19 November 2017

News Flash

भाज्या ऋषीपंचमीच्या..

एक आयुर्वेदिक वैद्य म्हणून विचार करताना या भाज्या का एकत्र केल्या ते लक्षात येते.

वैद्य अरुणा टिळक | Updated: August 24, 2017 1:22 AM

गणेशोत्सवात मिष्ठान्नांचे प्रमाण अधिक असले तरी गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येत असलेल्या ऋषीपंचमीची भाजी मात्र याला अपवाद असते. फळभाज्या व पालेभाज्या वेगवेगळ्या शिजवून नंतर एकत्र केल्या जातात. या भाजीची चव नेहमीपेक्षा वेगळी लागतेच, पण वेगवेगळ्या भाज्यांचे गुणधर्म एकत्र आल्याने ही आरोग्यासाठीही उत्तम ठरते.

ऋषीकुळाप्रती कृतज्ञता म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या ऋषीपंचमीच्या दिवशी बैलाच्या कष्टाचे, नांगराचा वापर केलेले अन्न वापरत नाहीत. या दिवशी ठरावीक पालेभाज्या, भेंडे, भोपळा अशा जमिनीवर उगवणाऱ्या भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी केली जाते. यात लाल भोपळा, भेंडी, पडवळ या फळभाज्यांचा तर अळू, लाल माठ, टोकेरी माठ या पालेभाज्यांचा वापर केला जातो. कोणी यात मटारचे किंवा मक्याचे दाणे, शिजवलेले शेंगदाणे घालतात. चवळी, आंबट चुका या पालेभाज्यासुद्धा वापरतात. मात्र यात पालक, मेथी, शेपू यांसारख्या उग्र चवीच्या भाज्या वापरू नयेत. ही भाजी चवीला सौम्य असते, या भाज्यांचा वापर केल्यास चव बिघडते.

एक आयुर्वेदिक वैद्य म्हणून विचार करताना या भाज्या का एकत्र केल्या ते लक्षात येते. आयुर्वेदात एक सुंदर श्लोक आहे, ‘वृद्धि: समानै: सर्वेषां’. म्हणजेच दोन समान गुण एकत्र आले की, त्या गुणाची वृद्धी होते. काही भाज्या एकत्र केल्यावर त्यांचे चांगले गुण वाढतात तर काही नको असलेल्या गोष्टी कमी होतात. जसे भोपळ्याची भाजी गोड (मधुर) असते. त्याच्या फोडणीत मेथी घातली की कफ वाढत नाही. गवारीच्या भाजीत ओवा घातल्यास हाच फायदा होतो. भोपळा गोड, जड, कफकारक, दाह रक्तविकारनाशक, तहान शमविणारा असतो. भोपळ्याच्या बिया पौष्टिक असतात.

भेंडी

ही उष्ण, आंबटग्राही, वायू व कफकारक, पौष्टिक, वीर्यवर्धक आणि रुची उत्पन्न करते. आतडय़ातील दोष, गॅस्ट्रिक अल्सर, पेप्टिक अल्सर यावर उत्तम औषध आहे. कोलायटिसवर उपयोगी आहे. कोवळे व ताजे भेंडे हे लघवीचे प्रमाण वाढवते. जुनाट आव, अंगावरून पांढरे जाणे किंवा पाळीच्या वेळी अथवा मधेमधे रक्तस्राव होणे यावर उपयोगी आहे.

मूत्रमार्गाच्या तक्रारी : ९० ग्रॅम भेंडी उभी चिरून अर्धा लीटर पाण्यात २० मिनिटे उकळावी. नंतर गाळून साखर घालावी. हा काढा प्यायल्यास लघवीची जळजळ कमी होते, तसेच अंगावरून पांढरे जात असेल, तरी याचा उपयोग होतो. खोकला, सर्दी यांमुळे घसा खवखवत असेल, तर याच काढय़ामुळे फायदा होतो.

वीर्यवृद्धी : रोज ५ ते १० ग्रॅम भेंडी मुळाची पूड दूध व साखर घालून घेतल्यास शुक्रजंतूंची वाढ होते.

त्वचादोष : नखुरडे, गळवे यावर भेंडीचे पोटिस उपयोगी. रोज रात्री भेंडीचा लेप चेहऱ्यावर लावल्यास कांती उजळ व मऊ  होते. भेंडीत प्रथिने, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, गंधक, सोडिअम, लोह, तांबे आणि ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्व असते.

खोकला, मंदाग्नि व वायूचा विकार असणाऱ्यांनी मात्र भेंडी खाणे टाळावे.

