22 February 2019

News Flash

पिंपळपान : अमरवेल

अमरवेल गुणाने अनुलोमिक, पित्तसारक आणि यकृत उत्तेजक आहे.

वेलीय वर्गातील ही वनस्पती असून हिचे शास्त्रीय नाव कसकुटा रिल्फेक्सा असे आहे.

‘खवल्ली ग्राहिणी तिक्ता पिच्छिलाऽक्ष्मामयापहा।

तुवराऽग्निकारी हृद्या पित्तश्लेष्मामनाशिनी।।’

धन्वंतरी भाग- १

खूपदा झाडाझुडपांवर पाने नसलेली पिवळसर वेल वाढलेली दिसते. या वेलीची जमिनीतील रुजवण शोधण्याचा प्रयत्न केल्यास सापडत नाही. पाने नाहीत, मुळे नाहीत, तरीही ही वनस्पतीच आहे. ही आहे अमरवेल! वेलीय वर्गातील ही वनस्पती असून हिचे शास्त्रीय नाव कसकुटा रिल्फेक्सा असे आहे. कसकुटॅसीयी म्हणजेच कोंवोलवुलँसीया या कुळातील आहे. इंग्रजीत ‘डोडर’ असे म्हणतात.

अमरवेल (मराठी, गुजराती), निलाथोरी, विराधार (पंजाबी), अल्गुसी (बंगाली), निर्मुण्डी चीडीयो (काठेवाड), अलगजरी (संताळ), खवल्ली, व्योमवल्लीका (संस्कृत) या नावांनी ओळखली जाणारी पर्णरहित मोठी वेल निवडुंगाच्या कुंपणावर पसरलेली असते. खरे पाहता सजीव म्हटले की त्यांचा काही ठरावीक कालावधीनंतर अंत हा ठरलेलाच असतो. अमरवेल या नावावरून या वनस्पतीचा मृत्यू होत नसेल का, असा प्रश्न आपल्या मनात येतो. ही वनस्पती एक आधार संपला की दुसऱ्या आधारावर मग तिसऱ्या अशा साखळी स्वरूपात वाढते. थोडक्यात काय तर तिच्या जीवनाचा अंत लांबवता येतो म्हणून हिला अमरवेल म्हणतात. बंगाल, गुजरातकडे ही मोठय़ा प्रमाणावर मिळते. फुले लहान, पांढरी आणि घंटाकृती असतात. फळे हिवाळय़ात येतात. यास युनानी हकीम ‘आप्क्तिमून्’ असे म्हणतात. औषधांमध्ये ही वनस्पती नेहमी वापरली जाते.

अमरवेल गुणाने अनुलोमिक, पित्तसारक आणि यकृत उत्तेजक आहे. ज्वरांत यकृतवृद्धी असल्यास, कब्ज असल्यास आणि वारा सरत नसल्यास अमरवेलीचा रस देतात. याची यकृतावर विषेष क्रिया घडून पित्तप्रकोप कमी होतो. शौचास साफ होऊन दूषित पित्त शरीराबाहेर पडते. त्वचाविकार जसे खरूज, नायटा, गजकर्ण यांत लेप करतात.

अमरवेलीत हरितद्रव्यात अभाव असल्याने प्रकाशसंश्लेषण पक्रियेद्वारे अन्न तयार करता येत नसल्याने अन्नासाठी संपूर्णपणे आधारवृक्षावर अवलंबून असते. ही पूर्णत: परजीवी वनस्पती आहे. आधार वनस्पतीतील अन्न शोषून घेणारी शोषक मुळे अमरवेलीला असतात. अमरवेलीचे कमकुवत खोड पिवळसर असून ती गोल सुतासारखी वृक्षांवर आच्छादलेली दिसते. हिचा थोडासा तुकडा तोडून झाडावर टाकला तरीही ती झपाटय़ाने वाढून सर्व झाड वेढून घेते. अमरवेलीचे बी जमिनीत रुजल्यावर त्यातून तंतूसारखे खोड येते, परंतु लवकरच त्याला पोषणार्थ दुसऱ्या वनस्पतीचे खोड मिळाले नाही तर ते मरून जाते. एकदा का दुसऱ्या वनस्पतीचा आधार मिळाला की तिच्या खोडाला शोषक मुळे तयार होतात.

या शोषक मुळांचा आधार झाडाशी संपर्क आला की शोषक मुळे झाडाच्या खोडात, फांद्यांत, पानात घुसून अन्नरस शोषून घेतात. या वेलीला जमिनीत वाढणारी मुळे नसल्याने हिला ‘निर्मुळी’ असेही म्हणतात. अमरवेलीमुळे आधारझाडाला हानी पोचून वाढ खुंटते, म्हणून बागेतील झाडांवर अमरवेल आढळताच ती काढून टाकावी. जरी ही वनस्पती परजीवी असली तरी तिचे औषधी गुणधर्म आहेत.

अमरवेलीच्या खोडात कसकुटीन नावाचे रासायनिक द्रव्य आढळते, तर बियांमध्ये अमरवेलीन आणि कसकुटीन द्रव्य आढळते.

– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on January 16, 2018 1:58 am

Web Title: dodder plant facts and health benefits