|| डॉ. वैभव थोरात, नेत्रतज्ज्ञ

हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग झाले आहेत. तेव्हा त्याच्या अतिवापराचे दुष्परिणाम स्वाभाविकपणे आरोग्यावर दिसून येत आहेत. या साधनांचा डोळ्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत जाणून घेणार आहोत.

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठय़ा प्रमाणात तरुण वर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करत आहे. त्यामुळे तरुण वर्गामध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे होऊन डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो. डोळ्यांची आग होणे, थकवा जाणवणे, नजर कमी होणे आदी त्रासदायक लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. संगणकाच्या अतिवापराने अश्रुपटल कोरडे होण्यासोबतच एका विशिष्ट अंतरावर सातत्याने नजर केंद्रित केल्याने डोळ्यांमधील बाहुलीचे स्नायू थकतात. त्यामुळेदेखील वरील त्रास जाणवायला सुरुवात होते. संगणकाच्या वापरामुळे डोळ्यांना होणाऱ्या या त्रासाला कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम म्हणतात.

उपाय – दिवसांतून दोन-तीन तासांहून अधिक काळ संगणकासमोर बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी दर २०-३० मिनिटांनंतर चार-पाच मिनिटे डोळे बंद करून विश्रांती घ्यावी. हे शक्य नसल्यास कार्यालयाच्या खिडकीमधून लांबवर पाहावे. या काळात मोबाइल किंवा अन्य गॅझेटस पाहू नयेत. काम करत असताना जाणीवपूर्वक डोळ्यांची उघडझाप करावी. काम करण्याच्या ठिकाणी वातानुकूलित वातावरण असल्यास एसीचा झोत थेट चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी घ्यावी. एसीचा झोत चेहऱ्याकडे येत असल्यास त्याची दिशा बदलावी, जेणेकरून त्यामुळे डोळ्यांना अजून कोरडेपणा येणार नाही. या दैनंदिन सवयी बदलल्या तरी डोळ्यांचे आजार बऱ्यापैकी कमी होण्यास नक्कीच मदत होते. या बाबी अमलात आणूनही डोळ्यांना त्रास जाणवत असल्यास मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळे सातत्याने कोरडे पडत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉपचा वापर करण्यास हरकत नाही.

मोबाइल किंवा संगणकाची स्क्रीन आणि डोळे यांमध्ये अंतर ठेवून शक्यतो काम करावे. हे अंतर काही वेळाने बदलत राहावे, जेणेकरून डोळ्यांवर शक्य तितका कमी ताण येतो. मोबाइल किंवा संगणकाच्या स्क्रीनचा प्रकाश (ब्राइटनेस) डोळ्यांना त्रासदायक ठरणार नाही इतका कमी ठेवावा.

लहान मुले आणि मोबाइलचा वापर – मोबाइल आणि लहान मुले हे गणित आता न सुटणारे झाले आहे. अगदी दोन महिन्यांचे बाळही रडताना मोबाइल दाखवला की शांत होते, त्यामुळे मुलांना शांत करणे, जेवायला भरवणे आदी बाबींकरिता पालकही सर्रासपणे मोबाइलचा वापर करताना पाहायला मिळतात. मोबइलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणे, डोळे दुखणे, आग होणे ही लक्षणे सहज दिसून येत आहेत. मोबाइलचा अतिवापर लहान मुलांसाठी धोकादायकदेखील ठरू शकतो, हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. एककेंद्रीपणा, सामाजिक फोबिया, शारीरिक विकासात्मक वाढ खुंटणे आदी दुष्परिणाम होण्याचा अधिक संभव आहे, तसेच मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांना लहान वयातच चष्मा लागणे (मयोपिआ), डोळ्यांची दृष्टिक्षमता कमी होणे (अ‍ॅम्ब्लिओपिआ)आदी आजार आढळून येत असल्याचेही काही अभ्यास अहवालांमध्ये नमूद केले आहे. तेव्हा अधिक काळ मोबाइल, टीव्हीच्या स्क्रीनवर डोळे ताणून बसण्याखेरीज दिवसभरातील ठरावीक वेळीच या बाबी देणे आणि इतर वेळेस मैदानी खेळ, कला आदी बाबी करण्यास प्रोत्साहित करणे हाच यावर उपाय आहे. प्रत्येक लहान मुलाची वयाच्या तिसऱ्या वर्षी डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात डोळ्यांना होणारा संभावित धोका वेळीच लक्षात येऊन उपाय करणे शक्य असते.

स्क्रीनचा वापर करताना घ्यावयाची काळजी – अलीकडे मोठय़ा स्क्रीनच्या टीव्हींचे फॅड आले आहे; परंतु शहरातील लहान घरांमध्ये एवढा मोठा स्क्रीन लावून त्याच्या अगदी जवळच बसून टीव्ही पाहिला जातो. मोठय़ा स्क्रीनवर पाहताना डोळ्यांवर थेट प्रकाश पडत असल्याने डोळे आणि स्क्रीन यामध्ये किमान तीन मीटरचे अंतर असणे गरजेचे आहे. रात्री उशिरापर्यंत टीव्ही किंवा मोबाइल पाहण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती शक्यतो अंधार करूनच याचा वापर करत असतात. अंधार असल्याने स्क्रीनवर पाहताना डोळे अधिक ताठरले जातात आणि कोरडे पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अंधारात टीव्ही, मोबाइलचा वापर करू नये.