23 April 2019

News Flash

मन:शांती : ‘चिंते’ची चिंता नसावी!

चिंतेच्या विकाराची स्थिती किंवा बळी पडलेल्यांची संख्या ही नक्कीच चिंताजनक आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

१९१७ साली राम गणेश गडकरींनी एक कविता लिहिली होती, ‘चिंतातुर जंतू’!

‘निजले जग, का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला।

काय म्हणावे त्या देवाला? वर जाउनी म्हण जा त्याला॥

तेज रविचे फुकट सांडते उजाड माळावर उघडय़ा।

उधळणुक ती बघवत नाही-डोळे फोडुनी घेच गडय़ा॥

अशी विनाकारण छोटय़ा छोटय़ा गोष्टींची चिंतेचे किडे वळवळणाऱ्या लोकांविषयी केलेली ही कविता! खरोखरच असे लोक आजही आपण बघतो. त्यातील काही जणांना कळत असते की आपण उगाचच चिंता करतोय पण त्यावर त्यांचे नियंत्रणच उरलेले नसते! चिंतेचा मंत्रचळ अशी त्यांची स्थिती झालेली असते.

‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात. ‘तसेच चितेपेक्षा चिंता जास्त जाळते’, असेही म्हणतात. म्हणजेच चिंता आली की विचारांची गाडी सकारात्मकतेचा मार्ग सोडून भलत्याच नकारात्मक रुळांवरून धावू लागते. त्यातून भयंगड वाढीला लागतो. हाताला कंप सुटणे, घामाघूम होणे, तोंड कोरडे पडणे, छातीची धडधड वाढणे, चक्कर आल्यासारखे वाटणे तसेच काहीच न सुचणे, गोंधळ होणे, विसरणे, ब्लँक होणे, चिडचिड अशी लक्षणे दिसतात. त्याच्यामुळे चिंता अधिकच वाढते.

चिंतेच्या विकाराची स्थिती किंवा बळी पडलेल्यांची संख्या ही नक्कीच चिंताजनक आहे. भारतात सुमारे २०-२२ टक्के कुमारवयीन मुलांमध्ये चिंतेचे विकार दिसून येतात. ग्रामीण भारतातही हे प्रमाण वाढत चालल्याचे संशोधन सांगते. म्हणून चिंतेच्या विकारांचा स्वीकार करून उपचार लवकर, नियमित व व्यवस्थित घेण्याची गरज आहे.

परवा माझ्याकडे एक रुग्ण आला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो चिंतेच्या विकारासाठी माझ्याकडून औषधोपचार घेत होता पण म्हणावा तसा फरक येत नव्हता. तेव्हा मी त्याला विचारले की दारू घेता का किंवा चालू केली आहे का? त्याने मान्य केले की तो दारू घेतो थोडी थोडी. मित्राने सांगितले की थोडी घे म्हणजे लवकर बरा होशील. पण तसे न होता उलट चिंतेचा विकार बराच होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. दारूमुळे चिंता तात्पुरती मागे पडत होती आणि पुन्हा उसळून वर येत होती!

जेव्हा चिंतेच्या विकारासाठी उपचारांची गरज निर्माण झाली तेव्हा ८००० वर्षांपूर्वी दारूला औषध म्हणूनच वापरले गेले. बायबलचा आधार त्यासाठी सांगितला गेला. पण १८ व्या शतकापर्यंत दारूचा व्यसनाकडे जाणारा दुष्परिणाम प्रकर्षांने लक्षात आला आणि मग ‘अधिकृत’ वापर कमी झाला. अफुचेही तसेच झाले. मग ब्रोमाईड्स, क्लोरल लायट्रेट, बार्बीब्युरेट्स वगैरे औषधांचा वापर करून पाहिला गेला पण पुन्हा गैरवापर आणि व्यसनांकडे जाणारा कल याही औषधांमध्ये दिसून आला.

