18 November 2017

News Flash

मना पाहता! चिंतातुर जंतू

‘मी मध्यंतरी असं ऐकलं की, सारखी चिंता करणाऱ्या लोकांना पुढे काही तरी गंभीर शारीरिक

डॉ. मनोज भाटवडेकर | Updated: August 31, 2017 3:11 AM

चिता जाळत नाही इतकी चिंता जाळते असं म्हणतात ते खोटं नाही.

‘मी मध्यंतरी असं ऐकलं की, सारखी चिंता करणाऱ्या लोकांना पुढे काही तरी गंभीर शारीरिक आजार होतात. मी अशी सारखी चिंता करते. मला नाही ना हो गंभीर शारीरिक आजार होणार? हे ऐकल्यापासून तर मला सारखं वाटतं की, मी लवकरच आयसीयूत दाखल होणार.. हृदयाचं काही तरी दुखणं होऊन. माझा नवरा मला सांगून सांगून थकला की तुला काहीही होणार नाही, तू कशाला उगाचच काळजी करतेस? पण मी काय करू तेच कळत नाही.’

‘अहो डॉक्टर, हिच्यापुढे कठीण आहे. खरंच कठीण आहे. आधी ही चिंता करते. कसली ना कसली तरी. आज चिंता करण्यासारखं काही तरी घडलं म्हणून. मग एखाद्या दिवशी काहीच घडलं नाही म्हणून. चिंता केली म्हणून काही होणार नाही ना, याची चिंता करते. मग मी इतकी का चिंता करते याची चिंता करते. तिच्या या वेगवेगळ्या चिंता पाहून मी म्हणतो की, तिला या सगळ्याचा खरंच किती त्रास होत असेल. नवरा म्हणून तिला काही समजवायला गेलं तर तिला पटत नाही. आपल्या चिंताच कशा खऱ्या आणि योग्य आहेत हे ती आपल्याला पटवायला जाते. मग मात्र अशक्य होऊन बसतं सगळं.’ ‘कसल्या एवढय़ा चिंता असतात तुम्हाला?’‘थांबा, मी सांगतो तुम्हाला. एक उदाहरण घेऊ. समजा, आज भांडी घासणारी बाई आली नाही. मला जर हे कळलं तर मी तिला सांगतो की तू काही काळजी करू नकोस. मी तुला मदत करतो. पण ते इतकं सोपं नसतं. भांडी घासली जाणं राहिलं बाजूला. ते महत्त्वाचं नसतं. हिची सुरुवात होते, ती का बरं आली नसेल? हल्ली तिच्या नवऱ्याची तब्येत बरी नसते. त्याला काही झालं तर नसेल? समजा काही झालं असलं तर ती बिचारी काय करेल? तिच्यावर घरातल्या सर्वाचं पोट अवलंबून आहे. जर तिला कामावर येता आलं नाही तर तिचं घर कसं चालणार? मागच्या वेळी तिने आपल्याकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. आता पुन्हा तिने मागितले तर आपण तरी सारखे कुठून देणार आणि किती पुरे पडणार? समजा नाही दिले आणि ती काम सोडून निघून गेली तर? मागचे पैसे गेले ते गेलेच. हे सगळं विचारमंथन मोठय़ा आवाजात सगळ्या घरादाराला ऐकू जाईल अशा पद्धतीने सुरू असतं. तेवढय़ा वेळात माझी अर्धी भांडी घासून झालेली असतात. आणि मग आमच्या कामवाल्या बाईचा फोन येतो. मला ताप आलाय म्हणून मी आले नाही, औषध आणलंय, ताप गेला की येईन. मी सुटकेचा नि:श्वास टाकावा तर हिची पुढची चिंता तयार असते. तिला मागच्या महिन्यातही ताप आला होता.. मलेरिया तर नसेल? नवीन चिंतापर्व सुरू.. मी हल्ली तिला फारसं समजावण्याच्या फंदात पडत नाही. इकडून ऐकतो आणि तिकडून सोडून देतो. अहो, वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच.’

चिता जाळत नाही इतकी चिंता जाळते असं म्हणतात ते खोटं नाही. चिंता करणाऱ्या काही माणसांचा स्वभावच चिंतातुर असतो. इतरांवर भावनिकदृष्टय़ा अति अवलंबून असणारी माणसं जास्त चिंतातुर असतात. त्याचबरोबर जी माणसं समोर आलेला ताण स्वीकारून त्याचा सामना करायचं सोडून त्यापासून पळ काढायला पाहतात तीही सतत चिंताग्रस्त असतात. भावनिकदृष्टय़ा परावलंबी माणसं स्वत: निर्णय घ्यायला घाबरतात. आपला निर्णय चुकला तर काय होईल, त्याची जबाबदारी कोण घेणार, ही चिंता त्यांना भेडसावत असते. पळपुटेपणा करणारी माणसं ताणाचा मुकाबला करतच नाहीत. त्यामुळे चिंता त्यांच्या मानगुटीवर बसणं स्वाभाविक आहे.

सर्व चिंतांच्या मुळाशी एक गोष्ट समान असते. ती म्हणजे वर्तमानकाळ सोडून भविष्यकाळाची कास सतत धरलेली असते. या क्षणाला कृती काय करायला हवी आहे यापेक्षा पुढे काय वाईट होईल, हा एकच विचार डोक्यात थैमान घालत असतो.

सतत चिंता करणाऱ्या मंडळींना वर्तमानाच्या सान्निध्यात ठेवण्यासाठी ध्यानासारखा दुसरा उपाय नाही. आत्ता आणि इथे माझ्या आयुष्यात काही समस्या नाहीत हे ध्यानाच्या प्रक्रियेतून सहजपणे उमगतं. मग हळूहळू वर्तमानात राहायचं वळण लागतं. आपण जेव्हा शरीराबरोबर मनाने वर्तमानात असतो तेव्हा आपण चिंता करूच शकत नाही. तेव्हा चिंतातुर जंतूंनो, ध्यान शिका..

डॉ. मनोज भाटवडेकर drmanoj2610@gmail.com

First Published on August 31, 2017 3:11 am

Web Title: dr manoj bhatawdekar article on anxiety disorders
टॅग Anxiety Disorders