कानात आवाज येणे आणि बरोबरीने तोल जाणे ही समस्या नक्की कानाची समजावी की मेंदूची?..विचारात पडलात ना? ही समस्या कानाचीच आहे आणि त्यावर उपायही आहेत. त्याविषयी थोडेसे.
कानाचा आणि शरीराचा तोल सांभाळण्याचा संबंध काय?
आपल्याला जो दिसतो तो कान फक्त बाहेरचा कान असतो. पण कानाच्या रचनेनुसार त्याचे बाहेरचा कान, मधला कान आणि आतला कान असे तीन भाग आहेत. यातील आतला हा खूप आत- म्हणजे मेंदूच्या जवळ असतो. या आतल्या कानाला काही दुखापत झाली की कान स्वत:च आवाज करायला सुरूवात करतो. आतल्या कानात ऐकण्याचा आणि शरीराचा तोल सांभाळण्याचा असे दोन अवयव असतात. कानाचे काम ऐकण्याचे हे सर्वाना माहीत असले तरी कानाचा तोल सांभाळण्याशी असलेला हा महत्वाचा संबंध अनेकांना ज्ञात नसतो. दैनंदिन जीवनातील कोणतेही काम करायचे तर शरीराचा तोल सांभाळला जाणे गरजेचे. तोल जाण आणि चक्कर येण्याच्या जवळपास ४० ते ४५ टक्के रुग्णांमध्ये आतल्या कानात निर्माण झालेल्या समस्येमुळे तोल जात असल्याचे दिसून येते. या रुग्णांमध्ये जेव्हा तोल जाणे थांबते तसे कानात आवाज येणेही कमी होत जाते. ही समस्या चाळीस वर्षांच्या पुढच्या वयाच्या लोकांमध्ये अधिक दिसते.

कानात आवाज का येतो?
कानात आवाज येण्याची विविध कारणे आहेत. आतल्या कानाला झालेला विषाणू संसर्ग किंवा त्याला आलेली सूज, आतल्या कानाला मार लागणे ही कारणे सामान्यत: दिसतात. काही रुग्णांमध्ये लैंगिक संबंधांमधून पसरणारा आजार-ओटो सिफिलिस किंवा न्यूरो सिफिलिस- हा देखील आतल्या कानाच्या समस्येला कारणीभूत ठरलेला दिसतो. आपल्या डोक्यात मेंदूच्या बाजूने एक प्रकारचा द्रव फिरत असतो आणि तोच द्रव आतल्या कानातही फिरतो. न्यूरो सिफिलिस या आजारात या द्रवाला संसर्ग होतो आणि तोच संसर्ग आतल्या कानालाही होऊ शकतो.
‘मिनिअर्स डिसिझ’ हे कानात आवाज येणे व तोल जाण्याचे आणखी एक कारण. यात अचानक फिरणारी चक्कर येणे, खूप वेळ गरगरते, कानात दडा बसतो, आवाज येतो आणि ऐकण्याची क्षमताही कमी होते.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

निदान कसे करतात?
अंतर्कणात निर्माण झालेली समस्या ‘सीटी स्कॅन वा एमआरआय’ने सापडणारी नाही. विविध प्रकारच्या ‘फंक्शनल’ चाचण्यांनी तो शोधता येतो. रुग्णाच्या कानात आवाज येणे आणि तोल जाणे नक्की कशामुळे हे एक कोडेच आहे. कारण मानेचा त्रास, रक्तदाबाचा त्रास, रक्तपुरवठा कमी पडणे, पायातील ताकद गेल्यामुळे अशा अनेकविध कारणांमुळे चक्कर तोल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे येणारी चक्कर आणि कानातील आवाजाचे नेमके कारण कळून घेण्यासाठी साधारणत: एक तासाच्या फंक्शनल चाचण्या केल्या जातात. कानात आवाज येणे आणि तोल जाण्याकडे दुर्लक्ष करणे बरे नाही. दुर्लक्ष झाल्यास ती समस्या वाढत जाते. तोल जाऊन पडल्यास हातापायांना वा डोक्याला दुखापत होण्याचीही शक्यता असते.

उपचार काय?
hlt03* समजा उजव्या कानातून आवाज येत असेल आणि डावा कान चांगला असेल तर आपला मेंदू स्वत:च उजव्या कानाची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. कानाच्या या समस्येला औषधांचा फारशी गरज नसते. ही औषधे ‘सीडेटिव्हज्’ असतात. कानात निर्माण झालेली समस्या औषधांमुळे दाबून टाकली जाते आणि त्यामुळे मेंदू त्या समस्येवर जे उपाय करु पाहात असतो त्याचा गोंधळ उडतो. त्यामुळे औषधे बंद केल्यावर समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. या औषधांचे काही दुष्परिणाम देखील आहेत.
* अर्थात आतील कानाला झालेला संसर्ग न्यूरो सिफिलिसमुळे असेल तर त्यावर प्रतिजैविके द्यावी लागतात. परंतु आतील कानाच्या विषाणू संसर्गाला औषध द्यावे लागत नाही, कारण विषाणू संसर्ग होऊन गेल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून आतील कानाची समस्या निर्माण झालेली असते. तर मिनिअर्स डिसिजमध्ये कान शांत करायला स्टिरॉइड इंजेक्शन द्यावे लागते.
* कानातील समस्या दूर करण्याच्या कामी मेंदूला प्रशिक्षित करता येते. याला ‘व्हेस्टिब्यूलर रीहॅबिलिटेशन’ असे म्हणतात. म्हणजेच कानातील तोल सांभाळणाऱ्या यंत्रणेचे एक प्रकारे पुनर्वसन. विशिष्ट प्रकारच्या व्यायामांच्या आधारे मेंदूचे हे प्रशिक्षण करताकरता येते. अर्थात हे व्यायाम प्रत्येकाच्या समस्येनुसार वेगवेगळे असतात आणि ते सुरू केल्यावर त्याचा चुटकीसरशी परिणाम दिसला असे होत नाही. त्याला काही वेळ द्यावा लागतो व त्यामुळे आजार बरा होऊ शकतो. या व्यायामांच्या चार ते पाच पायऱ्या आहेत. साधारणत: दररोज एक ते दीड मिनिटे असा पाच वेळा असा सुचवलेला व्यायाम केला की कानाची तक्रार दूर करण्यासाठी मेंदूचे प्रशिक्षण सुरू होते. दहा ते बारा आठवडय़ांत त्याने फरक पडू शकतो.
– डॉ. विनया चितळे, कान-नाक-घसा तज्ज्ञ
(शब्दांकन- संपदा सोवनी)