News Flash

राहा फिट : चरबी – आवश्यक आणि अनावश्यक

सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असे दोन प्रकार मानले जातात.

राहा फिट : चरबी – आवश्यक आणि अनावश्यक

 

डॉ. कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ

ओटीपोटात यकृत, स्वादुपिंड तसेच आतडय़ांच्या सभोवती असलेल्या मेदाच्या आवरणाला विस्करल फॅट म्हणतात. हे आवरण शरीरासाठी हानीकारक नसते. मात्र शरीरात अधिक प्रमाणात गेलेले मेद या स्तरावर जमा होतात. खाल्लेल्या अन्नातील पोषक द्रव्य रक्तामार्फत शरीरातील इतर अवयवांपर्यंत पोहोचतात आणि अतिरिक्त घटक चरबीच्या स्वरूपात अवयवांवर जमा होतात. व्यायामाचा अभाव आणि तेलयुक्त पदार्थाचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यामुळे या चरबीच्या प्रमाणात वाढ होते आणि व्यक्ती स्थूल होते. खाल्लेल्या अन्नाच्या उष्मांकाच्या तुलनेत शरीराची हालचाल झाली नसल्यामुळे स्थूलता वाढीस लागते. त्यातून हा चरबीचा थर वाढत जातो आणि वजनही वाढते.

चरबीचे प्रकार : सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असे दोन प्रकार मानले जातात. अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड शरीराला आवश्यक असल्याचे मानले जाते. महिलांमध्ये चरबीचे प्रमाण २२ ते २४ टक्के आणि पुरुषांमध्ये १४ ते १८ टक्के असते. महिलांमध्ये छाती, नितंब, मांडी या भागात चरबी साठून राहते. तर पुरुषांमध्ये विस्करल फॅटच्या स्तरावर ही चरबी जमा होते.

मेंदूचा ९० टक्के भाग चरबीने तयार झाला आहे. या मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी चांगल्या आणि उपयुक्त चरबीची आवश्यकता असते. शेंगदाणे, शेंगदाण्याचे तेल (प्रमाणात), अळशी, कारळे या पदार्थातून मिळणारी चरबी शरीरासाठी आवश्यक आहे. अनेक माशांमध्ये पोषक घटक असतात, त्यामुळे कमी तेलात तळलेले मासे उपयुक्त आहेत. ‘अ’, ‘ब’, ‘ई’, ‘के’ ही पोषक मूल्ये शरीराला आवश्यक असतात. त्यामुळे चरबीविरहित आहार घेताना ही पोषक मूल्य शरीराला पोहोचणे आवश्यक आहे. सॅच्युरेटेड मेदाच्या अतिसेवनाने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे उच्चरक्तदाब आणि हृदयविकार यांसारखे गंभीर विकार उद्भवतात.

ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड – या अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडमुळे हृदयविकार, मधुमेहापासून बचाव होतो, तणाव कमी होतो, सांधेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो. मासे, अळशी, सोयाबीन, भोपळ्याच्या बिया, अक्रोड हे पदार्थ फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा करतात.

ओमेगा सिक्स फॅटी अ‍ॅसिड – यांमुळे मेंदूचे कार्य सुधारते. सूर्यफुलाचे तेल, सोयाबीन तेल, अक्रोड, बदाम, तीळ यामधून ओमेगा सिक्स फॅटी अ‍ॅसिड मिळते.

मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड – रक्तातील कोलेस्टेरॉल सुधारते. दुग्धजन्य पदार्थातून मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड मिळते.

पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड – शरीरातील अनावश्यक कोलेस्टेरॉल कमी करते. मासे, मक्याचे तेल आणि सूर्यफुलाचा यात समावेश होतो.

चरबीचे फायदे – चरबीतून शरीराला ऊर्जा मिळते. १ ग्रॅम प्रथिने आणि कबरेदकांमधून ४ कॅलरी उष्मांक मिळतो तर १ ग्रॅम चरबीतून ९ कॅलरी उष्मांक एवढी ऊर्जा मिळते. चरबी नसेल तर अवयवांना धोका असतो. चरबी शरीरातील तापमान नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले ‘अ’, ‘ड’, ‘ई’, ‘के’ ही पोषक मूल्ये चरबीच्या रूपात अवयवांपर्यंत पोहोचतात. प्रतिकारशक्ती आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असलेले फॅटी अ‍ॅसिड चरबीतून मिळते.

अतिचरबीचा धोका – तेलावर प्रक्रिया करून बनविण्यात आलेले वनस्पती तूप शरीरासाठी हानिकारक आहे. एकाच तेलात अनेकदा तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळेही चरबी वाढते. हे बहुतांश वेळा ओटीपोटात जमा होतात. आहारात या पदार्थाचा समावेश वाढल्यामुळे शरीरात चरबी जमा होते. बेकरी पदार्थामध्येही वनस्पती तुपाचा वापर केला जातो. बर्गर, पिझ्झा, चीजयुक्त साठविलेल्या पदार्थामुळे चरबी वाढते. अनावश्यक चरबी वाढल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतो आणि हृदयाला धोका निर्माण होतो. ओटीपोटात चरबीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वेळ लागतो. चरबीयुक्त पदार्थाचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरातील अवयवांचे संरक्षण करणाऱ्या विस्करल फॅटचा स्तर वाढतो. यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 12:08 am

Web Title: fat essential and nonessential
Next Stories
1 दम्याचा त्रास
2 पंचकर्म : स्त्रीरोग आणि पंचकर्म
3 पिंपळपान : अडुळसा
Just Now!
X