केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात तब्बल ८७.३ दशलक्ष व्यक्ती स्थूल आहेत. त्यांच्यापैकी १२ दशलक्ष व्यक्ती गंभीररीत्या स्थूल आहेत.

भारतात स्थूलपणाचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) भारतीय नागरिकांना स्थूलपणाच्या धोक्याबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि याबाबत प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सांगितले आहे. याचीच दखल घेत राज्य सरकारने स्थूलपणाविषयाची जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘फाइट ओबेसिटी’  ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये स्थूलता हा मानसिक आजार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

सर्वसाधारणपणे आपल्याकडे ‘वजन वाढणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आपण जाड किंवा स्थूल झालो आहोत असा घेतला जातो. मात्र शरीरातील वजन नव्हे तर चरबी, जिला फॅट म्हटले जाते, ही कमी करण्याची गरज असते. आहार, व्यायाम आणि विश्राम योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केला तर शरीरातील नको असलेली चरबी कमी करणे सहज शक्य आहे. यासाठी इच्छाशक्ती आणि स्वता:च्या शरीराची काळजी असणे आवश्यक आहे.

आहार

शरीरातील स्थूलता कमी करण्यासाठी रोजच्या जेवणाच्या वेळा सांभाळा. सकाळी उठल्यानंतर साधारण ९ ते १०च्या दरम्यान भरपेट नाश्ता करावा. यामध्ये उकडलेले अंडे, पोहे, उपमा अगदी भाजी-पोळी असेल तरी चालेल. मात्र सकाळची न्याहरी निरोगी शरीरासाठी महत्त्वाची आहे. दुपारचे जेवण सुमारे १ ते २च्या दरम्यान घ्यावे. यामध्ये पालेभाजी, गव्हाची पोळी, वरण, भात, कोशिंबीर, ताक यांचा समावेश असावा. ज्यांना असा आहार घेणे शक्य नाही त्यांनी भाजी-पोळी खाल्ली तरी चालते. मात्र ती वेळेत खावी. दुपारचे जेवण झाल्यावर सायंकाळी चहासोबत बिस्किट किंवा इडली, पोहे असे पदार्थ खावेत. बदाम, काजू खाणे शक्य असल्यास तेही उत्तम. यानंतर रात्रीचा आहार मात्र कमीच घ्यावा. रात्रीच्या जेवणानंतर शरीराची फार हालचाल होत नाही, त्यामुळे अन्नाचे पचन होत नसल्याने रात्री हलका आहार घेणे केव्हाही चांगले. त्याचबरोबर दिवसभरात शक्य होईल तेव्हा एखादे फळ आवर्जून खावे. ऋतुमानानुसार आहारामध्ये बदल करावा. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातून पाणी बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या दिवसांत पाणी जास्त प्यावे. तर थंडीच्या दिवसात हवेत शुष्कता असते. त्यामुळे तूप किंवा तत्सम पदार्थाचा आहारात समावेश असावा.

काय टाळावे?

साखर, मीठ, मैदा या तीनही पदार्थाचे अतिसेवन शरीरास घातक आहे. रोजच्या रोज फास्ट फूडचे सेवन करू नये. केव्हा तरी बाहेरील वडापाव चालू शकतो मात्र रोजच्या रोज नाही. कोल्ड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे त्याऐवजी ताक, लिंबूपाणी प्यावे. रात्रीचे जेवण लवकर घ्यावे. जेवण झाल्यानंतर व्यायाम करू नये.

व्यायाम

शरीरातील फॅट कमी करण्याबरोबर शरीर सुदृढ, निरोगी आणि तणावमुक्त राहावे यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र आपल्याकडे शरीर बारीक होण्याच्या उद्देशाने व्यायाम केला जातो. त्यामुळे प्रथम व्यायाम करताना सकारात्मक भावना आणि आनंदी वातावरण असावे. सकाळी उठल्यावर किमान अर्धा तास चालावे. त्याशिवाय चालत असताना आपण व्यायाम करीत आहोत हे लक्षात ठेवा. गप्पा मारत, हळू चालल्याने व्यायाम होत नाही. चालण्याची गती हळूहळू वाढवली तर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. जलद गतीने चालणे आणि त्यानंतर धावणे हा प्रकार चरबी कमी करण्यासाठी उत्तम. व्यायाम सुरू केल्यानंतर साधारण २० मिनिटांनी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला सुरुवात होते. यानंतर शरीरात लवचीकता आणण्यासाठी स्ट्रेचिंग हा प्रकार शारीरिक आरोग्यासाठी हितावह आहे. हाताबरोबर कंबर, पोटातून वाकवून किमान ३० सेकंद शरीर स्ट्रेच करावे. मात्र हा प्रकार सुरू करण्यापूर्वी शरीराचे तापमान वाढविण्याची गरज आहे, यासाठी पाच ते दहा मनिटे चालणे किंवा शरीराची हालचाल करावी. या प्रक्रियेत व्यायाम करण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी केली जाते. कार्यालयात बराच वेळ खुर्चीवर बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी तासाभराने एखादा फेरफरका मारावा किंवा जागेवर उभे राहून हात, कंबर या भागात स्ट्रेचिंग करावे. यामुळे स्नायू मोकळे होतात. थंडीमध्ये व्यायाम करणे सोयीचे असते. या दिवसात शरीरातून कमी प्रमाणात घाम येत असल्यामुळे थकवा येत नाही आणि अधिक वेळ व्यायाम करण्यासाठी ऊर्जा राहते. त्याशिवाय व्यायाम झाल्यावर एका तासाच्या आत पौष्टिक आहार घ्यावा.

विश्राम

पौष्टिक आहार, योग्य व्यायाम याबरोबरच पुरेशी विश्रांती आरोग्यासाठी आवश्यक आहे. दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा रात्रभराच्या झोपेतून मिळते. त्यामुळे साधारणपणे आठ तासांची झोप गरजेची आहे. दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला आणि मेंदूला झोपेतून आराम मिळतो. कष्टाचे काम असणाऱ्या व्यक्तींना अधिक विश्रांतीची गरज असते. मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी नियमित ध्यान (मेडिटेशन) करणे फायद्याचे ठरते. श्वासावर लक्ष नियंत्रित करीत पाच ते २० मिनिटे सकाळी किंवा जेव्हा शक्य होईल तेव्हा ध्यान करावे. यामुळे कामातील उत्साह वाढतो आणि बुद्धीची वाढ होते.

(आजारी व्यक्तींनी लेखात दिलेल्या प्रकारांचा अवलंब करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

– शैलेश परुळेकर, व्यायाम प्रशिक्षक (शब्दांकन : मीनल गांगुर्डे)