20 April 2019

News Flash

नैराश्याचे ओझे!

पुरुषांमध्ये १० टक्के तर स्त्रियांमध्ये याचे प्रमाण २० टक्के आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सध्याची जीवनशैली बघता लहान-थोर सर्वानाच खरं तर नैराश्याने ग्रासले आहे. बालवाडीच्या प्रवेशापासून ते अगदी म्हातारपणात/ आजारपणात कोण बघणार, अशा अनेकविध प्रश्नांनी येणारी निराशा माणसाच्या मनात घर करून राहते. त्या निराशेच्या मागे असणारी इतर कारणे, त्याची लक्षणे व उपचार पद्धतीविषयी सविस्तर माहिती करून घेणे गरजेचे आहे. शरीराएवढाच मनाचाही व्यापार फार मोठा असतो आणि त्याचा तोल सांभाळणे अतिशय गरजेचे असते. अनेक स्त्रिया विशेषत्वाने असे ओझे वाहत राहतात आणि पुढे जाऊन त्यांना खूपच त्रास होतो. पुरुषांमध्ये १० टक्के तर स्त्रियांमध्ये याचे प्रमाण २० टक्के आहे.

निराशा म्हणजे काय?

हा एक भावनिक आजार आहे. आजूबाजूला काहीच चांगले घडत नाही, सारे आपल्या विरोधात आहे असे वाटते तर काही वेळा उत्साहाची कमतरताही जाणवते. कोणत्याही प्रकारचा आनंद घेण्याची क्षमता नाहीशी होते. कोणत्याही कारणाने शरीरावर/ मनावर ताण निर्माण होतो, तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल रसायनाची अतिप्रमाणात उत्पत्ती होते. या रसायनाचा मेंदूशी संपर्क आल्यावर मेंदूतील काही केंद्र आकुंचन पावतात तर काही केंद्र अतिरिक्त कार्यशील होतात. परिणामस्वरूपी भूक, झोप, थकवा, विस्मृती, नियंत्रण आदींवर विपरीत परिणाम होतो आणि नैराश्याची लक्षणे दिसू लागतात. या प्रक्रियेत मेंदूतील पेशींच्या उत्पत्तीवरही कमीअधिक प्रमाणात प्रभाव पडतो. औषधे देऊन कॉर्टिसॉलची पातळी कमी करता येते तसेच अनेक इतर उपचारांनी मेंदूची कार्यक्षमता पुन:प्रस्थापित करता येते.

नैराश्याचे प्रकार

काही आजारांमध्ये रुग्णाला आभास होतात. समोर असलेली सत्य घटना, वस्तू, व्यक्ती यांचे ज्ञान होत नाही.

बाळंतपणानंतर येणारे नैराश्य – हे काही काळापुरते मर्यादित असते. काही आठवडे ते काही महिन्यांत कमी होते. याचे प्रमाण १५ टक्के स्त्रियांमध्ये असे आढळून येते.

काही प्रकारचे नैराश्य हे उपचारांना दाद देत नाही.

युनीपोलर – सतत नकारात्मक व दु:खी विचार असतात. सतत अनुत्साही वाटते.

बायपोलर – यात निराश असणे व वेडय़ासारखे/ खुळ्याप्रमाणे वागणूक असणे या दोन प्रवृत्ती एकाच व्यक्तीत आढळून येतात. दोन्ही गोष्टी आलटून पालटून जाणवतात आणि कित्येक महिने राहू शकतात.

नैराश्याची लक्षणे

एखाद्या गोष्टीने पूर्वी होणारा आनंद आता तेवढा वाटेनासा होतो. खूप झोपावेसे वाटते/ अजिबात झोप लागत नाही. भूक कमी होते. कोणत्याही विशेष प्रयत्नांशिवाय वजनात घट होते. कोणतीही गोष्ट करण्यास इच्छा होत नाही/ मन रमत नाही. बोलणे व विचारशक्तीची धार कमी होते. इतर हालचाली मंदावतात. थकवा येतो. अस्वस्थता वाढते. निर्णयक्षमता कमी होते तसेच आपण स्वत:ला दोषी समजू लागतो. स्त्री-पुरुष संबंधाविषयीचे आकर्षण नाहीसे होते. सारखे मृत्यूचे विचार मनात घोळतात. आत्महत्येचे विचार येतात किंवा काही वेळा त्याचा प्रयत्नही केला जातो. कधी कधी भावनांचा तीव्र उद्रेक होतो. ओरडणे, रडणे, आपटणे, मारणे, इ. क्रियाही यात समाविष्ट होतात.

नैराश्याची विविध कारणे

जीवनातील विशिष्ट घडामोडी – घटस्फोट, नोकरी/धंद्याच्या ठिकाणच्या समस्या, सततचे कौटुंबिक वाद, आर्थिक दुर्बलता किंवा अचानक बसलेला आर्थिक फटका, तीव्र ताणतणाव, दुर्धर आजार (कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, मोठी शस्त्रक्रिया इत्यादी).

