|| डॉ. तृप्ती महात्मे

साडेतीन वर्षांचा शौर्य शिंका आणि खोकल्याने सकाळी बेजार झाला होता. सर्दीमुळे नाक गच्च झाल्यामुळे रात्री व्यवस्थित झोप झाली नव्हती. त्याच्याबरोबर दिवसभर कार्यालयात काम करणारी त्याची आईदेखील जागी होती. रात्री झालेल्या त्रासामुळे सकाळीच मायलेक दवाखान्यात हजर. दर दोन ते तीन महिन्यात याला सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. पावसाळ्यात तर हा त्रास जास्त होतो. आजारी पडल्यावर तो खातपीत नाही.. आईच्या तक्रारी सुरूच..

Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू

बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना पावसाळ्यात हा संवाद नित्याचा झाला आहे. सर्दी-खोकला साधा आजार असला तरी मुलांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांच्याबरोबर तो पालकांनाही भंडावून सोडतो. पाच वर्षांच्या आतील मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक जाणवते.

सर्दी-खोकला का होतो?

विषांणूमुळे हा आजार होत असून २०० पेक्षा जास्त विषाणू याला कारणीभूत ठरतात. ‘ऱ्हायनोव्हायरस’ हा जवळपास ५० टक्के प्रकरणांमध्ये आढळतो. हवामान बदलामुळे पावसाळा व हिवाळ्यामध्ये सर्दी पडशाचे प्रमाण अधिक जाणवते. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना हा त्रास जास्त होतो. त्यांच्या वायुमार्गाचा आकार कमी असल्याने श्वासनलिका लवकर प्रभावित होतात. यामुळेच पाच वर्षांच्या आतील बालकांना वर्षांतून पाच ते सहा वेळा या आजाराची लागण होते. वयोमानानुसार या आजाराचे प्रमाण कमी होत जाते. पाळणाघरात राहणाऱ्या बालकांमध्ये सर्दी खोकल्याचे प्रमाण जास्त असते.

संसर्ग कसा होतो?

संसर्गजन्य व्यक्तीला, बालकांना हात लागल्यावर त्याच हातांनी स्वतच्या डोळ्यांना, नाकाला, चेहऱ्याला स्पर्श करणे. आजारी व्यक्ती शिंकल्या, खोकल्यानंतर हे विषाणू वातावरणामध्ये दीर्घकाळ (१८ तासांपर्यंत) टिकू शकतात. त्या सान्निध्यात आलेल्या मुलांच्या श्वसनाद्वारे हे विषाणू शरीरात प्रवेश करतात. ते श्वसननलिकेत दाह निर्माण करतात व नाकाच्या आतील भागास सूज येते. हा दाह सर्दी-पडशाच्या लक्षणांना कारणीभूत ठरतो. नाकाबरोबर घसा, सायनस आणि स्वरयंत्रालादेखील त्रास जाणवू शकतो. आजारी बालक, व्यक्ती संसर्ग झाल्यापासून तीन ते पाच दिवस ते दोन आठवडय़ापर्यंत विषाणूंचा प्रसार करू शकते.

इतर समस्या आणि धोक्याची लक्षणे

साधरणत ३० टक्के बालकांमध्ये कानाकडे जंतुसंसर्ग पसरू शकतो. सारखा सर्दी-खोकला होणाऱ्या मुलांमध्ये हे जास्त संभवते. कानाचा जंतुसंसर्ग वारंवार झाल्यास मुलांच्या श्रवण शक्तीवर याचा परिणाम होऊ शकतो. १३ टक्के मुलांमध्ये जंतुसंसर्ग होऊन तो सायनसपर्यंत पोहोचू शकतो. वाढत जाणारा ताप, डोळ्यांभोवती सूज येणे, श्वसनाची दरुगधी, चेहरा दुखणे ही काही लक्षणे आहेत. सायनस व मेंदू हे शेजारी असल्याने मेंदूकडे हा संसर्ग पसरू शकतो. लहान मुलांमध्ये न्युमोनियाची लक्षणे जाणवू शकतात. ज्यामध्ये छातीची हालचाल वेगाने होणे, धाप लागणे, सुस्तावणे, ओठांचा-जिभेचा आणि नखाचा रंग निळसर पडणे आदी त्रास संभवतो. वरील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला व उपाययोजना आवश्यक आहे.