पडवळ

पटोल वर्गातील ही भाजी आहे. गोड, थंड, लघु, स्निग्ध, रूचीकर, पचनशक्ती वाढवणारी तसेच कफ, रक्तदोष, खोकला, ताप, कृमिनाशक, पोटात वायुगोळा उठणे यासाठी पथ्यकर आहे. हृदयासाठी पडवळ हे टॉनिक आहे. कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खातात. हृदयाच्या तक्रारी, छातीतील धडधड, छातीत दुखणे, इत्यादी तक्रारींवर पडवळाचा रस एक ते दोन चमचे दिवसांतून तीन वेळा घ्यावा. काविळीवर पानांचा काढा घ्यावा. त्यात धने घालावेत.

कृमिघ्न : आतडय़ातील जंत जाण्यासाठी पडवळाच्या बियांची पूड घ्यावी.

ज्वरघ्न : पित्तप्रकोपाने ताप आल्यास पडवळाचा काढा उपयोगी आहे. पोट साफ होऊन ताप उतरतो.

जून झालेल्या पडवळाची भाजी खाल्लय़ास किंवा औषधात वापरल्यास अपचन होण्याची शक्यता आहे.

अळू

भाजीच्या अळूचा देठ व पाने हिरवी असतात तर वडीच्या अळूचा देठ हा काळपट हिरवा तर पाने जाड व काळपट हिरव्या रंगाची असतात. अळू गोड, थंड, रुक्ष, जड व भूक वाढवणारा आहे. शुक्रवर्धक, मातेला दूधवर्धक, मल-मूत्र-कफ-वात वर्धक असतात. यकृताला सूज असल्यास अळूची भाजी देतात.

माठ

ग्रंथात माठाचे पाच प्रकार सांगितले आहेत. सामान्यत: लाल व पांढरा (टोकेरी) हे दोन प्रकार आढळतात. पांढरा गोड, खारट, रुक्ष, थंड, जड, कफ, वातवर्धक असून शौचास पातळ करतो. (मलबद्धतेत उपयोगी). शरीरात कुठूनही रक्तस्रव होत असेल तर माठामुळे आराम पडतो, त्यामुळे मूळव्याध, रक्ताची कमतरता असल्यास उपयोगी ठरतो.

लाल भोपळा

हा थंड मूत्रजनन आहे. त्याच्या सेवनाने रक्तवाहिन्या आंकुचित होतात. मधुमेहात भोपळ्याचा रस देतात. तो मधूर आणि पित्तशामक आहे. मूत्राघात, प्रमेय, मूत्रकृच्छ, लघवीला त्रास होणे, तहान यांवर गुणकारी आहे. (कच्चा भोपळा विषसमान समजला जातो. तेव्हा भाजीत कच्च्या भोपळ्याचा वापर करू नये.)

जी फळे, ज्या भाज्या निसर्गात दीर्घकाळ टिकतात, त्यांचे सेवन केले, तर आपले शरीर दीर्घकाळ चांगले राहते. चांगला परिपक्व  लाल भोपळा, कोहळा झाडावरून तोडला, तरी न फोडता वर्ष-दीड वर्ष टिकू शकतो. पालेभाजी मात्र एका दिवसात सुकून जाते. पाणी लागले, तर सडून जाते. म्हणूनच दररोज पालेभाजी सेवन करू नये.

वैद्य अरुणा टिळक

ही भाजी कशी करतात?

एक चमचा तुपात जिरे आणि एक मिरची उभी कापून फोडणी घालावी. यातील अर्धी फोडणी बाजूला ठेवावी व फोडणीत भेंडी परतवावी. उरलेल्या अध्र्या फोडणीत भोपळा व पडवळ क्रमाने शिजवून घ्यावी. लाल माठ व अळूही वेगळा शिजवून घ्यावा. सर्व भाज्या एका पातेल्यात अलगद ढवळून घ्याव्या. त्यावर अर्धे वाटी खोबरे टाकून शिजवावे व चवीपुरते मीठ घालावे. भाजी शिजत आल्यावर थोडा चिंचेचा कोळ घालावा. चिंचेऐवजी वाटीभर घट्ट ताकही चालते. अंबाडीची भाजी वापरल्यास चिंच, ताक घालू नये. यात शिराळी, दुधी, मक्याचे दाणे, शेंगदाणे, पिवळ्या मक्याची कणसे तुकडे करून घालता येतात.

aruna_tilak@yahoo.co.in

First Published on August 24, 2017 1:22 am

Web Title: ganesh chaturthi 2017 rishi panchami bhaji