‘आवाजावर मर्यादा आणा,’ असे निर्देश न्यायालयाकडून वारंवार मिळूनही आपण त्याकडे किती दुर्लक्ष करतो हे नुकत्याच संपलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमधून दिसले. या आवाजाचे परिणाम काय झाले हेदेखील हळूहळू पुढे येत आहे. आवाजामुळे शरीरावर व मनावर नेमके का व कसे परिणाम होतात, ते लक्षात घेतले की पुढच्या वेळी डॉल्बीचा आवाज कमी करण्यासाठी आपणच तगादा लावू.

ढोलताशे, डीजे, ध्वनिक्षेपक यांचा कानठळ्या बसवणारा दणदणाट मानसिक ताणासोबतच तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरतो. कल्याणमध्ये एका गणेशोत्सव मंडळातील डीजेच्या कर्कश आवाजामुळे एका रहिवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली. गणेशोत्सव काळात सतत कानठळ्या बसविणाऱ्या डीजेमुळे त्याची प्रकृती अचानक खालावली. कर्णकर्कश आवाजामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचे अनुमान डॉक्टरांनी काढले असून सध्या ही व्यक्ती अतिदक्षता विभागात दाखल आहे. असाच काहीसा प्रकार कोल्हापुरातही घडला.

गणपती विसर्जनाच्या दिवशी लेझीम खेळताना एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. डॉल्बीच्या दणदणाटामुळे अस्वस्थ वाटते, चिडचिड-मळमळ होते, तात्पुरता मानसिक तणाव निर्माण होतो. या दिवसात हृदयविकाराशी संबंधित अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारींबरोबरच बहिरेपणा, कानांना दडा बसणे अशा तक्रारी घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे येत आहे. याव्यतिरिक्त फटाक्यांच्या आणि वाहतुकीच्या आवाजांमुळेही रुग्णांमध्ये ऐकू येण्याच्या समस्या निर्माण होताना दिसतात.

मोबाइलच्या वापरकर्त्यांमध्ये संगीत ऐकण्यासाठी हेडफोन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळेही कानाच्या समस्या निर्माण होतात. अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या २०१०च्या सर्वेक्षणानुसार १५ टक्के अमेरिकन नागरिकांमध्ये कानाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. जन्मजात मुलांनाही कर्णकर्कश आवाजाचा धोका असतो. यांचे अवयव नाजूक असल्यामुळे मोठय़ा आवाजाचे घातक परिणाम होऊ  शकतात.

कर्णकर्कश आवाजामुळे कायमचा बहिरेपणा

सर्वसाधारणपणे माणूस ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. मात्र सतत ८० डेसिबलच्या आवाजानेही त्रास होतो. त्यामुळेच ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमावलीनुसार निवासी भागात ५५ डेसिबलची मर्यादा घातली गेली आहे. मात्र आपल्याकडील उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा पार १०० डेसिबलच्या पलीकडे पोहोचते. मोठय़ा फटाक्यांचा आणि एमपीथ्री प्रणालीचा आवाज १५० डेसिबलपर्यंत जातो. हा आवाज माणसाच्या श्रवणयंत्रणेच्या सहनशक्तीच्या पलीकडचा असतो. या आवाजामुळे कानाच्या आतील भागातील पेशींचे नुकसान होते. मोठय़ा आवाजामुळे कानाच्या पडद्यावर छिद्र झाले किंवा परिणाम झाला तर शस्त्रक्रिया करून उपचार करता येतो. यामध्ये कानाचा पडदा बदलताही येऊ  शकतो. मात्र १८० डेसिबल किंवा त्याहून अधिक आवाज असेल तर कानाची नस खराब होण्याची शक्यता असते. या नुकसान झालेल्या शीरेवर उपचार करता येत नाही. त्यामुळे रुग्णाला कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते. सण-उत्सवांमधील मिरवणूक किंवा लग्न समारंभात यात सध्या डॉल्बीयुक्त प्रणालीचा वापर वाढला आहे. असा कर्णकर्कश आवाज सतत कानावर पडल्यामुळे जेथे सर्वसाधारणपणे वयाच्या ६०व्या वर्षी बहिरेपणा येतो तिथे तो ४०व्या वर्षांतच येतो.

बॅण्डमध्ये काम करणाऱ्यांना बहिरेपणाची लागण

सतत ढोल-ताशे, बॅण्ड किंबा डॉल्बी प्रणालीमध्ये काम करतात. त्यांच्यामध्ये बहिरेपणा सर्रास पाहावयास मिळतो. सतत मोठय़ा आवाजाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आवाज कानावर आदळून कानाची नस खराब होण्याची किंवा कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे या माणसांमध्ये कानाच्या, ऐकण्याच्या संबंधितचे आजार निर्माण होतात.

मोठय़ा आवाजामुळे मनावर ताण

डॉल्बीयुक्त प्रणालीत, डीजे किंवा कर्कश ढोल-ताशांच्या आवाजामुळे होणारा परिणाम शारीरिक आणि मानसिकही असतो. यामुळे तणाव वाढणे, चिडचिड वाढणे, मळमळणे हा त्रास सुरू होतो. गर्दीमधील मोठय़ा आवाजामुळे ग्लानी येण्याचाही संभव असतो. हा परिणाम तात्पुरता असतो. या वातावरणातून बाहेर गेलात तर मनावरील ताण किंवा चिडचिडेपणा कमी होतो

डॉल्बीतील ‘हुपर’ या यंत्रामुळे हृदयाची धडधड वाढते आणि हृदयाची पूर्णत: उघडझाप होत नाही. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. अशा प्रसंगी बेशुद्ध होणे, डोके दुखणे, घाबरल्यासारखे होणे, अस्वस्थ वाटणे, अशा समस्या निर्माण होतात.

प्रतिबंधात्मक उपाय

  • मधुमेह किंवा रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी ९० डेसिबलहून अधिक आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • कानामध्ये कापसाचा बोळा किंवा आवाज ऐकू येण्याचे प्रमाण कमी होईल अशा यंत्राचा वापर करावा, कानावर हात ठेवावा.
  • लहान मुलांना मोठय़ा आवाजापासून लांब ठेवावे.
  • कार्यक्रमांमध्ये कमी आवाजात संगीत लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
  • गर्भधारणा असलेल्या महिलांनी मोठय़ा आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळावे, यामुळे गर्भातील बाळाला धोका असू शकतो.

हृदयविकाराचा धोका

कर्णकर्कश आवाजामुळे फुप्फुसांमध्ये हवेचा फुगा तयार होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, तर बऱ्याचदा जे मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराने ग्रस्त असतील अशा रुग्णांना याचा धोका अधिक आहे. १८० ते २०० डेसिबल इतक्या आवाजामुळे सर्वसाधारण व्यक्तीलाही हृदयाचा विकार जडण्याची शक्यता वाढते. उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये मोठय़ा आवाजामुळे रक्तदाब वाढतो आणि तो वेळीच नियंत्रणात आणला नाही तर हृदयावर ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे सण-उत्सवांच्या दरम्यान मोठय़ा आवाजामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होते.

meenal.gangurde@expressindia.com

(के. जे. सोमय्या रुग्णालयातील काननकाघसा विभागप्रमुख डॉ. दिनेश वैद्य, जसलोक रुग्णालयातील काननकाघसा विभागातील डॉ. डिलन डिसूजा, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. हरीश मेहता, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार)