12 December 2017

News Flash

छातीत दुखणं किती गंभीर?

छातीत दुखतं म्हणून भरपूर पैसे खर्च करून काहीच निष्पन्न न झालेल्यांची संख्याही कमी नाही.

डॉ. सतीश नाईक | Updated: September 28, 2017 2:10 AM

छातीच्या दुखण्याने कोणीही भयभीत होणं साहजिक आहे. अर्थात याची दुसरी बाजूसुद्धा तितकीच लक्षात घेण्यासारखी आहे. छातीत दुखतं म्हणून भरपूर पैसे खर्च करून काहीच निष्पन्न न झालेल्यांची संख्याही कमी नाही. अशावेळी छातीत कळ यायला लागली तर केव्हा, कितीही खर्च करावा लागला तरी ताबडतोब उपचार करायचे आणि केव्हा निवांत राहायचं हे कळलं तर अनेकाचे जीव वाचतील व इतरांचे नाहक फुकट जाणारे पैसे वाचतील.

छातीत दुखतंय असं कोणीही म्हटलं की धडकीच भरते. सगळ्यात पहिल्यांदा विचार येतो तो हृदयाचा. आता तर या गोष्टीला फारच महत्त्व आलेलं आहे. कारण नियमित व्यायाम करायला जाणारी अगदी तरुण मंडळीदेखील व्यायाम करता करता हृदयविकाराची शिकार होऊ  लागली आहेत. त्यामुळं छातीच्या दुखण्याने कोणीही भयभीत होणं साहजिक आहे. अर्थात याची दुसरी बाजूसुद्धा तितकीच लक्षात घेण्यासारखी आहे. छातीत दुखतं म्हणून भरपूर पैसे खर्च करून काहीच निष्पन्न न झालेल्यांची संख्याही कमी नाही. अशावेळी छातीत कळ यायला लागली तर केव्हा, कितीही खर्च करावा लागला तरी ताबडतोब उपचार करायचे आणि केव्हा निवांत राहायचं हे कळलं तर काहींचे जीव वाचतील व इतरांचे नाहक फुकट जाणारे पैसे वाचतील.

प्रथम गंभीर आजारांकडे वळू या. छातीच्या दुखण्याशी संबंधित चार प्रश्न निश्चितच गंभीर असतात. ते असतील तर जीव जाण्याची शक्यता मोठी असते. हृदयविकाराचा झटका हे त्यातलं सर्वात आघाडीचं कारण. अचानक छातीच्या मध्यभागी वेदना सुरू झाली तर पहिल्यांदा याचाच विचार केला जायला हवा. हृदयाशी निगडित असलेलं दुखणं बहुदा मध्यभागी असतं. एक नक्की की जेव्हा जेव्हा चालल्यावर किंवा व्यायाम केल्यावर दुखायला सुरुवात झाली आणि आराम केला की बरं वाटलं तर ती वेदना हृदयाशी संबंधित आहे.  दुसरी महत्त्वाची बाब दम लागण्याची. पायऱ्या चढल्यावर कोणालाही श्वास लागू शकतो. पण पूर्वी तीन चार जिने सहज चढून जाणारी व्यक्ती एक दोन मजले चढल्यावर धापा टाकायला लागली अथवा मैलभर धावल्यानंतरही कुणाशीही सहज गप्पा मारू शकणारा माणूस १००-२०० मीटरनंतर चार वाक्य सलग न उच्चारता तुटक तुटक बोलायला लागला की त्यांनी आपल्या हृदयाची तपासणी लवकरात लवकर करून घ्यायलाच हवी.

लवकरात लवकर ही गोष्ट मनावर घेणं अत्यंत आवश्यक आहे. छातीत कळ आल्यावर जितक्या झटपट तुम्ही रुग्णालय गाठाल -जिथं आयसीयूची सोय आहे असं रुग्णालय- दवाखाना नव्हे, तितकी मोठे प्रश्न निर्माण व्हायची शक्यता कमी. बरेच जण आधी गॅस असेल म्हणून औषध घेत बसतात. घरचे उपाय करण्यात निष्कारण वेळ दवडतात. इथं ‘टाइम इज मसल’ हे इंग्रजी वचन प्रत्येकाने मनावर बिंबवून ठेवायला हवं. त्यावर पुन्हा घरची मंडळी काय झालं, कसं झालं याची चौकशी करून रुग्णाला भंडावून सोडतात. त्यांनी लक्षात ठेवावं की प्रश्न विचारत बसण्यापेक्षा कमीत कमी वेळात रुग्णालयात रुग्णाला कसं पोहोचवता येईल हे पाहणं उत्तम. कारण एकदा का हृदयाच्या स्नायूंना दुखापत झाली की मग ते इजा झालेलं हृदय तुमची किती साथ देईल ते सांगता येत नाही. रुग्णालय निवडताना मुंबईसारख्या शहरात वाहतूककोंडीत जाणारा वेळी विचारात घ्यावा. कधी कधी मोठय़ा, सर्व सोयी असलेल्या रुग्णालयापर्यंत जाण्याऐवजी, जवळचं थोडय़ा कमी सोयी असलेलं रुग्णालयदेखील चालेल. रुग्णाला पटकन उपचार मिळणं गरजेचं.

