20 November 2017

News Flash

बाल आरोग्य : ‘फिट’चा आजार

औषधाचा डोस वाढवावा लागतो किंवा झटक्याचा प्रकार बघून दुसरे अजून एखादे औषधही सुरू करावे

डॉ. अमोल अन्नदाते | Updated: August 31, 2017 3:16 AM

डॉक्टर औषधे घेतली तर हा आजार पूर्ण बरा होऊ  शकतो.

खरे तर मानसीचे आई-वडील तिला अगदी अनपेक्षितपणे आलेल्या झटक्यांमुळे जरा हादरलेलेच होते. सर्व तपासण्या करून झाल्यावर आता मानसीला पुढील दोन वर्षे नीट औषधे घेण्याविषयी समजावून सांगण्याचा महत्त्वाचा टप्पा होता. ‘‘डॉक्टर, पण झटक्यांची औषधे चालू करणे गरजेचेच आहे का? नाही घेतली ही औषधे तर नाही चालणार. मी असे ऐकले आहे की झटक्यांच्या औषधांचे खूप दुष्परिणाम असतात.’’ हे बघा, आता मानसीला दोन वेळा झटके येऊन गेले आहेत आणि सी. टी. स्कॅन आणि ईईजीचे रिपोर्टही सामान्य आहेत. म्हणजे या झटक्यांचे नेमके कारण आपल्याला सापडलेले नाही. याला आमच्या वैद्यकीय भाषेत अनप्रोवोक्ड म्हणजे काही कारण न सापडलेले झटके, असे म्हणतात. यात आता जास्त जोखीम पत्करण्यात अर्थ नाही. त्यामुळे आता मात्र आपण झटक्यांच्या गोळ्या सुरू करणे गरजेचे आहे आणि तुम्ही या गोळ्यांच्या दुष्परिणामांना घाबरू नका. ते अगदीच नगण्य असतात. मी तुम्हाला घाबरवत नाही, पण आपण गोळ्या सुरू केल्या नाही आणि पुढचा झटका मोठा आला तर ती जोखीम मोठी असेल. तुम्ही औषधांच्या दुष्परिणामांची काळजी करू नका. सध्या पुढचा झटका येऊ  न देणे हेच आपल्या समोरचे सगळ्यात मोठे लक्ष्य आहे.

ठीक आहे डॉक्टर, पण आता या गोळ्या किती काळ चालू ठेवायच्या. बघा हिला औषधे चालू केल्यावर  झटका आलाच  नाही तर दोन वर्षे औषधे देऊन ते पुढे दोन-तीन महिन्यांत कमी करत नंतर बंद करता येतील, पण औषधे सुरू करूनही झटका आला तर घाबरण्याची गरज नाही. औषधाचा डोस वाढवावा लागतो किंवा झटक्याचा प्रकार बघून दुसरे अजून एखादे औषधही सुरू करावे लागते. चालेल डॉक्टर, पण अचानक हिला झटका आला तर काय करावे आम्ही. त्याचीही काळजी करू नका. आता अशा वेळी झटका आल्यावर घरच्या घरी नाकातून स्प्रेद्वारा देता येईल, असा ‘मिडाझोलाम’ या अत्यंत प्रभावी औषधाचा स्प्रे उपलब्ध आहे. तुम्ही तो घरात व तिच्या जवळ ठेवू शकता, तसेच तिच्या शाळेमध्येही याविषयी सांगून ठेवा. तिच्या खिशामध्ये तिला झटक्यांचा आजार आहे आणि तो आल्यास हा स्प्रे मारावा, असे एक ओळखपत्रासारखे कार्ड खिशात ठेवा.

‘डॉक्टर, ती सगळे खेळ खेळू शकते का?’ ‘हो! पण झटक्यांचा आजार असणाऱ्यांनी पोहणे टाळावे. सायकलिंगच्या वेळी शक्यतो कोणीतरी सोबत असावे. ही लहान आहे पण अशा रुग्णांनी कुठलेही वाहन चालवू नये, असा आम्ही सल्ला देतो.’ डॉक्टर, या झटक्यांमुळे मानसीच्या बुद्धिमत्तेवर किंवा अभ्यासावर दुष्परिणाम होऊ  शकतो का? मुळीच नाही, झटक्यांचा आजार आणि बुद्धिमत्तेचा काहीच संबंध नाही. हिच्या आहारामध्ये काही बदल आवश्यक आहेत का? सध्या झटक्यांच्या रुग्णांसाठी एक वेगळ्या प्रकारचा आहार सांगितला जातो. पण ते गोळ्यांनी आटोक्यात न येणाऱ्या झटक्यांसाठी असते. आता सध्या मानसीला त्याची काही गरज वाटत नाही.

म्हणजे डॉक्टर औषधे घेतली तर हा आजार पूर्ण बरा होऊ  शकतो. हो! नक्की बरा होऊ  शकतो. पण त्यासाठी एक दिवसही औषधे घेण्यामध्ये खाडा नको. एक वेळ जेवण झाले नाही तरी चालेल- खरे तर तसेही नको व्हायला. पण जेवणाची वेळ टळली तरी गोळ्यांची वेळ आणी सातत्य टळायला नको हे लक्षात ठेवा.

डॉ. अमोल अन्नदाते amolaannadate@yahoo.co.in

First Published on August 31, 2017 3:16 am

Web Title: dr amol annadate article on health issue
टॅग Health Issue