17 January 2019

News Flash

आरोग्यदायी कोशिंबीर

अनेक कुटुंबांमध्ये जेवताना ताटामध्ये काकडी, टोमॅटो, कांदा यांच्या चकत्या आवर्जून असतात

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

चांगले आरोग्य राखण्यासाठी आहारात कोशिंबिरीचा किंवा सलाडचा वापर करा, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये जेवताना ताटामध्ये काकडी, टोमॅटो, कांदा यांच्या चकत्या आवर्जून असतात. मात्र दररोज अशा प्रकारचे कच्चे पदार्थ खाऊन कंटाळा येण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी पोषणमूल्य वाढवणाऱ्या या कोशिंबिरीमध्ये काही बदल करून ताटातील ‘सलाड’ हा प्रकार अधिक रंजक, आकर्षक आणि चवदार करता येऊ शकतो.

कोशिंबिरीच्या चवीत वेगळेपणा आणण्यासाठी फळभाज्यांबरोबर फळे, भाज्या, पालेभाज्या, कंदमुळे यांचा समावेश करता येऊ शकतो. चवीमध्ये बदल करण्यासाठी विविध प्रकारच्या डाळी, मोड आलेली कडधान्ये, दही, पनीरबरोबरच सुकामेव्याचाही समावेश करता येईल. यातून कोशिंबिरीला गोड, तिखटबरोबर खमंग चवही आणता येऊ शकते.

कोशिंबिरीचे प्रकार

डाळींची कोशिंबीर

चणे किंवा मुगाची डाळ काही तास भिजत ठेवा. त्यातील पाणी काढून घ्या आणि त्यामध्ये किसलेला कोबी घाला. वरून मीठ, लिंबाचा रस, साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. या कोशिंबिरीत प्रथिने आणि तंतुमय घटकांचे (फायबर) प्रमाण जास्त असते.

फळांची कोशिंबीर

पेरू, आवळा, आंबा, अननस यांचे बारीक तुकडे करून घ्या. यामध्ये बारीक चिरलेले आले घाला. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाच्या मिठाचा वापर न करता काळे मीठ वापरा. यामध्ये भरपूर प्रमाणात खनिज असते. यामध्ये मोड आलेल्या कडधान्याचाही वापर करता येऊ शकतो. मोड आलेल्या कडधान्यांमधून ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्व मिळते आणि आरोग्याबरोबरच अन्न पचनास मदत होते. कोशिंबिरीत ओवा, जिरे, लाल मिरच्या, अळीव, बडीशेप, शेंगदाणे, काळे-पांढरे तीळ, मोहरी यांचा समावेश करता येऊ शकतो. यामध्ये विविध भाज्यांचा वापर करता येऊ शकतो.

आरोग्यासाठी उपयुक्त..

* कोशिंबीर तयार करताना भाज्या, फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत.

* बाजारातून खरेदी करताना ताज्या भाज्या आणि फळे विकत घ्या.

* कोशिंबिरीत वापरणारे पदार्थ फार काळ शिजवू नये आणि खाण्याच्या काही वेळापूर्वी कोशिंबिरी तयार कराव्यात.

* अनेक घरात काकडी, बीट, कांदा बारीक चिरण्याऐवजी किसून घेतला जातो. मात्र किसताना या पदार्थातील पाणी वाया जाण्याची शक्यता असते. अशा वेळी काकडीतून निघालेले पाणी कोशिंबिरीत घालावे किंवा वरण किंवा भाजीतही घालता येऊ शकते.

* कोशिंबिरीत आंबटपणा आणण्यासाठी दही किंवा लिंबाचा वापर करा.

* चक्का म्हणजे घट्टा दही आरोग्यासाठी अधिक चांगले. त्यामध्ये अधिक प्रथिने असतात.

* अनेक घरांमध्ये कोशिंबिरीत शेंगदाण्याचा कूट घातला जातो. मात्र याचे प्रमाण बेताचे असावेत.

मेथीची कोशिंबीर

पालेभाजीची मेथी स्वच्छ धुवा आणि बारीक चिरून घ्या. यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची घाला. शक्य असल्यास थोडय़ा तेलात जिरे, हिंग, कडीपत्त्याची फोडणी घालावी. मधुमेहींसाठी ही कोशिंबीर अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये मेथीऐवजी कांद्याची चिरलेली पात घातली तरी कोशिंबिरीला चांगली चव येते.

बिटाची कोशिंबीर

ही कोशिंबीर दिसायला रंगीत असते. यामध्ये बीट, गाजर किसून घालावेत. त्याशिवाय ल्येटूसची पाने, ओले खोबरे आणि कोथिंबीर वरून भुरभुरावी. ल्येटूसची पाने नसल्यास कोबीचा वापर करता येऊ शकतो. आरोग्यासाठी उपयुक्त असणारी ही कोशिंबीर नाश्त्यासाठीही खाता येऊ शकते.

मांसाहारी कोशिंबीर

कोशिंबिरीत काकडी, कांदा, टोमॅटो, गाजर असतात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी उकडलेले किंवा भाजलेले मासे, चिकनचे तुकडे, उकडलेली अंडी यांचाही समावेश करता येऊ शकतो. यामध्ये विविध भारतीय मसाले घालावेत. मसाल्यांच्या वापरामुळे अ‍ॅण्टीऑक्सिडण्टमध्ये वाढ होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. या पदार्थामुळे वजन नियंत्रणात ठेवणे शक्य होते.
– डॉ. रत्ना थर, आहारतज्ज्ञ

First Published on February 13, 2018 1:53 am

Web Title: different types of salad recipes