जीवनातील जुने आघात, सातत्याने येणारे अपयश, जवळच्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू.

जेनेटिक – घरातील व्यक्ती नैराश्याच्या शिकार असतील, तर जीन्समधून हा आजार येऊ शकतो.

लहान वयात घडून गेलेले आघात- अमली पदार्थाचे व्यसन, अतिमद्यपान, उद्धट व कठोर वातावरणात मुलांची वाढ होणे, लैंगिक संबंधास जबरदस्तीने बळी पडणे, गतकाळात डोक्याला जबरदस्त मार लागलेला असणे. संप्रेरकांचे असंतुलन पोषक आहाराची कमतरता

निदान/ चाचण्या

हॅमिल्टन स्केल नावाची २१ प्रश्नांची एक परीक्षा असते. त्याच्या गुणांवरून निराशा किती तीव्र स्वरूपाची आहे ते ठरवले जाते.

रक्तचाचण्या – हिमोग्लोबिन, बी १२ जीवनसत्त्व, ड जीवनसत्व, सोडियम-पोटॅशियम, थायरॉईड, शर्करा इत्यादी

फुप्फुस कार्यचाचणी (एलएफटी) सीटी स्कॅन, ईईजी, एम.आर.आय. (मेंदूकरता) व ईसीजी

आहार व पोषणात्मक उपचार

ओमेगा ३ स्निग्धाम्ले – खोबरेल तेल, आक्रोड, जवस, अंडी, सालमन मासा

फॉलिक आम्ल – पालक, बिट, ब्रोकोली

अ‍ॅण्टिऑक्सिडंट पदार्थ – ‘क’ जीवनसत्त्व, ‘ब’ जीवनसत्त्व आहारीय पदार्थ- आवळा, टोमॅटो, तीळ, हिरव्या पालेभाज्या, फळे उत्तम प्रथिने – डाळी, उसळी, दूध-दही-ताक, कवचफळे, अंडी, चिकन ‘ड’ जीवनसत्त्व – सूर्यप्रकाश, गाईचे दूध, अंडी, मासे ‘बी-१२’ जीवनसत्त्व – गाईचे दूध, अंडी, मासे

इतर

पुरेशी व शांत झोप मिळणे अत्यंत गरजेचे असते.

घराबाहेर पडावे, आवडत्या गोष्टींमध्ये रस घ्यावा. काहीतरी नवीन शिकावे आणि चारचौघांत मिसळण्याचा प्रयत्न करावा. हलके-फुलके वाचन करावे.

सुवासिक तेलाचे ८-१० थेंब आंघोळीच्या पाण्यात घालावे. हेच तेलाचे थेंब उशीवर झोपताना घालावे. कपाळावर व कानशिलावरही थोडे चोळावे.

केशर, वेलची, जायफळ अशा सुगंधी द्रव्याचा आहारात समावेश करावा.

 

उपचार पद्धती

कौटुंबिक साहाय्य – रुग्णाच्या स्थितीविषयी कुटुंबीयांना अवगत केले जातो. कुटुंबीयांनी रुग्णाला कशा प्रकारे साहाय्य करावे ते ठरवले जाते.

मानसोपचार – तज्ज्ञ व्यक्ती सुरुवातीला एकदम औषध सुरू न करता वागणुकीसंबंधात मार्गदर्शन करतात. मनाची आकलनशक्ती वाढवणे आणि विचारांमधे स्थैर्य येण्याच्या दृष्टीने हल्ली संगणकाच्या साहाय्याने भावनिक गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. सुसंवाद निर्माण होण्यासाठी तज्ज्ञांद्वारे प्रयत्न केले जातात. यासाठी काही कालावधी लागतो.

औषधोपचार – रुग्णांना निराशानाशक औषधे दिली जातात. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने तसेच ठरवून दिलेल्या मात्रेत आणि सांगितलेल्या वेळीच घ्यावीत. ही औषधे वेगवेगळ्या न्यूरोट्रान्समीटर्सवर काम करतात. ही विशिष्ट प्रकारची रसायने असतात, जी आपल्या भावना, झोप, भूक आदींवर काम करतात. काही विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम असतात. उदा.: आम्लपित्त, गॅस, सुस्ती येणे. अशा वेळी डॉक्टरांशी बोलावे. बरे वाटल्यानंतरही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नये. संप्रेरकांचे असंतुलन असेल तर काही वेळा संप्रेरकांच्या गोळ्याही दिल्या जातात.

व्यायाम – जलदगतीने करता येणारे व्यायाम विशेषत्वाने करावे. यामुळे एण्डोरफीन वाढून न्यूरोट्रान्समिशन कार्यान्वित होऊन नॉर-एपिनेफ्रीन तयार होते.

ईसीटी – इलेक्ट्रो कन्वल्सिव्ह थेरपीत मेंदूला विद्युत लहरींनी कार्यान्वित केले जाते. हे उपचारही वारंवार घ्यावे लागतात.

dr.sanjeevani@gmail.com

First Published on July 31, 2018 1:04 am

Web Title: depression causes symptoms and treatment