News Flash

हृदयाचा शत्रू

कोलेस्ट्रॉल किती झालं तर शरीराला अपाय होऊ शकतो? त्यासाठी एक विचार पुढे आला.

हृदयरोग म्हटले की कोलेस्ट्रॉलचे नाव येतेच. डॉक्टरांपेक्षाही जाहिरातींमधून या शब्दाचा मारा अधिक होतो आणि प्रत्येकाने स्वत:ची वस्तू खपवण्यासाठी त्याला खलनायक केले आहे. पण कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमके काय व त्याचा हृदयाशी कसा संबंध येतो हे मुळापासून सांगणारा लेख.

कोलेस्ट्रॉल हा शब्द तसा तुम्हाला नवा नाही. त्याबद्दल बरंच लिहिलं जातं, काय खा, काय खाऊ नका याची माहिती दिली जाते. पण तरीही समाजात त्याबद्दल अनेक गरसमज असल्याचं दिसून येतं. कोलेस्ट्रॉल  हा केवळ आजाराचा विषय नाही, शरीरात कोलेस्ट्रॉलचं खूप महत्त्वाचं काम आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी असतं. दोन्ही ठिकाणच्या द्रवाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे हे दोन्ही द्रव एकमेकात मिसळून चालणार नसतं. हे दोन्ही द्रव वेगळे ठेवण्याचं काम पेशींच्या तल पदार्थानं बनलेल्या िभती करतात. या िभती बनतात त्यात कोलेस्ट्रॉलचा मोठा वाटा असतो, तसंच अनेक हॉर्मोन्स बनविण्यासाठीदेखील कोलेस्ट्रॉल  लागतं. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की कोलेस्ट्रॉल नसून चालणार नाही. ते शरीरात असलंच पाहिजे.

मग कोलेस्ट्रॉल इतकं बदनाम का? तसं पाहायला गेलं तर कोलेस्ट्रॉल हृदयाचं थेट काहीच वाकडं करत नाही. ते गोंधळ घालतं ते रक्तवाहिन्यांमध्ये. रक्तवाहिन्यांच्या आतल्या भागात कोलेस्ट्रॉल आपलं बस्तान बसवतं. रक्तवाहिन्यांच्या आत हळूहळू कोलेस्ट्रॉलची पुटं चढत जातात. पुढे पुढे ही पुटं इतकी वाढतात की रक्तवाहिन्यांची तोंडं बंद होतात. इतर रक्तवाहिन्यांप्रमाणेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या नशिबी देखील हेच भविष्य वाढून ठेवलेलं असतं. त्यांची तोंडं बंद झाली म्हणजे हृदयाला पुरेसं रक्त मिळण्यात खूप अडचण येते. तुम्ही अनेकांच्या तोंडून ब्लॉक्स हा शब्द ऐकला असेल. त्याचा अर्थ रक्तवाहिन्या किती टक्क्यांनी बंद झाल्या आहेत ते सांगणे. ७० टक्के ब्लॉक्स म्हणजे साहजिकच रक्तवाहिनी फक्त ३० टक्के मोकळी आहे. हृदयाच्या रक्तवाहिनीत असे ब्लॉक्स असतील तर हृदयाला अवघ्या ३० टक्के रक्तपुरवठय़ावर अवलंबून राहावं लागणार.

कोलेस्ट्रॉल किती झालं तर शरीराला अपाय होऊ शकतो? त्यासाठी एक विचार पुढे आला. नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळाचं जे असतं ते सगळ्यात नसíगक कोलेस्ट्रॉल मानावं. इथं एक अडचण निर्माण झाली. तान्ह्या बाळाचं कोलेस्टेरॉल सुयोग्य असं मानलं तर सगळ्याच मोठय़ा माणसांना औषधं खावी लागतील. शिवाय हे देखील खरं की सगळ्याच मोठय़ा माणसांना वेळेअगोदर हृदयरोग होत नाही. तिसरी गोंधळ वाढवणारी गोष्ट ही की

दोन माणसांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सारखं असूनही त्यांच्यात सारख्या प्रमाणात हृदयाचा प्रश्न नसतो.

असं का याचं संशोधन करताना लक्षात आलं की कोलेस्ट्रॉलची अख्खी फौज आहे. त्याचे त्याच्या घनतेनुसार वेगवेगळे घटक आहेत. या फौजेचं काम अन्नाद्वारे आलेलं आणि लिव्हरमध्ये बनलेलं कोलेस्ट्रॉल शरीरात सगळीकडे पोचवायचं आहे. रक्तातून कोलेस्ट्रॉलसारख्या तल द्रव्याला नीट वाहून नेणारी एखादी योजना हवी. निसर्गानं हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीनं सोडवला आहे. या तल द्रव्यांना प्रथिनाचं वेष्टन दिलं आहे. प्रथिन असं की जे पाण्यातही विरघळेल आणि तेलाशीही फटकून वागणार नाही. हेच ते लायपोप्रोटीन.

