News Flash

जुनाट सर्दीने बेजार..

जवळपास ८० ते ९० टक्के रुग्णांमध्ये जुनाट सर्दी ही अ‍ॅलर्जीमुळे होत असल्याचे दिसून येते.

जवळपास ८० ते ९० टक्के रुग्णांमध्ये जुनाट सर्दी ही अ‍ॅलर्जीमुळे होत असल्याचे दिसून येते.

सर्दी १२ आठवडय़ांपेक्षा अधिक टिकत असेल तर त्याला जुनाट सर्दी किंवा ‘क्रॉनिक सर्दी’ म्हणतात. सर्वसाधारणत: सर्दी झाली की ती नैसर्गिकत:च बरी व्हायला हवी. जुनाट सर्दी मात्र अशी बरी झालेली नसते. या प्रकारच्या सर्दीचे प्रमुख कारण म्हणजे अ‍ॅलर्जी. सध्या सतत दाटून येणारे मळभ हा वातावरणातील अ‍ॅलर्जीकारक घटक वाढण्यासाठी पोषक काळ आहे.

अ‍ॅलर्जीमुळे जुनाट सर्दी- अ‍ॅलर्जी म्हणजे फक्त बाहेर गेल्यावर ‘ग्रास पोलन’ची किंवा परागकणांचीच होते असे नाही. अगदी वातानुकूलित खोलीतही अ‍ॅलर्जी होऊ शकते. वातावरणातील विविध प्रकारच्या कणांची आणि विशिष्ट खाद्यपदार्थाचीही काहींना अ‍ॅलर्जी असते. ‘अ‍ॅलर्जन्स’- म्हणजे अ‍ॅलर्जीकारक पदार्थ ही ‘ग्लायकोपेप्टाईडस्’ नावाची प्रथिने असतात. काही रुग्ण त्या प्रथिनांसाठी अधिक संवेदनशील असतात. जवळपास ८० ते ९० टक्के रुग्णांमध्ये जुनाट सर्दी ही अ‍ॅलर्जीमुळे होत असल्याचे दिसून येते.

वातावरणात वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असते. भिंतीवर वाढणारी बुरशी, कांद्या-बटाटय़ाच्या सालीवर वाढणारी बुरशी अशी ती अनेक ठिकाणी आढळते. धुळीत असलेल्या ‘डस्ट माईट’ या कीटकांची अ‍ॅलर्जी असू शकते. झुरळ, मुंग्या अशा कीटकांमध्ये प्रथिने असतात, त्याची किंवा मांजर-कुत्र्यासारख्या प्राण्याची त्वचा आणि केस यांचीही अ‍ॅलर्जी असते.

अर्थात प्रत्येक व्यक्तीला अ‍ॅलर्जी होत नाही. ज्या व्यक्ती विशिष्ट अ‍ॅलर्जनसाठी अधिक संवेदनशील असतात त्यांनाच ती होते. काही जणांना लहान आणि तरुण वयात एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी नव्हती, पण नंतर ती उद्भवली असेही होऊ शकते. विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जन्सना तोंड देण्याची शरीराची क्षमता एका टप्प्यावर संपली आणि मग अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसू लागली, असे काहींच्या बाबतीत होऊ शकते.

इतर जुनाट आजारांमुळे सर्दी- संसर्गामुळे झालेल्या विविध प्रकारच्या इतर जुनाट आजारांमुळेही जुनाट सर्दी (क्रॉनिक ऱ्हायनायटिस) होण्याची शक्यता असते. क्षयरोग, गुप्तरोग (सिफिलिस), कुष्ठरोग, ‘वेगनर्स’ आणि ‘सारकॉईड’ हे संसर्गाने होणारे जुनाट आजार यात असे होऊ शकते.

एकाच नाकातून पाणी येणे- सर्दी ही खरे तर दोन्ही नाकपुडय़ांमध्येच होते. एकाच नाकपुडीत सर्दी होत नाही. त्यामुळे अशा सर्दीत निश्चितपणे डॉक्टरांना दाखवणे गरजेचे. कारण अशा स्थितीत मेंदूच्या बाजूला असलेले ‘शॉक अब्जॉर्बिग फ्लुइड’ नाकातून बाहेर येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला ‘सीएसएफ ऱ्हायनोरिआ’ असे म्हणतात.

सर्दी रक्त मिसळलेली किंवा गुलाबीसर रंगाची असेल तरी डॉक्टरांकडून तपासून घ्यायला हवे.

लक्षणे

जुनाट सर्दीत रोज नाकातून पाणी वाहण्याचा त्रास होतो. सर्दीचा हा स्राव सहसा पाण्यासारखा किंवा अधूनमधून पिवळा स्राव असतो. पिवळा स्राव असेल तर जिवाणू संसर्ग झालेला असू शकतो. शिंका, नाकात खाज येणे, नाक चोंदणे ही लक्षणेही दिसतात. सतत नाकाच्या आतल्या आवरणाला त्रास होत असल्यामुळे तिथे सूज येऊन नाक बंद होते. त्यामुळे श्वास नीट घेता येत नाही.

