22 September 2020

News Flash

राहा फिट : कॅफीन आणि बरंच काही..

तरतरी आणणारे हे कॅफीन ताणतणाव आणि हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकते.

डॉ. कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ

डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ

कॅफीन असणाऱ्या सर्व खाद्यपदार्थाच्या लेबलवर त्याचे नेमके प्रमाण देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लेबलवर कॅफीनचे प्रमाण आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन पदार्थाची निवड करता येईल. कॅफीन हा शब्द कॅफे या फ्रेंच शब्दापासून आला आहे. कॅफेचा अर्थ कॉफी. कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे कॅफीनसंदर्भात चर्चा करताना कॉफीचा उल्लेख प्रामुख्याने होतो. मात्र दैनंदिन आयुष्यातील अनेक पदार्थात कॅफीन असते आणि त्याचा अतिरेक झाला तर तरतरी आणणारे हे कॅफीन ताणतणाव आणि हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकते.

कॅफीन ६० पदार्थापासून मिळते. चहा, कॉफी, शीतपेय, चॉकलेट, कोको पावडर, औषधे या पदार्थामध्ये कॅफीन असते. कामाचा थकवा दूर करण्यासाठी किंवा ताणतणाव कमी करण्यासाठी चहा, कॉफी यांसारखे पर्याय निवडले जातात. यातील कॅफीन या घटकामुळे व्यक्तीला तरतरी किंवा उत्साह येतो. कॅफीनच्या सेवनामुळे शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होते. कॅफीन हे मज्जासंस्थेवर काम करीत असल्यामुळे कार्यक्षम राहण्याची ऊर्जा मिळते. कॅफीनमुळे श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण, चयापचय व उर्त्सजन याचा वेग वाढतो, म्हणून या पेयाच्या सेवनामुळे तरतरी आल्यासारखे वाटते. सर्वसाधारणपणे हा उत्साह २० मिनिटे ते १ तासापर्यंत राहतो आणि पुन्हा चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा निर्माण होते. कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांना एक कप कॉफी किंवा चहा हितावह ठरू शकतो. प्रत्येक व्यक्तीने सरासरी २०० ते ४०० मिलीग्रॅम कॅफीनचे सेवन करणे आरोग्यासाठी हितावह ठरते. कॅफीनमुळे चयापचय वाढते, त्यामुळे वजन कमी करण्याच्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो.

कॅफीनच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम

 • झोप न येणे.
 • अस्वस्थ वाटणे.
 • सतत राग किंवा चिडचिड वाढणे.
 • पोट खराब होणे.
 • रक्तदाब वाढणे.
 • डोकेदुखी (मायग्रेन).
 • वंध्यत्व.
 • हृदयाचे ठोके वाढणे.
 • पित्त वाढणे.

कॅफीन आणि मानसिक आरोग्य

व्यक्तीच्या मज्जासंस्थेवर कॅफीनचा परिणाम होतो. कॅफीनचे सेवन केलेल्या व्यक्तीचा उत्साह वाढतो. त्यामुळे कामाच्या ताणात कॉफी घेतली जाते. मात्र हा उत्साह फार काळ टिकत नाही. काही काळाने मेंदूला पुन्हा कॅफीनची गरज भासते आणि तासातासाला विविध पदार्थातून कॅफीन घेतले जाते. अनेकदा कॅफीनचे व्यसन लागल्यानंतर उत्साह किंवा ऊर्जा मिळविण्यासाठी कॅफीनचे सेवन गरजेचे वाटू लागते. मात्र कॅफीनयुक्त पदार्थामध्ये पित्त वाढवणारे घटक असतात. याच्या अतिसेवनामुळे नराश्यही येऊ शकते किंवा आरोग्याचे अनेक आजार सुरू होतात. इतर पदार्थाच्या तुलनेत ग्रीन टीमध्ये कॅफीनचे प्रमाण कमी असते.

गर्भवती महिलांना कॅफीन धोकादायक

गर्भवती महिलांनी कॅफीनचे सेवन टाळावे. सातत्याने दररोज २०० मिलीग्रॅमहून अधिक कॅफीन शरीरात गेल्यास गर्भातील बाळाचे वजन कमी होण्याची शक्यता असते. कॅफीनचे प्रमाण दररोज सरासरी ४०० मिलीग्रॅमपर्यंत पोहोचले तर गर्भपात होण्याचीही शक्यता असते. हे प्रमाण ४०० मिलीग्रॅमहून अधिक झाले तर हृदयाशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात.

कॅफीनच्या अतिसेवनावरील उपचार

 • भरपूर पाणी प्यावे.
 • िलबुपाणी घ्यावे.
 • फळ किंवा त्याचे रस घ्यावेत.
 • शहाळ्याचे पाणी घ्यावे.
 • तुळस किंवा पुदिन्याचे सेवन करावे.

एक कप म्हणजे २४० मिलीलिटर पेयातील कॅफीनचे प्रमाण

 • एक्स्प्रेसो कॉफी – ४०० ते ७२० मिलीग्रॅम
 • चहा – १२० मिलीग्रॅम
 • कॉफी – १२० ते २०० मिलीग्रॅम
 • रेडबुल – १५० ते १६० मिलीग्रॅम
 • शीतपेय – ५० ते ६० मिलीग्रॅम
 • चॉकलेक मिल्क शेक – २ ते ७ मिलीग्रॅम
 • डार्क चॉकलेट – १५ ते ३५ मिलीग्रॅम

चहा जास्त उकळवल्यामुळे कॅफीनचे प्रमाण वाढते. साधारण १ मिनिट चहा उकळवल्यामुळे २० मिलीग्रॅम, ३ मिनिटात २८ मिलीग्रॅम, ५ मिनिटांत ४० मिलीग्रॅम कॅफीन निर्माण होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2017 12:33 am

Web Title: coffee 3
Next Stories
1 बाल आरोग्य : बालकांचा दमा
2 पिंपळपान : अक्कलकारा
3 शुभ्र शत्रू!
Just Now!
X