मग घनतेनुसार कोलेस्ट्रॉलचे घटक ठरले. यकृतापासून निघून शरीरभर तल द्रव्य पोचवायला सुरुवात करतं ते व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटिन (व्हीएलडीएल.) एक प्रकारे माल गच्च भरून निघालेला ट्रक. रस्त्यात जाता जाता कोलेस्ट्रॉल वाटत जायचं हे त्याचं काम. माल उतरवत गेला म्हणजे ट्रक रिकामी होत जाणार. व्हीएलडीएलचं रूपांतर  इंटरमिडीएट  डेन्सिटी लायपोप्रोटिन (आयडीएल) मध्ये आणि कालांतरानं लो डेन्सिटी लायपोप्रोटिनमध्ये (एलडीएल) होणार. नुसताच माल देऊन काम भागणार नाही. थोडय़ा वस्तू परतही आणाव्या लागतील. त्यासाठी वेगळी छोटीशी योजना हवी. तिथं हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन (एचडीएल) आलं. शरीराच्या इतर पेशींसोबत रक्तवाहिन्यांना कोलेस्ट्रॉल पुरवणारं एलडीएल हे वाईट कोलेस्ट्रॉल. त्यांनी ते पुरवलं नाही तर रक्तवाहिन्यांत पुटं देखील चढणार नाहीत. एलडीएल कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे ही पुटं चढतात. म्हणून त्यांच्यावर हा दोषारोप. याउलट माल परत घेऊन जाणारं एचडीएल हे चांगलं कोलेस्ट्रॉल.

आपण जेवतो त्या अन्नात कोलेस्ट्रॉलखेरीज तेलदेखील असतं. रक्तात तेलाचे तीन कण एकत्र येऊन फिरणं अधिक पसंत करतात. तिथंही हे तेलाचे कण रक्तात विनासायास फिरावेत म्हणून त्यांना पाण्यात विरघळू शकणाऱ्या ग्लिसरॉलची जोड दिली जाते. ग्लिसरॉलसोबत तेलाचे तीन कण एकत्र असल्यानं त्याचं नामाभिधान झालं ट्रायग्लिसराईड. कोलेस्ट्रॉलच्या या सगळ्या घटकांना मिळून नाव आहे लिपीड. एकटं कोलेस्ट्रॉल तपासून काही उपयोग नसतो. सगळ्या तल बंधूना कवेत घेतलं तरच आपल्याला शरीराची खरी परिस्थिती कळते, म्हणूनच आपण रक्तातलं लिपीड प्रोफाइल तपासतो. नुसतं टोटल कोलेस्ट्रॉल तपासून काम भागत नाही. अख्खं लिपीड प्रोफाइल तपासणं महत्त्वाचं का ते आता तुम्हाला नक्कीच कळलंय.

आता काय खावं काय खाऊ नये म्हणजे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील हा प्रश्न. साहजिकच बहुतेक लोक आपल्या आहारातून तेल ‘कट’ करायच्या ऐवजी जाहिरातींच्या भुलवण्याला बळी पडतात. तेलातील अमुक घटक तुमचं कोलेस्ट्रॉल छान राखील, आमचं तेल तुम्ही भरपूर वापरा, तुम्हाला काही होणार नाही, अशी जाहिरातबाजी त्यांना भुरळ घालते. पण यासारखी असत्य गोष्ट नाही. कारण जेवणात तुम्ही कोलेस्ट्रॉल पूर्णपणे वज्र्य केलंत तरी त्याने केवळ तीस टक्के फरक पडतो. बाकीचं शरीरातच बनतं. त्यामुळं एक लक्षात असू द्या. कुठलंही तेल कमीच वापरा. मूळ म्हणजे व्यायाम करा. व्यायामानं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं. तुमच्या हृदयाची शक्ती वाढते. जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने हा संकल्प करा.

डॉ. सतीश नाईक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 5:34 am

Web Title: cholesterol cause for heart disease
Next Stories
1 स्थूलता मोजण्याच्या पद्धती
2 आयुर्मात्रा : बेल
3 #WorldHeartDay | बालहृदयरोग!
Just Now!
X