नाकाच्या भोवती आतल्या बाजूला अनेक ‘सायनस’ (हवेच्या पोकळ्या) असतात. त्यांची तोंडे नाकात उघडतात. नाकाच्या आवरणाला सूज आल्याने सायनसची तोंडे बंद झाली तर सायनस बाहेर टाकत असलेला ‘म्यूकस’ हा स्राव साठून राहू लागतो. त्यामुळे चेहरा जड होणे, डोळ्यांच्या मागे दुखणे, डोके दुखणे ही लक्षणे दिसू शकतात.

नाक-कान-घशाच्या आतील आवरण अतिशय संवेदनशील असते. त्याला सतत त्रास होऊ लागला तर या आवरणाच्या पेशींची नको असलेल्या पद्धतीने वाढ होऊ शकते आणि त्या आवरणावर फुगे (पॉलिप्स) तयार होऊन त्यात सर्दी साठते. त्यामुळे त्रास वाढतो.

उपाय काय?

रात्री नाक धुणे/ जलनेती करणे- नाक धुण्यासाठीचे पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे असावे. त्यामुळे नाकातील आवरणाला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. अर्थात ही जलनेती कशी करायची हे आपल्या डॉक्टरांकडून नीट समजून घेणे गरजेचे.

नाकात फवारायचे ‘स्टिरॉइड’चे स्प्रे- हे सूज कमी करणारे द्रव्य असून त्याची रक्तात शोषली जाण्याचे प्रमाण कमी असते.

‘अ‍ॅण्टी अ‍ॅलर्जिक’ गोळ्या/ सर्दीच्या गोळ्या- जे लोक अ‍ॅलर्जन्सना संवेदनशील असतात त्यांच्यात शरीर त्या अ‍ॅलर्जनच्या विरोधात लढण्यासाठी ‘अ‍ॅण्टीबॉडी’ तयार करते. ‘अ‍ॅण्टिजेन’ आणि ‘अण्टीबॉडी’ यांच्या प्रक्रियेतून ‘हिस्टमिन’ हे द्रव्य तयार होते. अ‍ॅण्टी अ‍ॅलर्जिक गोळ्या या द्रव्याच्या विरोधात काम करतात. स्टिरॉईड स्प्रे आणि अ‍ॅण्टी अ‍ॅलर्जिक गोळ्याही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य.

ज्यांना हे सर्व उपाय करून काहीच फरक पडलेला नाही त्यांना अ‍ॅलर्जीवरील ‘इम्यूनोथेरपी’ ही कायमस्वरूपी उपचारपद्धती सुचवली जाते. अ‍ॅण्टीजेन आणि अ‍ॅण्टीबॉडी यांच्यात प्रक्रियाच होऊ न देणे आणि ‘हिस्टमिन’ द्रव्यही तयार होऊ न देणे हा या पद्धतीचा उद्देश असतो. यात प्रथम व्यक्तीला नेमकी कशाची अ‍ॅलर्जी आहे हे चाचणीद्वारे तपासले जाते. यात रक्ताच्या चाचणीपेक्षा त्वचेच्या केल्या जाणाऱ्या चाचणीने अधिक चांगल्या प्रकारे निदान होते. मग त्यावर काम करणारी लस थोडय़ा-थोडय़ा प्रमाणात रुग्णाला दिली जाते. ठरावीक काळ हे उपचार घेतल्यावर अ‍ॅलर्जी असलेल्या पदार्थासाठी शरीराची तयारी होत जाते.

दुर्लक्ष नको

जुनाट सर्दी अनेक दिवसांपासून असते हे तर सरळ आहे. पण इथे कान-नाक-घसा हे सगळे आतून जोडलेले असतात हेही लक्षात घ्यायला हवे. जुनाट सर्दीकडे अनेक दिवस दुर्लक्ष झाले तर घसा व नंतर फुप्फुसांना त्रास व्हायला लागू शकतो. श्वासनलिकेच्या आतल्या आवरणाला सूज येऊ लागली तर दमा उद्भवू शकतो. त्यामुळे जुनाट सर्दीकडे दुर्लक्ष नको.

डॉ. विनया चितळे-चक्रदेव (कान-नाक-घसा तज्ज्ञ)

शब्दांकन- संपदा सोवनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 3:40 am

Web Title: cold symptoms and treatment
Next Stories
1 मना पाहता! : मीच का म्हणून?
2 पिंपळपान : कोहळा
3 जंक फूड बाहेरचे अन् घरातले!
Just Now!
X