काही व्यक्तींनी हृदयरोगाच्या बाबतीत नेहमीच जागरूक असलं पाहिजे. ज्यांच्या कुटुंबात कमी वयात हृदयरोग झाल्याचा इतिहास आहे, ज्यांचं कोलेस्टेरॉल खूप जास्त आहे, जे धूम्रपान करतात, ज्यांना मधुमेह, रक्तदाब आहे त्यांनी नक्कीच सावध असायला हवं. आपला बेसलाइन कार्डियोग्रॅम काढून घ्यायला हवा. म्हणजे त्यात झालेला सूक्ष्म बदलदेखील डॉक्टर ओळखू शकतील. अशा कार्डियोग्रॅमचा फोटो तुमच्या मोबाइल कॅमेऱ्यामध्ये जपून ठेवा. शोधाशोध करण्यात वेळ जात नाही. शिवाय त्या कार्डियोग्रॅमची झेरॉक्स काढून ठेवायला हवी कारण त्यासाठी वापरलेले कागद थर्मल असतात. कालांतरानं त्यांची शाई उडून जाते.

काही लक्षणं क्वचित दिसतात. परंतु ती हृदयरोगाशी संबंधित असू शकतात. जबडा वा खालचे दात अचानक दुखणं किंवा सारख्या उचक्या लागणं, छातीत भरून येणं, अकस्मात घेरी येणं, कोणीतरी गळा दाबतंय असं वाटणं, छातीत धडधडणं ही लक्षणं हृदयाकडे बोट दाखवतात. थंडीच्या दिवसात सकाळी उठल्या उठल्या छातीत भरून यायला लागलं तर कृपया अपचन म्हणून सोडून देऊ नये. रात्री वेळेवर झालेल्या जेवणाचं सकाळी अपचन कसं होणार? त्याची शहानिशा व्हायलाच हवी. फारतर थोडे पैसे जातील पण जीवाला काही होणार नाही. खूप तणावाखाली असतानाही छातीत भरून येणं दुर्लक्षून चालत नाही. व्यायाम करायला सुरुवात करण्यापूर्वी रात्रीची व्यवस्थित झालेली झोप आणि वॉर्मअप महत्त्वाचा आहे. आताशा व्यायाम करताना तरुण मंडळी दगावताहेत म्हणून हे सांगणं.

छातीत केवळ हृदय नसतं. इतर इंद्रियांचे काही प्रश्न जीवावर बेतू शकतात. बरेच दिवस रक्तदाब अनियंत्रित असणाऱ्या काही मंडळींमध्ये आपली मोठी रक्तवाहिनी दुभाजत जाण्याचा धोका असतो. रक्ताची गुठळी आल्यानं फुप्फुसाची रक्तवाहिनी बंद होऊ  शकते. हृदयाच्या आवरणात पाणी भरू शकतं. ही सगळीदेखील जीवघेणी दुखणी आहेत याचीही आपल्याला जाणीव हवी.

आता छातीतली कुठली दुखणी तितकीशी गंभीर नाहीत हे पाहायला हवं. बऱ्याच दिवसांपासून एखाद्याच्या छातीत दुखत असेल तर त्यामागं गंभीर कारण असायची शक्यता कमीच. हृदयाचं दुखणं असतं तर इतक्या दिवसात काहीतरी विपरीत चिन्हं दिसलीच असती की! छातीतली दुखरी जागा एका बोटानं दाखवणं शक्य असल्यास अथवा श्वास घेताना किंवा काम करताना दुखलं, कुशीमध्ये कळ येत असली म्हणजे निश्चिंत व्हायला हरकत नाही. बहुदा इतर कुठलाही आजार नसलेल्या रजोवयातल्या स्त्रियांचे हॉर्मोन्स त्यांचं हृदयरोगापासून रक्षण करतात. बहुदा म्हणायचं कारण नुकत्याच आलेल्या काही बातम्या. एक व्यायाम आणि दुसरी रंगमंचावर नाच करताना गेल्याच्या आठवणी अजून ताज्याच आहेत.

dr.satishnaik.mumbai@gmail.com

First Published on September 28, 2017 2:10 am

Web Title: chest pain issue chest pain solution