस्थपणा (किंवा घाबरटपणा) साठीही बहुतेकदा शरीरातील जीन कारणीभूत ठरतात. लहानपणी अति रागावणे-घाबरवणे अथवा त्याउलट अति सांभाळणे, कुठल्याही प्रकारचे शोषण, मोठे अपघात यांमुळेही घाबरटपणा वाढीस लागतो.

सर्व व्यक्तींमध्ये मानसिक आजाराचे कुठले ना कुठले, कमी किंवा जास्त प्रमाणात जनुके असतात. ती प्रखर किंवा सौम्य असतात. मात्र सातत्याने येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक तणावामुळे ही लक्षणे उफाळून येतात आणि आजार सुरू होतो. सौम्य प्रकारची जनुके असल्यास आजार पटकन होत नाही. मात्र अतिताण, सतत ताण अनुभवल्यावर लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळे ज्यांच्या कुटुंबामध्ये अनेक व्यक्तींना मानसिक आजार आहेत, त्यांच्या शरीरातील जनुके प्रखर असतात किंवा त्यांच्या कुटुंबातील तणाव जास्त असतो. मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणे हा आजार टाळण्याचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. ताण-तणाव कमी कसे करावे किंवा त्याचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकायला हवे. अमली पदार्थापासून दूर राहावे. त्याचप्रमाणे अपघातामुळे मेंदूला मार लागण्याची शक्यता असल्याने वाहन चालवताना काळजी घ्यावी. आजाराची लक्षणे दिसून येताच लवकरात लवकर उपचार सुरू करावेत. अशा आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांची गैरज असते, हे लक्षात घ्यावे.

मुंबई महानगैरपालिकेने केलेल्या संशोधनात रुग्णालयातील मानसिक आजारांचे प्रमाण ३१ टक्के म्हणजे खूप जास्त आढळून आले. याचे मुख्य कारण म्हणजे रुग्णालयातील व्यक्ती गंभीर आजारी, एकापेक्षा जास्त आजारांनी ग्रासलेले असतात. त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक ताणाव जास्त असतो आणि मेंदूवरही दुष्परिणाम झाल्याची शक्यता असते. याशिवाय बहुतेक मानसिक आजारांमुळे आर्थिक-सामाजिक परिस्थिती खालावते. म्हणून कनिष्ठ वर्गातील व्यक्तींमध्ये हे आजार जास्त प्रमाणात आढळतात आणि ते सरकारी रुग्णालयात, जिथे कनिष्ठ वर्गातील रुग्ण जास्त असतात, तिथे आढळतात. जनसामान्यांमध्ये किंवा फॅमिली डॉक्टरकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण १०-१५ टक्के असते. त्यातसुद्धा ९० टक्के आजार सौम्य आणि बरे होणारे असतात.

मानसिक आजाराचे नेमके कारण आपल्याला माहीत नाही. (संसर्गजन्य आजार सोडले तर शरीरातील बहुतेक आजारांची हीच परिस्थिती आहे.) एका व्यक्तीमध्ये एक विशिष्ट आजार का झाला हे अद्यापही आपल्याला कळलेले नाही. किंवा एखादा आजार का होतो हेही सांगणे कठीण आहे. पण आरोग्य चांगले ठेवणे, शारीरिक आजारांना नियंत्रणात ठेवणे, ताण-तणाव कमी अनुभवणे आणि अमली पदार्थापासून दूर राहणे यामुळे मानसिक आजार कमीत कमी होतात. हे मात्र नक्की आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2018 1:15 am

Web Title: causes of mental disorders mental health problems
Next Stories
1 पोटाचा घेर वाढलाय?
2 मन:शांती : शॉक, नव्हे उपचार!
3 पिंपळपान : चित्रक
Just Now!
X