20 September 2020

News Flash

पथ्य अपथ्य ! उष्णविकार

केरळमध्ये विविध वनस्पतींयुक्त गरम पाणी सेवन करण्याची प्रथा आहे

उन्हाळ्यात आग होत असल्यास थंड पाणी सेवन केल्यास अत्यंत फायदा होतो

उन्हाळा वाढल्यानंतर विविध प्रकारचे उष्णतेचे विकार वाढायला सुरुवात होते. खर तर खूप व्यक्तींना मुळातच काही पित्ताचे विकार किंवा तत्सम उष्णतेने वाढणाऱ्या व्याधी किंवा लक्षणे असतात आणि ती वातावरणातील उष्म्याने वाढू लागतात. परंतु उन्हामुळे व्यक्तींना तहान लागणे, शरीरात आग होणे, पोटात आग होणे, घाम येणे, चक्कर येणे, थकवा येणे, पोटऱ्या दुखणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. उन्हाळा हे एक कारण असले तरी या सर्व लक्षणांना निर्माण करणारी शरीराची त्रीदोषांची विकृत अवस्था वेगळी असल्याने ‘एकच पथ्य’ नसून शास्त्रकारांनी त्यांना विभक्तपणे वर्णन करून आरोग्य संस्थापन करण्यासाठी निश्चित आणि नेमकी कल्पना मांडली आहे.

उन्हाळ्यात शरीर व मनाच्या आरोग्याच्या तक्रारी अगदी तापापासून ते थेट नागीण, कांजण्यांपर्यंत दिसू लागतात. खरं तर योग्य आहार नियोजन आणि विहार नियोजन त्यामध्ये वस्त्र, त्यांचे रंग, सायंकाळची वस्त्र, बिछान्यावरील वस्त्र अशा अनेक अनेक गोष्टींचा विचार युक्तीपूर्वक केल्यास उन्हाळा साजरा करता येईल. एक तर खाण्याची चंगळ उन्हाळ्यात असते. ताडगोळे, तोंडाला पाणी आणणाऱ्या कैरीपासून ते आंब्यापर्यंत, ओले काजू, कुयरी, करवंद, त्यांचे विविध पदार्थ शरीराला अगदी तृप्त करतात. त्यांचा उपभोग घेता आला पाहिजे. यासाठी उन्हाळ्यातील पथ्य आणि अपथ्य यांचे उत्तम नियोजन करायला हवे. उन्हाळ्यात पाणी हाच पदार्थ मुळात योजायला हवा. केरळमध्ये विविध वनस्पतींयुक्त गरम पाणी सेवन करण्याची प्रथा आहे. हे पाणी सगळ्यांना दिले जाते. अनेक जण हे पाणी बाटलीतून घेऊन फिरतात आणि तिथे उन्हाळ्याचे विकार अत्यल्प होताना दिसतात. कारण त्यांनी पाण्यावर शरीराचे नियोजन केले आहे. या पाण्यात नागरमोथा, जेष्ठमध, थोडसे चंदन, खैरसाल, सुंठ यांचे मिश्रण असते. या बरोबर साथ असते ती ताकाची. त्याला ‘मोर’ असे म्हणतात. हे पाणी तहान भागवते. सतत पाणी सेवन करण्याची ओढ कमी करते. शरीर थंड तर ठेवतेच. पण भूकही वाढवते. त्वचा थंड ठेवण्याचे विशेष काम हे करते. सौंदर्य वाढवते, लघवीचा त्रास कमी करून पोटाचाही त्रास कमी करते. पाण्याच्या सेवनाला खूप महत्त्व आहे उन्हाळ्यात.

खूप व्यक्तींना मुळातच काही पित्ताचे विकार किंवा तत्सम उष्णतेने वाढणाऱ्या व्याधी किंवा लक्षणे असतात व ती वातावरणातील उष्म्याने वाढू लागतात. तहान लागणे, शरीरात आग होणे, पोटात आग होणे, घाम येणे, चक्कर येणे, थकवा येणे, पोटऱ्या दुखणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात.

