23 January 2018

News Flash

गरगरतंय…

एन्डोलिम्फ या द्रव्यातून मेंदूला संदेश पाठवण्याचे महत्त्वाचे काम होत असते.

मीनल गांगुर्डे | Updated: July 27, 2017 1:13 AM

डॉ. पवन ओझा, मेंदूविकारतज्ज्ञ

दैनंदिन जीवनात चक्कर किंवा भोवळ येण्यामागे विविध कारणे असतात. उपवास, पित्त, अशक्तपणा यांसारख्या अनेक कारणांनी भोवळ येत असते. मात्र या कारणांव्यतिरिक्त सातत्याने भोवळ येत असेल तर त्यामागे व्हर्टिगोसारखा आजार कारणीभूत असू शकतो. मात्र योग्य व्यायाम, जबाबदारीने शरीराची हालचाल आणि आवश्यक औषधे यांचा अवलंब केल्यास व्हर्टिगो या आजारातूनही सहज मुक्तता होऊ शकते. 

शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्त्वाचे काम मेंदू करत असतो. डोळे, कानाचा आतला भाग (व्हेस्टिब्युल), तळपाय व पायाचे सांधे या अवयवांकडून मेंदूला शरीर स्थितीची माहिती मिळत असते आणि मेंदूच्या आदेशाने हे अवयव काम करीत असतात. अनेकदा मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा वयपरत्वे शरीराचा तोल सांभाळणाऱ्या अवयवांमध्ये बिघाड झाल्यास सर्व जबाबदारी कानाच्या आतल्या स्नायूंवर येते. कानातील व्हेस्टिब्युलमध्ये तीन अर्धवर्तुळाकृती कॅनॉल्स असतात. त्या अभिसरित होत असलेल्या

एन्डोलिम्फ या द्रव्यातून मेंदूला संदेश पाठवण्याचे महत्त्वाचे काम होत असते. संवेदनशील अशा मज्जातंतूची टोके साधारण प्रत्येक सेकंदाला १०० वेळा मेंदूला संदेश पाठवितात. आणि शरीराच्या स्थितीची माहिती पुरवत असतात. मात्र ज्या रुग्णांच्या कानाअंतर्गत व्हेस्टिब्युलमध्ये रक्तपुरवठा न होणे, सूज यामुळे कानातून मेंदूला संदेश मिळत नाही त्यांना भोवळ येते आणि शरीराचा तोल जाणे यांसारख्या समस्यांना तोड द्यावे लागते. यालाच वैद्यकीय भाषेत व्हर्टिगो म्हटले जाते.

देशातील सुमारे ५० ते ५५ टक्के रुग्णांना बीपीपीव्ही म्हणजेच बिनाइन पॅरॉक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो या आजाराने पछाडलेले आहे. झोपेत कूस पालटणे, मान वळवणे किंवा गोलाकार फिरणाऱ्या वस्तूंकडे पाहिले तरी अनेकांना याचा त्रास सुरू होतो. डोळे मिटले तर गरगर वाढते. व्हेस्टिब्युलमधील अर्धवर्तुळाकृती कॅनॉल्स युट्रिकल नावाच्या एका पिशवीला जोडलेले असतात. डोक्याची रचना बदलली तर या पिशवीतून कॅल्शियमचे स्फटिक निसटतात आणि एखाद्या तीनपैकी एखाद्या अर्धवर्तुळाकृती कॅनॉलमध्ये (बहुधा मागील बाजूच्या) शिरतात. या स्फटिकांमुळे कानाअंतर्गत स्रावणाऱ्या महत्त्वाच्या (एन्डोलिम्फ) प्रवाहाला अडथळा निर्माण होतो, तिथले मज्जातंतू उत्तेजित होतात आणि मेंदूला डोके हलत असल्याचा संदेश पाठवतात. यामुळे मेंदूला मिळणाऱ्या माहितीत विसंगती निर्माण होते आणि व्हर्टिगोचा आजार सुरू होतो. व्हर्टिगो या आजारावर उपचार घेत असताना काही मूलभूत सवयी लावल्याने हा आजार हळूहळू कमी होऊ  शकतो. अनेकदा आपल्या क्रियांमध्ये मेंदूला झटका बसत असतो. व्हर्टिगोचा त्रास कमी करण्यासाठी डोक्याचा भाग सावकाश वळवावा. चालताना अधिक काळजीपूर्वक चालावे. मेंदूचे काही गंभीर आजार वगळता बाकी रुग्णांना व्यायामाने बराच चांगला परिणाम होऊ  शकतो. झोपून डोळ्यांच्या आणि मानेच्या हालचाली करणे, उठून बसणे-पुन्हा झोपणे, बसून तसेच उभे राहून या हालचाली करणे, पाय जुळवून डोळे मिटणे, टाचा उचलणे, आणखीसुद्धा बरेच व्यायाम यामध्ये आहेत. सुरुवातीला चक्कर वाढल्यासारखी वाटेल, मात्र संयमाने व सातत्याने व्यायाम करत राहिल्यास हळूहळू भोवळ येण्याचे प्रमाण कमी होते. याखेरीज पोटाचे आणि पाठीचे स्नायू विशिष्ट व्यायामाने सशक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. या आजारावर जास्त औषधे घेण्याऐवजी फिजीओथेरेपी किंवा काही मानेचे प्रकार करावेत. मात्र कुठलाही व्यायाम प्रकार किंवा औषधे सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

व्हर्टिगोमध्ये विविध प्रकार आहेत. बीबीपीव्ही हा व्हर्टिगोचा आणखी एक विशेष प्रकार असून तो डोक्याच्या स्थितीशी संबंधित आहे. मेंदूवरील आघात, ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता, रोगप्रतिकार यंत्रणेत बिघाड व हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टीओपोरोसीस) या गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. यावरील उपचारासाठी औषधांपेक्षा फिजीओथेरेपी वापरली जाते.

लक्षणे

भोवळ आल्यासारखे वाटणे, अंधारणे, गरगरल्यासारखे वाटणे किंवा तोल जाणे ही व्हर्टिगोची सर्वसामान्य लक्षणे आहेत. भोवळ येणे आणि तोल जाणे या दोन्ही गोष्टींच्या मुळाशी बरेचदा (ताप व डोकेदुखीप्रमाणेच) दुसरीच एखादी शारीरिक व्याधी असण्याची शक्यता असते. व्हर्टिगो किंवा तोल जाणे यामागे एक तर केंद्रीय (मज्जासंस्थेशी, मेंदूशी, संबंधित) किंवा परीघीय (कानाच्या पोकळीशी किंवा कानाशी संबंधित) कारण असू शकते.

कारणे

  • व्हर्टिगो हा सामान्यत: केंद्रीय (सेंट्रल) व्हर्टिगो आणि परीघीय (पेरिफेरल) व्हर्टिगो अशा दोन गटांत विभागला जातो.
  • केंद्रीय व्हर्टिगो : हा प्रकार मेंदूतील किंवा छोटय़ा मेंदूतील बिघाडाशी संबंधित असतो. (स्ट्रोक, मेंदूतील गाठ म्हणजेच टय़ूमर इत्यादी)
  • पेरिफेरल व्हर्टिगो : हा प्रकार कानाची पोकळी किंवा कानाच्या अंत:भागाशी संबंधित आजारांमुळे उद्भवतो (व्हेस्टिब्युलर न्यूरायटिस, मेनियर्स डिसिज, अँटिबॉडीज इत्यादी.)

First Published on July 27, 2017 1:13 am

Web Title: dizziness causes
  1. No Comments.