23 January 2018

News Flash

मना पाहता! : क्षमा करा, आधी स्वत:ला

देशपांडे स्वत:ला चूक वर्गात टाकून मोकळे झाले आहेत.

डॉ. मनोज भाटवडेकर | Updated: August 3, 2017 1:28 AM

‘या प्रसंगाने मला चांगलाच धडा शिकवला. माझ्या बाबतीत हे होऊच कसं शकतं याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं. खरं सांगायचं तर माझीच मला अतिशय लाज वाटतेय. यापुढे मी प्रमाणात पितो आणि मला दारू चढत नाही हे चुकूनही कुणाला सांगणार नाही,’ श्रीयुत देशपांडे (नाव बदललेले) अत्यंत खजील चेहऱ्याने सांगत होते. झालं होतं असं- यंदा ऑफिसनंतर गटारी साजरी करण्याचा घाट त्यांच्या मित्रमंडळींनी घातला. मी प्रमाणातच पितो आणि मला दारू चढत नाही, असा दावा करणारे देशपांडे त्या दिवशी मित्रांच्या आग्रहाला बळी पडून इतके प्यायले की, त्यांना उचलून घरी आणावं लागलं. हा सर्व प्रकार त्यांची पत्नी आणि १७ वर्षांचा मुलगा यांच्यासमोर घडला.

‘दुसऱ्या दिवशी माझ्या बायकोने अक्षरश: वाभाडे काढले माझे. एवढय़ा लोकांसमोर तमाशा झाला ते झालंच, पण मुलासमोर हे घडायला नको होतं. कारण मागच्या महिन्यात एकदा तो मित्रांसोबत पार्टी करून घरी आला, तेव्हा मी त्याला खूप ओरडलो होतो. १८ पूर्ण होण्याआधी तू पितोसच कसा आणि उजळ माथ्याने घरी येतोसच कसा, मी बघ कधी तरी घेतली तरी आपली पायरी सोडत नाही वगैरे वगैरे. माझ्या बायकोचं म्हणणं असं की, त्या वेळी तो काही झिंगलाबिंगला नव्हता, आपल्या पायांनी चालत घरी आला होता. त्याने थोडी बिअर घेतली होती आणि घरी आल्यावर कबूल केलं होतं आणि लगेच सांगितलंही होतं पुन्हा घेणार नाही म्हणून. ती मला सारखं सांगतेय की, तू त्याला काहीही सांगण्याचा अधिकार आता गमावला आहेस. ती फिरून फिरून सारखी त्याच विषयावर येतेय. मी तिला नीट सॉरीसुद्धा म्हणू शकलेलो नाही. मुलगा मात्र एकदाही या बाबतीत काही बोलला नाही. त्याच्या मनात माझ्याविषयी काय मत झालं असेल कोण जाणे. मी अजून त्याच्या पिण्याबद्दल त्याला क्षमा करू शकलेलो नाही. माझ्या मनाला ही गोष्ट सारखी खातेय. माझ्या अपराधाचं तर काय प्रायश्चित्त घेऊ , असं मला झालंय. मुलगा खूप पिऊन घरी आलाय अशी स्वप्नं मला पडताहेत. गंमत म्हणजे माझ्या ऑफिसमधले मित्र झाल्या प्रसंगावर एकदम थंड आहेत.’

चूक आणि बरोबर या दोनच गोष्टींत आपण आयुष्याची वर्गवारी करतो. देशपांडे स्वत:ला चूक वर्गात टाकून मोकळे झाले आहेत. जणू आता परतीची वाट उपलब्ध नाही. (अशा पश्चात्तापामागे छान लपताही येतं!) त्यांची पत्नीही त्यांच्या अपराधी भावनेला खतपाणी घालते आहे. वास्तविक पाहता त्यांच्या हातून जे घडलं ते अनवधानाने घडलं हे उघड आहे. या घटनेतून जर ते काही शिकले तर ही घटना सार्थकी लागली असं म्हणायला हवं. त्यासाठी प्रायश्चित्त वगैरे घेण्याची गरज नाही. आयुष्यात असे प्रसंग आपण काही तरी शिकावं म्हणूनच घडत असतात. आपण दारू प्यावी की न प्यावी या बाबतीतलं भान जर त्यांना आलं तर ते पुरेसं आहे. पश्चात्ताप ही पोखरणारी, कुरतडणारी नकारात्मक भावना आहे. याच भावनेत ते गुंतून राहिले तर आत्मभानापासून वंचित राहतील.

माझ्या हातून चूक होणारच नाही.. मी ‘परफेक्ट’ आहे म्हणजे इतरांनीही तसंच असायला हवं ही अपेक्षा अहंकारातूनच आलेली आहे. यातलं ‘मी परफेक्ट आहे’ हे गृहीतकच मुळात तपासून पाहायला हवं. आपण चुकू शकतो हे जेव्हा आपण स्वत:शी मान्य करतो (सहजपणे.. ‘जाऊ  दे यार, होतं असं कधीकधी’ या सुरात, ‘शी, मी कसा चुकलो’ या सुरात नाही) तेव्हा आपण स्वत:ला क्षमा करू शकतो. स्वत:ला जो क्षमा करू शकतो तोच इतरांना क्षमा करू शकतो.

तात्पर्य काय, तर देशपांडे यांनी स्वत:ला आणि मग मुलालाही उदार मनाने क्षमा करावी. मग घडल्या प्रसंगातून त्यांना कृतज्ञताही वाटेल. सकारात्मक बीजं अनेकदा नकारात्मकतेत दडलेली असतात ती अशी!

drmanoj2610@gmail.com

First Published on August 3, 2017 1:28 am

Web Title: dr manoj bhatwadekar article alcohol story
  1. No Comments.