पथ्य

उष्णता असताना कोणती भाजी खावी हा गहन प्रश्न असंख्य गृहिणींच्या मनात येतो आणि उपलब्ध असलेल्या भाज्या तयार केल्या जातात. अंगात आग होत असल्यास किंवा तहान अधिक लागत असल्यास केळफूल व पडवळाची भाजी रुचकर आणि बलप्रद ठरते, तसेच गारवा देते. फणसाच्या बियांची भाजी चांगली पथ्यकारक ठरते. आग होत असताना तोंडली, दुधीभोपळा, पालक या भाज्या योग्य पद्धतीने केल्यास उपयुक्त ठरतात. मेथी मात्र दोन्ही अवस्थेत अयोग्य असून दाह, तहान तसेच उष्णता वाढवणारी ठरते. डांगर, वांगी, शेवगा या भाज्या शरीराची आग होत असताना टाळाव्यात. शेवग्याची फुले आणि पाने मात्र याला अपवाद ठरतात. उष्णतेमुळे घेरी येत असल्यास पालेभाज्या खाऊ नयेत, तसेच उष्णतेच्या त्रासात कारलीदेखील टाळायला हवीत. कोहळ्याचा मात्र उष्णतेमध्ये खूप प्रमाणात उपयोग होतो, म्हणून भोपळ्याऐवजी कोहळा उष्णतेत सतत खावा. कोहळ्याचे सूप, कोहळ्याचे पराठे, पेठा आदी प्रकारे कोहळा वापरता येतो. ‘कोहळापाक’ हा एक अत्यंत प्रसिद्ध प्रकार बलवर्धक ठरतो. शरीराची आग होत असताना तसेच तहान अधिक लागत असताना काकडी हा उत्तम पदार्थ आहे. काकडीची कोशिंबीर मात्र(दह्य़ामुळे) वर्ज्य आहे. केवळ काकडी जमल्यास किंचित मिरपूड टाकून घ्यावी. मात्र त्यावर पाणी सेवन करू नये हे ध्यानात असावे.

कोणती फळे उपयुक्त?

उष्णतेत तहान असताना भगर, साळीचे तांदूळ आणि ज्वारी फायदा करतात. मात्र शरीराची आग होत असल्यास भगर, नाचणी यांचे सेवन करू नये. तांदूळ, साळीच्या लाह्या, सातूचे पीठ सेवन करावे. पित्तामुळे घेरी येत असल्यास मका, मटार, नाचणी वर्ज्य करावेत. मात्र तांदूळ सातूसह गहू खावेत. फळांमध्ये कैरीचा काही अवस्थेतला अपवाद वगळता सर्व आंबट फळे सेवन करावीत . स्ट्रॉबेरी, आलूबुखार, अननस, कलिंगडदेखील उष्णता, आग, तहान किंवा चक्कर येणे या अवस्थांमध्ये खाऊ  नये, असे शास्त्रीय मत आहे. आवळा मात्र उष्णता, तहान सर्वामध्ये गुणकारक ठरतो. केळी, द्राक्ष, डाळिंब, कवठ, फालसा हे सर्व अवस्थांमध्ये तर तहानेमध्ये करवंद उपयोगी ठरतात. नारळाचे पाणी तहान व उष्णतेवर उत्तम औषध आहे. कफाचा त्रास असणाऱ्यांनी त्यात आले टाकून घेतल्यास तर लिंबू टाकल्यास एक अप्रतिम पेय होते. तहान असताना मसाल्यापैकी वेलची, जायफळ गुणकारी ठरतात, परंतु आग होत असताना नव्हे. कोथिंबीर मात्र सर्व ठिकाणी गुणकारक ठरते. तहानेमध्ये टोमॅटो खाऊ नये, तसेच मीठ व मसालेदार पदार्थ हे तहान व आग होत असताना टाळावेत. शरीराची आग होत असताना कांदा-लसूण खाऊ  नये, असे शास्त्रकारांनी ठासून सांगितले आहे. मात्र तहानेमध्ये त्याचा उपयोग होतो. आग होत असताना गाजराचे सेवनही करू नये.

