20 January 2019

News Flash

मधुमेहींनो, पायांची काळजी घ्या!

पायाची काळजी घेणे आवश्यक आहे.

मधुमेह रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण वाढल्यास त्याचा अनेक अवयवांवर परिणाम होतो. पायाला जखम होणे ही सर्वसाधारण बाब असली तरी मधुमेही रुग्णांच्या पावलांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यासाठी पायाची काळजी घेणे आवश्यक आहे.

मधुमेह हा आजार एकटा येत नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित झाल्याने त्याचा सर्वच अवयवांवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडतो. रक्तातील साखर सर्वसाधारण प्रमाणापेक्षा थोडी अधिक झाल्याचे आढळले तर त्यावर त्वरित उपचार करून ती नियंत्रणात आणता येते. मात्र हे समजण्यासाठी उशीर झाला आणि साखरेचे प्रमाण वाढले की अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होऊ  लागतो. पायांच्या समस्या हा त्यातील एक भाग. पायाला जखम होणे ही सर्वसाधारण बाब असली तरी मधुमेही रुग्णाच्या पावलांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. संसर्ग वाढल्याने अनेकदा पाय गमावण्याचीही वेळ येते. त्यामुळे तातडीच्या उपचारांसोबतच पायांची काळजी घेणे अधिक सयुक्तिक ठरते.

मधुमेहात रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि रक्तप्रवाह सुरळीत नसल्यामुळे जखम भरून निघण्यास वेळ लागतो. मधुमेहात रक्तवाहिन्या मोठय़ा प्रमाणात गोठतात. त्यातून रक्तपुरवठा थांबतो आणि त्या पुढचा भाग मृत होतो. त्याचप्रमाणे मधुमेहात साखरेच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मज्जातंतू निकामी होतात. यातून रुग्णांची संवेदना कमी होते आणि पाय सुन्न होतात. पायाला जखम झाली तरी ती दुखत नाही. पावलांच्या रक्तवाहिन्यांना दुखापत झाल्यामुळे तळपायाला गरम, थंड अशा जाणिवा किंवा वेदना होत नाहीत. याला वैद्यकीय भाषेत ‘सेन्सॉरी डायबेटिक न्युरोपॅथी’ म्हणतात. जखम दुखत नसल्याने रुग्ण त्या जखमेवरच चालत राहतो आणि यातून जखम वाढते. रक्तात अतिरिक्त साखर असल्याने जखम भरून निघण्यास वेळ लागतो. त्यामुळे अशा जखमांना जंतुसंसर्गाचा धोका असतो. त्यामुळे साध्या वाटणाऱ्या पायांच्या तळव्यावरील भेगाही मधुमेही रुग्णांसाठी धोक्याच्या ठरू शकतात. पावलांच्या जखमा लवकर बऱ्या होत नसल्याने त्या जखमेशेजारील त्वचा जाड होते. या जाड झालेल्या त्वचा संवेदना गमावण्याची शक्यता असते. पावलांवर झालेली जखम भरून निघण्यास वेळ लागतो. चालणे, पायावर उभे राहणे यांसारख्या साध्या क्रिया करणे अवघड होते. बराच काळ दुर्लक्ष झाल्यास पाय कापण्याचीही वेळ येऊ  शकते. अशा वेळी शस्त्रक्रिया करून यावर उपचार केले जातात.

धोका कसा ओळखाल?

पायावरील केस कमी होणे, पायाची त्वचा कोरडी होणे, पूर्वी अगदी नितळ असलेले पाय अचानक खरबरीत होणे, त्यांना भेगा पडणे आणि पायाचे तापमान थोडेसे वाढणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. पायाचे सांधे, विशेषत: बोटांचे सांधे पुरेसे लवचीक राहिले नाहीत तरी पाय धोकादायक स्थितीत पोहोचायला वेळ लागत नाही.

पायांची निगा राखा

  • मधुमेही रुग्णांना पायाच्या समस्या जाणवत असेल तर तातडीने उपचार घ्या. आहारातील साखर नियंत्रणात आणणे हा महत्त्वाचा उपाय आहे. मात्र त्याबरोबरच जखम होऊ नये यासाठी जास्त काळजी घ्या.
  • चालताना खरचटणे, ठेच लागणे यांसारख्या छोटय़ा समस्याही धोक्याच्या ठरू शकतात. मधुमेही रुग्णांनी घराबाहेर पडताना पादत्राणे घालून फिरावे.
  • चप्पल घातल्यानंतरही जखम होण्याची शक्यता असते. अशावेळी शूज फायदेशीर ठरतात.
  • पायांची स्वच्छता हा यातील महत्त्वाचा पैलू आहे. कोमट पाणी आणि साबणाचा वापर करून पायांची नियमित स्वच्छता करावी.
  • पाय धुतल्यानंतर कोरडे करून घ्यावे. बोटांमधील भागही कोरडा करा. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने मलमाचा वापर करा.
  • नखे नियमित कापावी आणि नखांच्या कडा हळुवार घासून काढाव्या. नखे जास्त बारीक कापू नये. नखे कापण्यासाठी ब्लेडचा वापर करू नये. नेलकटरचाच उपयोग करावा. मात्र नखे कापताना जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कुरूप आणि भोवरी काढण्यासाठी कुरूपपट्टय़ा, तीव्र जंतुनाशक द्रव्य किंवा रेझर ब्लेडचा उपयोग करू नये.
  • पायांवर येणारे फोड, चट्टे, लालसरपणा किंवा नखांचे जंतुसंसर्ग यांसाठी दररोज पायांची तपासणी करावी.
  • मापाच्या आणि मऊ चपलांचा वापर करावा. रात्री झोपताना पातळ पायमोजे घालावेत.
  • पायाची नियमितपणे तपासणी करणे. पायाचा तळवा पाहण्यासाठी पायाखाली आरसा धरावा. पायाला जखम झाल्यास घरगुती उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. विनया आंबोरे, मधुमेहतज्ज्ञ, जी. टी. रुग्णालय

First Published on December 28, 2017 1:33 am

Web Title: diabetes patient take care of foot