ज्या मुलांमध्ये हृदयरोग, प्रतिकारक्षमतेचा अभाव, आनुवंशिक आजार आदी मोठय़ा आजारांमध्ये उपरोक्त समस्या उद्भवू शकतात. ज्यांना अ‍ॅलर्जीच्या सर्दीचा त्रास आहे, त्यांच्या पालकांनी वेळीच बालरोगतज्ज्ञांकडे जाऊन यावर नियंत्रण मिळवावे. कारण या आजाराचे रूपांतर भविष्यामध्ये दम्यात होऊ शकते. कुटुंबातील व्यक्तींना जर अ‍ॅलर्जीचा त्रास असेल (त्वचा, सर्दी, दमा) तर ही शक्यता जास्त असते. ज्या मुलांना ‘टॉन्सिल्स’ अथवा ‘अ‍ॅडेनॉइड्स’चा त्रास आहे. ज्यामध्ये घसा दुखणे, गळ्यातील गाठींना सूज येणे, तोंडाने श्वास घेणे, झोपेत घोरणे, रात्री झोपेत श्वास कोंडून अचानक जाग येण्याचा त्रास संभवतो. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे.

सर्दी-खोकल्याची लक्षणे

घसा खवखवणे

  • नाक गच्च होणे
  • नाकातून स्राव येणे
  • लहान मुलांमध्ये ताप येणे, खोकला येणे, डोके दुखणे
  • अनुनाशिक रक्तस्राव, कान दुखणे
  • चिडचिड होणे, भूक न लागणे
  • सर्दीचा त्रास सात ते दहा दिवसांपर्यंत राहू शकतो. खोकला साधारणत दोन आठवडे राहू शकतो.

उपाय काय?

साध्या सर्दी खोकल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लक्षणात्मक उपचारपद्धती वापरावी. घरगुती उपचारात भरपूर झोप, विश्रांती मुलांना द्यावी. आहारात कोमट पाणी तसेच द्रवपदार्थाचा वापर करावा. तापामुळे मूल त्रासलेले असेल तर ‘अ‍ॅन्टीपायरेटिक’चा वापर करावा. रात्रीच्या खोकल्यासाठी पाच-दहा मिली मध झोपण्याअगोदर मुलांना (एक वर्षांवरील) देऊ शकता. झोपताना मुलांचे डोके उंचावर ठेवावे. नाक गच्च असल्यास ‘सलाइन ड्रॉप्स’चा वापर करावा. विषाणूजन्य आजार असल्याने प्रतिजैविकांचा वापर करू नये. मुलांमध्ये ‘ओव्हर’ व ‘काऊंटर’ उपलब्ध असलेली खोकल्याची औषधे देऊ नयेत. सहा वर्षांच्या आतील बालकांवर खोकल्याची औषधे परिणाम करीत नाहीत. ‘झिंक’ व जीवनसत्त्व ‘क’ काही प्रमाणात याचा त्रास कमी करू शकतात. यावर प्रतिबंधात्मक लस नाही. कारण विषाणू त्यांचे स्वरूप वारंवार बदलत असतात. पण हंगामी तापाची लस तापाच्या विषांणूपासून रक्षण करते.

प्रतिबंधात्मक काय काळजी घ्यावी?

मुले शाळा, पाळणाघर किंवा बाहेरून खेळून आल्यानंतर २० ते ३० सेकंद हात स्वच्छ चोळून धुवावेत. आजारी व्यक्तींच्या चेहऱ्याला, डोळे, नाक वा तोंडाला स्पर्श करू नये. आजारी व्यक्तीपासून मुलांना दूर ठेवावे. आपल्या मुलांपासून दुसऱ्या मुलांना संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी. पावसाळ्याच्या दिवसात गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मुलांची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी त्यांना सकस आहार द्यावा. मोकळ्या हवेत खेळण्यास, व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे.

triptii15@yahoo.co.in

(शब्दांकन: चारूशीला कुलकर्णी)