पाणी हे अमृत

उन्हाळ्यात आग होत असल्यास थंड पाणी, वाळा, चंदन घातलेले पाणी किंवा कापराने सिद्ध केलेले पाणी सेवन केल्यास अत्यंत फायदा होतो, तर सारखी तहान लागत असल्यास तांब्याच्या वा चांदीच्या पात्रातील पाणी तसेच नारळाच्या पाण्याने बरे वाटते. या अवस्थेत धने, जिरे टाकून सिद्ध केलेले पाणीही उत्तम गुणकारक ठरते. लघवीला जळजळ होत असल्यासही धने, जिरे, बडीशेप टाकून पाणी सिद्ध करावे आणि तेच प्यावे. लघवीच्या तक्रारीमुळे थकवा येत असल्यास या पाण्यात गोखरू टाकून पाणी प्यावे. अत्यंत लाभप्रद ठरते. मातीच्या भांडय़ातील पाण्यामध्ये नैसर्गिक गुणांची वृद्धी होते. नैसर्गिक शीतलता मिळते. ज्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. माती नंतर तांब्याच्या भांडय़ातील पाणी थंड असून कफनाशन करणारे आहे. ताम्रानंतर कास्याच्या भांडय़ातील पाणी हे उत्तम तर चांदीमध्ये पाणी शुद्ध होते. मात्र गरम राहते.

काय खावे, काय नको?

* शरीराची उष्णता होत असताना वय, प्रकृती व अवस्थेप्रमाणे दूध, तूप, लोण्याचे यथेच्छ सेवन करून आरोग्य प्रस्थापित करता येते, तर तहानेचा त्रास असताना केवळ गायीचे दूधच सेवन करता येते.

* शास्त्रकारांनी दोन्ही अवस्थांमध्ये दही टाळायला सांगितले आहे. चक्कर, गरगर या त्रासामध्ये गायीचे तूप व लोणीच सेवन करावे.

* पातळ ताक, धने, जिरे आणि कोथिंबीर यांनी सिद्ध केलेले असेल तर लघवीच्या तक्रारीमध्ये गुणकारक ठरते.

* शरीरात आग होत असता साळीच्या लाह्य़ांचे पाणी सेवन केल्याने चांगला फायदा होतो.

* शरीरात दाह होत असताना किंवा चक्कर येत असताना गरम पाण्याचे सेवन करू नये. लक्षणे बळावण्याची शक्यता असते.

* उष्णतेच्या कारणांनी होत असलेल्या सर्व अवस्थांमध्ये मूग, मसूर व हिरव्या मटारचे सेवन केल्यास फायदा होतो.

* हिरव्या मुगाला शास्त्रकारांनी महत्त्व दिले असून लहान मुले, स्त्रिया, वृद्ध, गर्भिणी या सर्वानी हिरव्या मुगाच्या लाडूचे सेवन करावे. थकवा कमी होतो, बल वाढते. त्वचेला संरक्षण मिळते आणि भूक उत्तम राहण्यास मदत होते.

* तहानेच्या त्रासामध्ये ओली हळद व आले यांचे सेवन उपयुक्त ठरते. पोटामध्ये आग होत असताना ओली हळद तसेच शिंगाडा व शिंगाडय़ाचे पदार्थ व कामलकंदाची पाण्यात केलेली खीर चांगला गुण देते.

* दाह असता खिरीमध्ये खडीसाखर टाकून घ्यावी. खडीसाखरेला अनैसर्गिक साखरेपेक्षा अधिक महत्त्व आहे हे गुणांनी सिद्ध झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 1:57 am

Web Title: causes symptoms and diagnosis of heat related illness
Next Stories
1 मन:शांती : नेटका औषधोपचार!
2 पिंपळपान : खरबूज
3 बोटॉक्सची मोहिनी
Just Now!
X