‘डॉक्टर म्हणजे देव’ ते ‘डॉक्टर म्हणजे पैसेकाढू’.. समाजाच्या हळूहळू बदलत गेलेल्या या धारणा. या प्रवासात डॉक्टर आणि रुग्ण (किंवा रुग्णाचे नातेवाईक) एकमेकांपासून दुरावले. इतर व्यवसायांप्रमाणे यातही व्यावसायिकता आली. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला भेटायला आलेले डॉक्टर नीट बोलत नाहीत, रुग्णाच्या तब्येतीबद्दल स्पष्ट काही संपत नाहीत, ही तक्रार या दुराव्याचाच एक भाग. हे अंतर दूर करून रुग्णाच्या सर्व शंकांचे समाधान करण्यास डॉक्टरांनीे पहिले पाऊल टाकायला हवे हे मान्यच, पण रुग्णाने किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनीही त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे.

थेट, वस्तुनिष्ठ प्रश्न हवेत

  • अनेकदा नातेवाईक आपापल्या वेळेप्रमाणे रुग्णाची जबाबदारी वाटून घेतात व त्यांच्यापैकी प्रत्येकाला डॉक्टरांना भेटायचे असते. डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी सविस्तर बोलायला हवे हे खरेच, पण प्रत्येक नातेवाईकाशी सविस्तर बोलणे शक्यही नाही. प्रत्येक व्यक्तीस रुग्णाचा सर्व इतिहास व त्याच्या उपचारांची दिशा हे सर्व समजावून सांगणे डॉक्टरसाठीही शक्य नाही. अशा वेळी नातेवाईक संवाद होत नसल्याबाबत नाराज राहतात. याला एक उपाय असू शकतो, की कुटुंबापैकी एका जबाबदार व्यक्तीने रुग्णाबाबत सूत्रधाराची भूमिका घेणे. इतर नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात ही व्यक्ती दुवा होऊ शकते. अतिदक्षता विभागातील किंवा इतरही रुग्णांची परिस्थिती काही वेळा गुंतागुंतीची असू शकते. विशेषत: अशा रुग्णांच्या बाबतीत अशी जबाबदार व्यक्ती आणि डॉक्टर एकमेकांशी चांगला संपर्क ठेवू शकतात आणि उपचारांबाबतच्या नातेवाईकांच्या शंका दूर होण्यास त्यामुळे मदत होते.
  • रुग्णाबद्दल डॉक्टरांना विचारण्यासाठीचे प्रश्न चक्क एका कागदावर लिहून घेऊन गेलेले बरे. खूपदा डॉक्टर रुग्णाला तपासून गेल्यानंतर काही तरी विचारायचे राहिलेच, हे रुग्ण वा नातेवाईकांना आठवते. हे साहजिक आहे, परंतु ते टाळण्यासाठी प्रश्न मनात आला की तो लिहून ठेवण्याचा फायदा होतो.
  • डॉक्टरांना विचारावेसे वाटणारे काही प्रश्न खूप भावनात्मक असतात, परंतु त्यातले काही मोघम असतात हे लक्षात घ्यायला हवे. उदा. ‘तसे काही घाबरण्यासारखे नाही ना?’- हा नेहमी डॉक्टरांना विचारला जाणारा प्रश्न. अशा मोघम प्रश्नांवर अनेकदा ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी दोन्ही उत्तरे देता येत नाहीत. यापेक्षा ‘रुग्णाच्या तब्येतीत किंवा अमुक एका शस्त्रक्रियेत काय गुंतागुंती होऊ शकतात’, ‘गुंतागुंती झाल्याच तर त्या दूर करण्यासाठी कोणते उपचार करतात’, ‘त्या उपचारांसाठीची यंत्रणा रुग्णालयात आहे का,’ अशा वस्तुनिष्ठ प्रश्नांमधून शंका दूर होण्याची शक्यता अधिक.
  • एखाद्या शस्त्रक्रियेचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार हे डॉक्टरांना विचारून घेणे गरजेचे. उदा. गुडघा वा मांडीच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपल्या हालचालींवर कोणत्या मर्यादा येणार हे जाणून घेणे गरजेचे. असेच इतर विविध शस्त्रक्रियांबाबतही सांगता येईल. शस्त्रक्रियेकडून आपली नेमकी अपेक्षा काय याविषयी डॉक्टरांशी बोलणे गरजेचे.
  • वैद्यकीय उपचारांमध्ये काही प्रमाणात जोखीम असते याची जाणीव रुग्णाच्या नातेवाईकांनीही ठेवायला हवी. प्रत्येक उपचारात काही ठरावीक गुंतागुंती वा दुष्परिणाम (‘(known complications & side effects) असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी प्रयत्न केल्यानंतरही रुग्णाचा मृत्यू झाल्यास प्रत्येक वेळी तो वैद्यकीय निष्काळजीपणा असतो असे नक्कीच नाही. अशा प्रसंगांमध्ये रुग्णालयाची तोडफोड वा डॉक्टरला मारहाण हा उपाय नक्कीच नव्हे. रुग्णावर झालेल्या उपचारांच्या बाबतीत तक्रार करण्यासाठी कायदेशीर मार्गही उपलब्ध असतोच.

