News Flash

#WorldHeartDay | बालहृदयरोग!

पहिल्या तिमाहीत झालेल्या संसर्गामुळे अनेकदा जन्माला आलेल्या मुलांच्या हृदयात दोष निर्माण झालेले असतात.

पहिल्या तिमाहीत झालेल्या संसर्गामुळे अनेकदा जन्माला आलेल्या मुलांच्या हृदयात दोष निर्माण झालेले असतात.

अपुऱ्या पोषणामुळे गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत झालेल्या संसर्गामुळे अनेकदा जन्माला आलेल्या मुलांच्या हृदयात दोष निर्माण झालेले असतात. उपचाराने ते बरे होतात, मात्र अनेकांपर्यंत हे उपचार पोहोचत नाहीत. एकीकडे जन्मजात हृदयरोगाचे प्रमाण अधिक आहे, तर दुसरीकडे किशोरवयातील लठ्ठपणामुळे तरुणपणीच हृदयरोग होण्याची बीजे रोवली जात आहेत. योग्य आहार व नियमित व्यायाम हेच त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
आपल्याकडे एकूणच आरोग्याविषयी अनास्था आहे. त्यातही शहरी भागात किमान आरोग्यसुविधा उपलब्ध असतात, पण ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य सुविधांचीही कमतरता असल्याने अनेकदा लहान मुलांचा आजारही लक्षात येत नाही, त्यावर उपाय करणे तर दूरच.. त्यातही काही आजारांविषयी आपल्याकडे दुर्लक्ष होते. लहान मुलांच्या कर्करोगाविषयी सध्या जागृती झाली आहे. दरवर्षी आपल्या देशात १५ ते २० हजार कर्करोग झालेल्या नवीन बालरुग्णांची नोंद होते. त्या तुलनेत दरवर्षी अडीच ते तीन लाख मुले हृदयरोग घेऊन जन्माला येतात. मात्र हृदयरोग झालेल्या मुलांची गंभीर समस्या अजूनही समाजासमोर तेवढय़ा तीव्रतेने आलेली नाहीत.
बालकांमधील हृदयरोग-भारतात हृदयरोग झालेल्या मुलांची निश्चित आकडेवारी नाही. मात्र इतर देशांमधून केल्या गेलेल्या अभ्यासावरून साधारणत: एक हजार मुलांमागे १२ ते १५ मुलांना हा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. आपल्या देशातील अनेक मुलांमध्ये हृदयरोग असल्याचे लवकर निदानही होत नाही. गर्भवती असताना आईचे कुपोषण झाल्यास विषाणू संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यातही गर्भावस्थेतील पहिल्या तिमाहीत हा धोका अधिक असतो. भारतातील कुपोषणाचे प्रमाण पाहता पाश्चिमात्य देशांपेक्षा आपल्याकडील हृदयरोग झालेल्या मुलांची संख्या कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे. या मुलांमध्ये ९५ टक्के वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. अनेकदा हृदयाची घडण चुकीची असते. काही हृदयांच्या वरच्या दोन कप्प्यांत छीद्र (आर्टिअल सेप्टल डिफेक्ट) असते. काही मुलांच्या हृदयाच्या खालच्या दोन कप्प्यांमध्ये छीद्र (व्हेंन्ट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट) असते. हृदयातून बाहेर पडणारी मुख्य वाहिनी, रोहिणी आकुंचित (कोक्र्टेशन ऑफ दे अ‍ॅरोटा) असते तर काही वेळा नीला आणि रोहिणीच्या जागा परस्पर बदललेल्या असतात. काही वेळा यातील एकापेक्षा अधिक दोष आढळतात. या मुलांना ब्लू बेबी म्हटले जाते. या आजारात मूल निळसर दिसते, त्याच्या शरीरात अशुद्ध रक्त वाहत असते. हृदयात तीन ते चार दोष असल्याने हे घडते. या मुलांवर तातडीने उपायांची गरज असते. इकोकार्डिओग्राफ केल्यानंतर मुलांच्या हृदयातील दोष आढळून येतात. मात्र बहुतांश गावपातळीवर ही सुविधा उपलब्ध नसते.
किशोर वयातील हृदयरोग-किशोर वयात सहसा हृदयरोग निर्माण होत नाही. मात्र लहानपणी हृदरोग दुर्लक्षित राहिला तर त्याचे परिणाम या वयात दिसू शकतात. काही वेळा हृदयाकडे जाणाऱ्या दोन वाहिन्यांपैकी एक दबलेली असते. खेळताना किंवा शारीरिक ताण वाढल्यास हृदयाची धडधड वाढते. हृदयाचा आकार वाढला की त्याखाली ही वाहिनी दाबली जाते व हृदयाला होत असलेला रक्तपुरवठा थांबतो. या मुलांमधील दोष काही लक्षणांमुळे समजू शकतो. ही मुले पटकन दमतात. त्यांना धाप लागते. त्यांच्या वैद्यकीय तपासण्या केल्यास हा दोष लक्षात येऊन त्यावर उपचार करता येतो. मात्र अनेकदा हा दोष लक्षात येत नाही व किशोर वयातील मुलांवर प्राण गमावण्याची वेळ येते. अर्थात हे दुर्मीळ आहे.
तरुणपणातील हृदयरोग-किशोर वयात हृदयरोग निर्माण होत नसला तरी तरुण वयात होणाऱ्या हृदयरोगाचे बीज या वाढीच्या वयात रोवले जाते. असंतुलित आहार व व्यायामाचा अभाव ही त्याची प्रमुख कारणे. पिझ्झा, बर्गर, भरपूर चीज असलेले बाहेरचे पदार्थ अतिरेकी प्रमाणात खाल्ले जातात व त्या मानाने व्यायाम केला जात नाही. त्यामुळे स्थूलता वाढते. हृदयवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याची सुरुवात याच वयात होते. त्याचसोबत मधुमेह, उच्च रक्तदाब अशा हृदयरोगाकडे नेणाऱ्या आजारांसाठी पूरक स्थितीही याच वयात होते.
किशोर वयातील स्थूलता ही सध्या जागतिक समस्या झाली असून भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये, विशेषत: शहरी भागात हा समस्येची तीव्रता अधिक आहे. मुलांमधील स्थूलत्व वेळीच कमी केले नाही आणि हृदयरोगासंबंधी तपासणी करून उपचार केले नाहीत तर या मुलांना तरुणपणीच हृदयरोग होत असल्याचे दिसून आले आहे.

लहान वयातील स्थूलता
जगभरात शाळेत जाणाऱ्या दहापैकी एक मूल स्थूल आहे. २०१० पर्यंत जगात पाच वर्षांखालील ४ कोटी २० लाख मुले स्थूल होती. त्यापैकी तीन कोटी मुले विकसनशील देशांमधील होती.
डॉ. सतीश जोशी , बाल हृदयरोगतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2016 11:00 am

Web Title: congenital heart defects in children
Next Stories
1 दातांच्या मुळापर्यंत उपचार रूट कॅनल!
2 उदरभरण नोहे.! : चणे-शेंगदाणे!
3 प्रकृ‘ती’ ; लसीकरण
Just Now!
X