स्टर्नबारव्र नावाच्या शास्त्रज्ञाने न्यू जर्सीमधल्या प्रयोगशाळेत १९५७ ला एक औषधी द्रव्य तयार केले. त्याचा झोपेसाठी, चिंतानाशक तसेच स्नायू शिथिलीकरणासाठी चांगला उपयोग होईल, असे गुणधर्म आढळून आले. त्याचीच प्रगत आवृत्ती म्हणून १९६० क्लोरडायडिपॉक्झ्साईड हे बेंझोडायझेपाईन गटातले पहिले औषध वापरले जाऊ  लागले. त्यानंतर १९६३ मध्ये डायझेपाम आले. आता या गटातील वीसहून अधिक औषधे उपलब्ध आहेत. त्यानंतर झोपीक्लॉन, झोल्पीडेम अशी वेगळ्या गटातील औषधे आली. पण या सर्व औषधांचा धर्म असा आहे की ती लगेच कार्य सुरू करतात. प्रभावी असतात पण दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ घेतली तर सवय लागते व या औषधांचे व्यसनही लागू शकते. मध्यंतरी माझ्याकडे एक रुग्ण आला होता. त्याला वीस वर्षांपूर्वी फॅमिली डॉक्टरांनी अल्प्रॅझोलाम हे औषध दिले होते. त्याचे व्यसन जडून तो दिवसाला ३० गोळ्या घेत होता, नाही घेतल्या तर फीट्स येत असत. तर दुसऱ्या एका रुग्णाबाबत या औषधाची एकच गोळी सुरू होती. मात्र ती नाही घेतली की इतकी अस्वस्थता येईल की मूळचा विकार परवडला! अनेक रुग्णांमध्ये ही औषधे जनरल फिजिशियन देतात, देत राहतात किंवा त्यांनी नाही दिली तर रुग्ण औषधविक्रेत्यांकडून घेत राहतात. म्हणूनही व्यसन जडते! ही नक्कीच गंभीर बाब आहे.

चिंतेच्या विकारावर आज इतरही अशी सवय/व्यसन न लागणारी इतर औषधे आहेत. बस्पिरोन, फ्लुऑक्सामाईन, पॅरोक्सेटीन, प्रोपॅनोलॉल, इटीझोलाम क्लोबाझाम, टोफीसोपाम ही नवीन औषधे आहेत. पण शेवटी औषधांवर मानसिकदृष्टय़ा अवलंबून राहण्याची रुग्णांची वृत्ती असेल, कशाचा तरी कायम आधार घेण्याचा स्वभाव असेल तर अशा व्यक्तींना कोणत्याही औषधांचे व्यसन जडू शकते! म्हणूनच बेंझोडायझेपिन गटातील औषधांचा वापर हा सुरुवातीच्या काळात करून लगेच कमी करून बंद केला तर सवय लागण्याचे टळते. तसेच त्यांच्याबरोबर वरील नवीन औषधे योग्य प्रमाणात वापरली तर चिंतेचे काही विकार लवकर बरे होऊ  शकतात. त्यासाठी रुग्णांनी नियमित व डॉक्टरांच्या सल्लय़ानेच औषधे घेणे गरजेचे आहे. फिजिशियननी पण हा चिंतेचाच प्रकार आहे हे कळल्यावर लवकर मनोविकारतज्ज्ञांकडे उपचार सोपवणे गरजेचे आहे. तसेच रुग्णांना चिठ्ठीशिवाय औषधे देणे औषधविक्रेत्यांनी टाळले तर बरीचशी व्यसने टळू शकतील.

चिंता ही सर्व मनोविकारांचा पाया आहे. लवकर व नियमित उपाय केले तर लवकर बरे होता येते आणि औषधोपचारांबरोबरच समुपदेशनाचे विविध उपाय यांचा संयुक्त वापर हा शाश्वत निरामयता देऊ शकतो हे नक्की!

जेव्हा चिंतेच्या विकारासाठी उपचारांची गरज निर्माण झाली तेव्हा ८००० वर्षांपूर्वी दारूला औषध म्हणूनच वापरले गेले. बायबलचा आधार त्यासाठी सांगितला गेला. पण १८ व्या शतकापर्यंत दारूचा व्यसनाकडे जाणारा दुष्परिणाम प्रकर्षांने लक्षात आला आणि मग ‘अधिकृत’ वापर कमी झाला. अफुचेही तसेच झाले. मग ब्रोमाईड्स, क्लोरल लायट्रेट, बार्बीब्युरेट्स वगैरे औषधांचा वापर करून पाहिला गेला पण पुन्हा गैरवापर आणि व्यसनांकडे जाणारा कल याही औषधांमध्ये दिसून आला.

-डॉ. अद्वैत पाध्ये Adwaitpadhye1972@gmail.com

 

First Published on April 3, 2018 3:39 am

Web Title: disadvantages of worries