डॉ. निखिल दातार, स्त्रीरोगतज्ज्ञ पेशंट सेफ्टी अलायन्सचे संस्थापक

drnikhil70@hotmail.com <mailto:drnikhil70@hotmail.com>

संवाद सुधारण्यासाठी..

* आता रुग्णालयांमध्ये रुग्ण व नातेवाईकांच्या समुपदेशनासाठी विशिष्ट वेळ ठेवलेला असतो. रुग्णालयात वा अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णाला त्याचा प्रमुख डॉक्टर रोज पाहून जातो. रुग्णाची प्रकृती गंभीर आहे का, प्रकृती सुधारणा आहे की उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, उपचारांची पुढची दिशा काय, रुग्ण शस्त्रक्रियेचा असेल तर शल्यचिकित्सक कधी भेटून जाणार, वगैरे गोष्टी या ‘राऊंड’च्या वेळी नातेवाईकांना समजावून सांगता येतात. एक मात्र आहे, की डॉक्टरांच्या ‘राऊंड’च्या वेळी जबाबदार नातेवाईकाने रुग्णाजवळ थांबायला हवे. जबाबदार याचा अर्थ असा, की ती व्यक्ती निर्णयक्षम हवी. रुग्णाचे दूरचे नातेवाईक रुग्णालयात मदतीसाठी आले असले तरी त्या कुटुंबात त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार असेलच असे नाही. रुग्णाचे आई-वडील, मुलगा-मुलगी अशा कुटुंबीयांमधील जवळच्या कुणीतरी थांबणे इष्ट.

* डॉक्टरांशी शक्यतो दूरध्वनीवर बोलू नये. प्रत्यक्ष भेटीत प्रश्नोत्तरे अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतात. प्रसंगी रुग्णालयाला विचारुन डॉक्टरचा रोजचा ‘राऊंड’ झाल्यानंतरही भेटीची भेटता येते. एखाद्या वैद्यकीय संज्ञेचा अर्थ कळला नाही तर संकोच वाटून न घेता लगेच विचारावे.

*  रुग्ण आणि रुग्णालय यातील बहुसंख्य तणाव बिलासंबंधीचे असतात. पण डॉक्टरकडे ‘बिलिंग’चे काम नसते हे लक्षात घ्यायला हवे. बिलाविषयीच्या शंका दूर करण्यासाठी तसेच वैद्यकीय विम्यासाठीही स्वतंत्र समन्वयक असतात. रुग्णालयांकडून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांनुसार दोन रुग्णालयांच्या बिलातही फरक येऊ शकतो. बिलात प्रत्येक गोष्टीचे शुल्क स्पष्ट लिहिले जाते. साधरणत: रुग्णालये वेळोवेळी रुग्णांच्या उपचारांसाठीचा खर्चाचा अंदाज व बिलाची त्या वेळची स्थिती याची माहिती देतात. पण रुग्णांच्या नातेवाईकांनीही त्याबाबत पाठपुरावा करायला हवा. वैद्यकीय विम्याविषयीच्या प्रश्नांबाबत विमा कंपनीकडूनही वेळीच शंकांचे निरसन करुन घेणे गरजेचे.

*  रुग्णाला आर्थिक चणचण असेल तर तेही डॉक्टरांना स्पष्ट सांगण्यास लाजू नये. अडचण कळली तर त्यावर काहीतरी मार्ग काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करता येतो.

डॉ. सुभाल दीक्षित

subhaldixit@yahoo.com <mailto:subhaldixit@yahoo.com>

अध्यक्ष, ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन’, पुणे शाखा