माझी सिगरेट या जन्मात सुटणं शक्य नाही. दिवसाला तीस सिगरेटी ओढतो मी. सोपं आहे का मला सांगा. चाळीस वर्षांचा मंगेश गंभीर चेहरा ठेवून सांगत होता. डॉक्टरांनी सांगितलंय मला सिगरेट पूर्णपणे थांबवायला. माझा रक्तदाब वाढलाय सध्या. औषध चालू केलंय त्यासाठी. पण डॉक्टरांचं म्हणणं असं की, मी सिगरेट ओढायचं पूर्णपणे बंद केल्याशिवाय उपचार पूर्ण होणार नाही. मी खूप प्रयत्न करून पाहिला. सुटतच नाही. आमचे डॉक्टर म्हणतात की सुटेल कशी तुम्ही सोडल्याशिवाय? आणूच नका यापुढची सिगरेट. की सुटली. हॅ.. एवढं सोपं असतं तर काय हवं होतं? मला पोट साफ होण्यासाठी रोज सिगरेट लागते. ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग असेल तर त्याआधी मला सिगरेट ओढावी लागते. काम करून थकल्यावर पुन्हा ताजंतवानं होण्यासाठी मला सिगरेट लागतेच. सर्वच्या सर्व तीस सिगरेटींचं समर्थन करणं त्याला शक्य नसावं बहुतेक.

मी तुम्हाला काय मदत करावी अशी तुमची अपेक्षा आहे?

हेच.. व्यसन सोडवायला मदत कराल म्हणून आलो. माझ्या मित्राने सांगितलं तुम्हाला भेटायला. एखादं जालीम औषध असलं तर सांगा. इंजेक्शन असलं तरी चालेल. एकदा घेतलं की कायमची सिगरेट सुटेल असं काही तरी.

पण तुम्हीच तर म्हणालात की या जन्मात सुटणं शक्य नाही म्हणून. मग?

मी खरं म्हणजे वैतागलोय माझ्यावरच. हे व्यसन कसं वाढत गेलं कळलंच नाही. आता मी त्यात पूर्णपणे अडकलोय. एका बाजूला मला कळतंय की मी सिगरेट सोडायला हवीय आणि दुसऱ्या बाजूला प्रयत्न कमी पडताहेत माझे.

मी सांगू का तुम्हाला, तुम्ही पद्धतशीर प्रयत्न केले आहेत असं मला वाटतच नाही. तुमचा निग्रह कमी पडतोय. तुमचा स्वतवरचा विश्वास कमी पडतोय. तुम्ही जर ठरवलंत की मी या व्यसनातून बाहेर पडायचं आणि हे करण्याची क्षमता माझ्याकडे आहे तर तुम्ही यासाठी पद्धतशीर प्रयत्न करून व्यसनमुक्त होऊ शकाल. तुम्ही म्हणाल तशी जालीम औषधं असती तर किती सोपं झालं असतं. अर्थात तुम्हाला मदत करणारी काही औषधं आपल्याला देता येतील, पण त्यांच्या जोडीला तुमचे पद्धतशीर प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला त्यासाठी वर्तणुकीच्या आणि विचारांच्या पातळीवर काही गृहपाठ करावा लागेल. शारीरिक आणि मानसिक व्यायाम करावे लागतील. व्यसनमुक्त होण्याचा संकल्प, आणि मी हे नक्की करू शकेन हा दृढविश्वास या दोन गोष्टी या संपूर्ण प्रक्रियेचा पाया असतील.

त्यानंतर मंगेश पुन्हा आलाच नाही. सुमारे सहा महिन्यांनंतर त्याच्या मित्राचा फोन आला. डॉक्टर, गेल्या महिन्यात मंगेशच्या छातीत दुखायला लागलं म्हणून त्याला आयसीयूत दाखल केलं. हृदयविकाराचा झटका येता येता वाचला. अँजिओप्लास्टी झाली. आता बरा आहे. तेव्हापासून सिगरेट सुटली ती सुटलीच. आता नावही घेत नाही त्या गोष्टीचं! साक्षात्कार झाल्यासारखं काही तरी झालं म्हणतो!

मंगेशला भलताच जालीम उपाय सापडला. जीवनमरणाचाच प्रश्न उभा राहिला तेव्हा त्यापुढे ‘धूम्रपानाने मिळणारे फायदे’ ही क्षुल्लक गोष्ट ठरली. सिगरेट सुटणार नाही म्हणता म्हणता कायमची सुटली. एका दमात आणि याच जन्मात!

‘आपल्याला घट्ट चिकटलेल्या’ सवयीच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी असते की, आपलं अंतर्मन त्या सवयीला घट्ट चिकटून बसलेलं असतं. याचं कारण असं की, कधी तरी त्या सवयीमुळे आपल्याला तात्पुरता फायदा मिळालेला असतो. (सिगरेटच्या सेवनाने मित्रांच्या गटामध्ये सुरुवातीला मिळणारी सामाजिक स्वीकृती, तणावमुक्तीची भावना, असुरक्षिततेपासून संरक्षण, आत्मप्रतिष्ठेचा आभास इ.) सवय सोडायची असेल तर त्यासाठी स्वतवर अजिबात न चिडता उलट स्वतला अत्यंत प्रेमाने हे विचारायला हवं की, आपण कुठल्या खोल कारणासाठी या सवयीला इतके घट्ट चिकटून बसलो आहोत. हा शोध शांतपणे घ्यावा लागतो. त्या शोधानंतर मग आपल्या लक्षात येतं की त्या वेळचं कारण आता अजिबातच अस्तित्वात नाही. उलट या सवयीमुळे आपल्याला तोटेच जास्त आहेत. हे एकदा पक्कं आतून कळलं की सवयीपासून मुक्तता होण्याचा प्रवास सुकर होतो.

हा शोध एखाद्या खजिन्याच्या शोधासारखा असतो. खजिना सापडायला वेळ लागतो, पण एकदा सापडल्यानंतर आपण जन्मभरासाठी श्रीमंत होतो.

drmanoj2610@gmail.com