16 October 2019

News Flash

चिकुनगुनिया

चिकुनगुनिया हा आजार नावाने परिचित झाला असला तरी डेंग्यूप्रमाणे त्यांच्या अस्तित्वाने खळबळ उडताना दिसते.

|| वैद्य विक्रांत जाधव

चिकुनगुनिया हा आजार नावाने परिचित झाला असला तरी डेंग्यूप्रमाणे त्यांच्या अस्तित्वाने खळबळ उडताना दिसते. या आजारामध्ये सांध्यांचे दुखणे हे प्रमुख लक्षण असले तरी हे दुखणे प्रामुख्याने बराच काळ राहते. या आजारामध्ये व्यक्ती ताप, सांधेदुखी, सांध्याना आलेली सूज यामुळे हैराण होतोच, शिवाय औषधांचे सेवन करूनही वैतागतो. या आजारामध्ये कमालीचा अशक्तपणा अंगामध्ये येतो. तेव्हा या अवस्थेमध्ये योग्य आहार घेतल्यास या आजारावर मात करणे सहज शक्य आहे.

काय खावे? – चिकुनगुनियाच्या पहिल्या अवस्थेत ताप कमी झाल्यानंतर गायीचे तूप, लोणी, दुधाचे सेवन केल्यास अशक्तपणा कमी होऊन सांध्यांमध्ये जोर येतो. पचवण्याची शक्ती उत्तम असल्यास तुपाचे सेवन केले तरी चालेल. काही रुग्णांना कोरडा खोकला होतो. सारखे खोकून छातीत दुखू लागते. अशा रुग्णांनी शेळीचे दूध, तूप सेवन केल्याने चांगला आराम मिळतो (सूज असताना मात्र दुग्धजन्य पदार्थ टाळावेत). चिकुनगुनियाच्या इतर अवस्थेत काळीमिरी घालून पनीरचे सेवन करावे. चीझचाही आहारामध्ये तसाच अल्प प्रमाणात वापर करावयास हरकत नाही. सांधे जखडले असता गर्भवती किंवा अशक्त स्त्रियांनी खव्याचे पदार्थ खाल्ल्यास फायदा होतो. चिकुनगुनियाच्या पहिल्या ज्वर (ताप) आणि त्वचेवर पुरळ येण्याच्या अवस्थेत हळदीचे सेवन उत्तम ठरते. हळदीचा वापर केवळ पाण्यातूनही केल्यास उपयुक्त ठरते. हळद व आल्याचे एकत्रित मिश्रण अवस्थेत भूक वाढवून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. लहान मुलांना ओल्या हळदीचे दुधातून चाटण दिल्यासही गुण येतो.

चिकुनगुनियाची सुरुवात झालेली असताना गुळवेलीच्या (गीलायो) पानांची भाजी वा सूप अत्यंत फायदेशीर असते. गुळवेलीची पाने चवीने कडू असली तरी गुणाने अत्यंत ‘गोड’ असते. सुरुवातीला तोंडली, तांदुळजा, पडवळ, चाकवत कारली याचे यथेच्छ सेवन करावे. याने बराच फरक पडतो. चिकुनगुनियाच्या पहिल्या अवस्थेत पालक खाल्ल्यास त्याचा फायदा होतो. मात्र पुढील अवस्थेत पालकचे सेवन केल्यास त्रास वाढताना दिसून येतो. चिकुनगुनियामध्ये सांधे जखडले असता दुधी भोपळा, भेंडी, कोवळी वांगी गुणकारी ठरतात. सांध्यांसह मांसपेशी जखडल्या असता शेवग्याचे सेवन केल्याने बराच आराम पडतो. बांबूच्या कोंबांची भाजी तसेच लोणचेही उपयुक्त ठरते. सूज असतानाही वरील भाज्या खूपच गुणकारी ठरतात. पुनर्नवाच्या पानांची भाजी इतर पालेभाज्यांपेक्षा अधिक फायदेशीर असते. भाज्या करताना मात्र शेंगदाण्याचा वापर शक्यतो टाळावा. त्याऐवजी खोबरे, तीळाचे कूट याचा वापर करावा. चिकुनगुनिया व्याधीच्या अवस्थेत ताप असताना तसेच सांधे जखडले असताना गहू व तांबडय़ा साळीच्या, साठीच्या तांदळाच्या सेवनाचा चांगलाच उपयोग होतो. तांदळाची सैंधव घालून केलेली पेज (सूप) फायदेशीर असते. चिकुनगुनियाच्या सुरुवातीच्या अवस्थेत जुन्या तांदळाचा तसेच जुन्या सातूचा आजार वाढू न देण्यासाठी चांगलाच फायदा होतो. सांध्यांसह मांसपेशी आखडले असता तसेच सांध्यांना सूज असताना जुन्या वऱ्याचे तांदूळ (भगर) तसेच जुनी नाचणी अधिक फायदेशीर असते. सूज असताना जुने सातूंचे सेवन केल्यास फायदा होतो.

