18 November 2017

News Flash

बाल आरोग्य : गॅस्ट्रोचा संसर्ग

सचिन गेल्या आठवडय़ात सहलीला जाऊन आला आणि लगेच त्याला जुलाब सुरू झाले.

डॉ. अमोल अन्नदाते | Updated: May 18, 2017 12:15 AM

 

सचिन गेल्या आठवडय़ात सहलीला जाऊन आला आणि लगेच त्याला जुलाब सुरू झाले. पुढच्या दिवशी थोडय़ा उलटय़ाही झाल्या. पहिले दोन दिवस फारसे काही जाणवले नाही पण त्यानंतर तो खूप गळला आणि खाणे, पिणेही एकदम कमी झाले. सचिनची आई काळजीत विचारू लागली. ‘डॉक्टर गॅस्ट्रो, गॅस्ट्रो म्हणतात ते हेच का? रुग्णालयात दाखल करावे का त्याला?’ कुठलेही उपचार सुरू करण्यापूर्वी आजाराचे निदान आणि स्वरूप समजावून सांगणे खूप गरजेचे असते. सचिनला ताप येतो आहे का? जुलाब होतात तेव्हा कसे होतात आणि त्यात शेम पडते का- या प्रश्नांची उत्तरे माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. सचिनच्या आईने नेमके सांगितले, ‘हो ताप आहे आणि शेम ही पडते आणि थोडय़ा थोडय़ा वेळाने जुलाब होतात.’ यासोबत तो सहलीला जाऊन आल्याची महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे होते. हा गॅस्ट्रोच आहे पण तो बॅक्टिरियल (जिवाणूसंसर्ग) आहे की व्हायरल (विषाणूसंसर्ग) आहे हे ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरून हा बॅक्टिरियल असण्याची जास्त शक्यता आहे.

‘डॉक्टर लहानपणी सचिन एक-दीड वर्षांचा असताना त्याला जुलाब झालेले तुम्हाला आठवतात का? मला आठवतं, तेव्हा तुम्ही त्याचे दूध बंद करायला सांगितले होते.’ सचिनच्या आईच्या तल्लख स्मरणशक्तीचे मला कौतुक वाटले. हो, त्या वेळी तो व्हायरल गॅस्ट्रो होता. जेव्हा ताप, शेम, जास्त गळून जाणे आणि जुलाबात शेम असणे, कुठे बाहेर खाल्ले असण्याची शक्यता – अशी लक्षणे असतात तेव्हा हा बॅक्टिरियल गॅस्ट्रो असतो आणि त्याला प्रतिजैविकांची (अ‍ॅण्टिबायोटिक्स) गरज असते. शक्यतो पहिल्या दोन-तीन वर्षांत लहान मुलांना होणारा गॅस्ट्रो हा व्हायरल असतो. हे व्हायरल जुलाब म्हणजे पावसासारखे असतात. काही काळ चालतात आणि आपोआप बंद होतात. त्यांना प्रतिजैविकांची गरज नसते. सचिनच्या आईचा अजून एक प्रश्न अनुत्तरीत होता. ‘मग डॉक्टर मागच्या वेळसारखे याही वेळी दूध बंद करायचे का?’ खरे तर गॅस्ट्रोमध्ये दूध घेणे टाळावे पण या वेळी तशी काही सक्ती नाही. पहिल्या दोन वर्षांत लहान मुलांच्या आतडय़ांमधील दूध पचवणारी लॅक्टेज ही एन्झाइम जुलाबांमुळे वाहून जाते आणि मग दूध पचत नाही. न पचलेल्या दुधाचे यामुळे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर होते आणि शौचाची जागा लाल होते. म्हणून त्या वेळी तुम्हाला दूध बंद करायला सांगितले होते. हे प्रतिजैविक घ्या आणि त्यासोबत काही वेगळी औषधे लिहून देतो आहे. ती एखादा आठवडा चालू ठेवा. ‘डॉक्टर ही दुसरी औषधे कशासाठी?’ मी समजावून सांगितले याला प्रीबायोटिक, प्रोबायोटिक असे म्हणतात. थोडक्यात दही आणि ताकामध्ये जसे आपल्या पोटातील वातावरणात सहजीवनात राहणारे जीव असतात तसेच या औषधामध्येही असतात.

‘डॉक्टर, तुम्ही रुग्णालयात दाखल करण्याविषयी काही सांगितले नाही.’ त्याला दाखल करण्यापेक्षा घरीच एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकून वारंवार जितके पीत असेल तितके पाजा. हे देण्याआधी स्वत: एकदा त्याची चव चाखून बघा. साधारण याची चव आपल्या अश्रूंसारखी असली पाहिजे हे लक्षात ठेवा. हे यासाठी सांगतो आहे की एकदा मी हे सांगितले आणि माझ्या एका रुग्णाने नेमके याच्या उलटे म्हणजे चिमूटभर साखर आणि एक चमचा मीठ टाकून बनवले. तसे करू नका.

www.amolaannadate.com

First Published on May 18, 2017 12:15 am

Web Title: gastro infection in children