कालच मकर संक्रांत झाली. हा सण शिशिरात येतो आणि शिशिर ऋतू हा हिवाळ्याचाच भाग आहे. या दिवसांत पोटातील अग्नी वाढलेला असतो, म्हणजेच भूक चांगली लागते आणि खाल्लेले अन्न पचवताही येते. हा बल मिळवण्याचाच काळ असल्यामुळे भरपूर आणि पौष्टिक खाण्यास सांगितले आहे. असे काही पदार्थ पाहू या –

तीळ –
शिशिर ऋतूचे एक वैशिष्टय़ म्हणजे वातावरणातील रुक्षता. या रुक्षतेचे शरीरावरील परिणाम कमी करण्यासाठी स्निग्ध पदार्थ खाण्यास सांगितले आहे. त्यामुळे संक्रांतीच्या आसपास असे पदार्थ जरूर खावेत. स्निग्ध पदार्थात तीळ चांगले समजले जातात. तीळ हे मुळात तेलबीज आहे त्यामुळे त्यात तैलीय अंश पुष्कळ आहे. तेलबिया शरीराला पोषण देतात. वनस्पतीचा गर्भ बीच्या आत असतो. त्या गर्भाचे आणि गर्भाकुराचे पोषण करण्याची जबाबदारी त्या बीवरच असते. त्यामुळे पोषणासाठी लागणारे सर्व पदार्थ त्यात असतात. तिळामध्ये शरीराला आवश्यक अमिनो आम्ले आणि त्यातील अर्जेनाइन भरपूर प्रमाणात असते. तसेच कॅल्शियम, फॉस्फरसदेखील असते. त्यामुळे तिळाचा वापर या दिवसांत आहारात हवाच. तीळ उष्ण, बल्य, मधुर व स्निग्ध गुणांचे आणि वातनाशक देखील आहेत.

गूळ –
पोषणाच्याच दृष्टीने गुळाकडे बघायला हवे. गूळ उष्ण, मधुर, गुरू आणि बलप्रद रसायन आहे व असे असूनही तो या ऋतूत चांगला पचतो. गूळ ज्या उसापासून बनतो त्याचे थंडीत तितकेच महत्त्व आहे. ऊसही पोषण देतो आणि त्याच्यापासून बनवलेला सर्वात चांगला पदार्थ म्हणजे गूळ. मात्र हे गुण मिळण्यासाठी गूळ नैसर्गिकरीत्या तयार केलेला असावा. गूळ श्रम कमी करणारा, थकवाहारक आहे. पूर्वी पाहुणे आल्यावर पाण्याबरोबर गुळाचा खडा द्यायचे तो बहुधा त्यासाठीच. उसाला ‘तृणराज’ म्हणजे गवतांचा राजा म्हणतात. तिळगुळात मात्र नेहमी फक्त गूळ वापरत नाहीत. साखरही भरपूर वापरली जाते. ही साखरदेखील नैसर्गिकरीत्या बनवलेली, उसाच्या गुणांच्या जवळ जाणारी असल्यास चांगले. अर्थात ज्यांना शक्य आहे त्यांनी ऊस जरूर खावा.

बाजरी –
बाजरी उष्ण असते, उन्हाळ्यात खाऊ नये असे म्हणतात. पण आयुर्वेदात बाजरी केवळ थंडीतच खावी असे कुठेही म्हटलेले आढळत नाही. उलट बाजरी बाराही महिने खाल्ली तरी चालेल अशीच आहे. बाजरी गुणांनी बृहणीय (पोषक), गुरू, मधुर रसात्मक, कफाला कमी करणारी आहे. परंतु ती रुक्ष असल्यामुळे बाजरीच्या भाकरीला तूप वा लोणी लावून खाण्याचा पायंडा पडला असावा. वजन वाढू न देता तसेच कफ वाढू न देता शरीराचे पोषण करणारी बाजरी आहे. त्यात तेरा आवश्यक अमिनो आम्ले आहेत. हाडांना मजबूत करणारे फॉस्फरसदेखील आहे. मधुमेह्य़ांनी बाजरी आवर्जून खावी अशीच आहे. हल्ली ग्लूटेनची अ‍ॅलर्जी म्हणजे गव्हाचे पदार्थ खाल्ल्यावर पोट बिघडण्यासारखे त्रास होण्याची तक्रार वाढत चाचली आहे. अशा व्यक्तींसाठीही बाजरी चांगली. थंडीत नवीन आलेले धान्यही खाऊन चालते. ज्वारीचा हुरडा या दिवसांत चांगला मिळत असल्यामुळे तो खावा.
या दिवसात भारतीय उपखंडात जवळपास सगळ्या ठिकाणी हेच पदार्थ खाल्ले जातात. मकर संक्रांतीच्या वेळी पीक काढून घरात आलेले असते आणि अन्नाची मुबलक उपलब्धता असते, शिवाय खाऊन ते पचवण्याची शक्तीही अंगात असते. पंजाबामध्ये या दिवसांत ‘लोहडी’ हा सण साजरा करतात. त्यातही शेकोटी पेटवून त्याच्या बरोबरीने तीळ, शेगदाणे, ऊस, गूळ असे पदार्थ अन्नात असतात. पालेभाज्या, गाजर, बटाटा, मटार, हरभरा, विविध कंद हेही या दिवसांत भरपूर मिळतात. आपल्या भोगीच्या भाजीत सर्व भाज्या एकत्र करून त्यांना फोडणी देऊन भोगीची भाजी बनते, तर गुजरातेत ‘उंधीयू’ करतात. दक्षिणेकडे ‘पोंगल’च्या सणातही तांदूळ आणि गुळाचा वापर होतोच.
संक्रांतीच्या अनुषंगाने मडक्यात दूध तापवायचे आणि त्यातले थोडेसे उतू जाऊ द्यायचे ही संकल्पनाही ऐकण्यात असेल. खाद्यपदार्थाच्या मुबलकतेचेच ते निदर्शक असावे. निसर्गाच्या या समृद्धीचा वापर चांगल्या तब्येतीसाठी व्हावा!
वैद्य राहुल सराफ – rahsaraf@gmail.com