चिकुनगुनियामध्ये सांधे सुजलेले असता शेवग्याच्या शेंगा हे उत्तम औषध ठरते. शेवग्याच्या शेंगा असलेले कुळीथाचे पिठलं किंवा आले हळद ओव्यासह कारल्याची भाजी त्या रुग्णाला चांगला आराम देते. पडवळाच्या भाजीतही शेवगा टाकून खावा आणि कारल्याची चटणी पडवळासह खावी. रुग्णांना उत्तम लाभ होतो. हळदीचे माईनमुळाचे लोणचे रुग्णाची रुची वाढवून व्याधी कमी करते. दरम्यान त्रासाच्या पहिल्या अवस्थेत वाळवलेले मांस, भाजलेले मांस तसेच सुकवलेले मासे यांचे सेवन करणे शक्यतो टाळावे. चिकुनगुनियाच्या सांध्यांना सूज येण्याच्या अवस्थेत वरील मांसाहाराबरोबर पाण्यातील मासे, अधिक स्निग्ध असलेले मांससुद्धा सेवन करणे टाळावे. कोळंबी, वाम, हलवा, पापलेट, मांदेली, बोंबील हे मासे खाणे टाळावे. बोकडाच्या मांसाचे सूप, हाडांचे सूप हळद, आले, धने, जिरे यांच्यासह सेवन केल्यास चांगला फायदा होतो.

इतर अपथ्य – चिकुनगुनियाच्या सूज अवस्थेत गूळ, काकवी, गुळाचे पदार्थ टाळणे गरजेचे आहे. तोंडाला चव येण्यासाठी मैद्याचे तळलेले पदार्थ वडा, सामोसा, भेळ, पाणीपुरी, चाट इत्यादी सेवन केल्यास त्रास शक्यता अधिक असल्याचा अनेक व्यक्तींचा अनुभव दिसतो. पाव, पावाचे पदार्थ या रुग्णांनी प्रयत्नपूर्वक टाळावे. चिकुनगुनियामध्ये सांधे जखडले असता तुरट रसाचे पदार्थ विशेषकरून सुपारी खाल्ल्यास त्रास वाढतो. अतितिखट पदार्थही टाळायला हवेत. मीठ जास्त असलेले किंवा टिकवण्यासाठी ‘रासायनिक द्रव्य’ टाकलेले पदार्थ खाल्ल्यासही त्रास वाढताना दिसून येतो. काजू, आक्रोडसारखे पचायला जड असणारे पदार्थ शक्यतो टाळावेत. लस्सी आणि उसाच्या रसाच्या सेवनानेही पहिली अवस्था त्रासदायक ठरते, तर शीतकपाटात साठवलेल्या भाज्या, आहाराचे पदार्थ, पथ्यकर फळेसुद्धा चिकुनगुनियाच्या त्रासात भर टाकतात. चिकुनगुनियामध्ये ताप असताना कांद्याचा रस अंगाला चोळल्यास रुग्णास आराम मिळतो. पहिल्या अवस्थेनंतर सांधे जखडणे तसेच सूज असताना कांदा, लसूण तसेच आले अत्यंत गुणकारी ठरते. रुग्णांनी कोवळा मुळा आले व हळदीच्या पाण्यात काही काळ ठेवून सेवन करावा. सांध्यांना सूज असताना गाजर उकडून दिल्यास फायदा होतो, तर गाजर व बीट एकत्र वाफवून खाणेही फायदेशीर असते. चिकुनगुनियाच्या नंतरच्या अवस्थेत तिळाचा उत्तम उपयोग होत असल्याने नियमित सेवन करावे. तीळ व खोबऱ्याचे मिश्रण तसेच तिळाच्या तेलाचे पदार्थ सेवनात राहिल्यास गुणकारक ठरते. मेथी दाणा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर सेवन केल्यास हाडे बळकट होऊन शरीरातील वात कमी होण्यास मदत होते. मेथीदाणा इतरही पदार्थामध्ये वापरता येतो. साबुदाणा व त्याचे पदार्थ, साबुदाणा वडा, साबुदाणा पापडी, थालीपीठ हे चिकुनगुनियाच्या तसेच वाताच्या सर्व अवस्था वाढवतात. रताळ्याचे पदार्थ, उकडलेली रताळी, रताळ्याचा कीस, शिरा रुग्णांनी टाळलेला उत्तम. रताळ्याचा वापर सांधे आखडलेले असताना करावयास हरकत नाही, परंतु सूज असताना सेवन करू नये. बटाटे तसेच बटाटय़ाचे सर्व पदार्थ वाताचा त्रास वाढवतात आणि चिकुनगुनियाचा तर जास्तच. म्हणून यांचे सेवन टाळावे. राजगिरा लाह्य़ा व लाडू मात्र व्यक्तींनी खूप प्रमाणात घ्यावे, उत्तम फायदा होतो. राजगिरा व शिंगाडय़ाच्या पीठाचे थालीपीठ आले, कोथिंबिरीसह आहारात घ्यावेत.

First Published on October 9, 2018 2:59 am

Web Title: chikungunya virus infection