X

हरतालिका आणि ऋषिपंचमी

हरतालिका हा दिवस स्त्रियांचा, स्त्रियांसाठी समर्पित असलेला आणि स्त्रियांनी आपल्या परिवाराच्या वृद्धीसाठी केलेला.

|| वैद्य विक्रांत जाधव

हरतालिका हा दिवस स्त्रियांचा, स्त्रियांसाठी समर्पित असलेला आणि स्त्रियांनी आपल्या परिवाराच्या वृद्धीसाठी केलेला. प्रत्येक परिवारामध्ये स्त्रीचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे, हे शास्त्राने जाणून या दिवसाचे विशेष पथ्य रूढीमध्ये करून ऋतूप्रमाणे आरोग्यरक्षण केलेले दिसते. स्त्रियांची प्रतिकारक्षमता, बल व आरोग्य वाढवण्याच्या दृष्टीने. या दिवशी आवळाकंठी चूर्ण व तिळाच्या तेलाने अभ्यंग करायला सांगितले आहे. पावसाच्या गारव्यामुळे त्वचेतील रूक्षता, वात व निस्तेजता वाढलेली असताना या योगाने ती कमी करण्यासाठी आवळा, तीळ निवडलेले असावेत. आवळाकंठीच्या चूर्णामुळे शरीरातील मळ, चरबी यांचे शोधन होऊन त्वचेची कांती सुधारते. शरदातील उष्णता आणि थंडीतील वाताचा प्रभाव कमी करण्यासाठी अभ्यंगस्नानाच्या वेळी स्त्रियांनी दूध व हळद यांचे मिश्रण लावावे. जेणेकरून त्वचा तेजस्वी होऊन पुढे येणाऱ्या ऋतूंचा दुष्परिणाम सौंदर्यावर न होता उत्तम राहील. शहाळी दिसली की हरतालिका आली असेही म्हणता येईल. नारळाचे पाणी व ओला नारळ खाऊन हे व्रत केले जाते. नारळाचे पाणी तात्काळ शक्ती देणारे आणि ओला नारळ सांध्यांचे पोषण करून वात कमी करणारा. या काळापासून नारळाचा वापर स्त्रियांनी अधिकतम करून आरोग्य अबाधित ठेवावे. पावसाळ्यानंतर हरतालिकेपासून विविध सण-उत्सवांना सुरुवात होते. इथूनच गोड आणि विशेष पदार्थाचे सेवन होते. परंतु पावसाळ्याचे अपथ्य विसरू नये.

ऋषिपंचमी.. पथ्यकर दिवस

ऋषिपंचमी, गणेश उत्सवातील दुसरा दिवस. या दिवशी एक विशेष ‘फ्यूजन’ शास्त्राने त्या काळी केलेले दिसते ते आरोग्यासाठी. ती म्हणजे ऋषिपंचमीची ऋषीची भाजी. ऋषिपंचमी हे व्रत पूर्वी पुरुषही करायचे, परंतु आज केवळ स्त्रियाच करताना दिसून येतात. (अशी एक म्हण आहे की, ‘लग्नाअगोदर पुरुषांचे उपवास त्यांची आई करते आणि लग्नानंतर त्यांची पत्नी.’ कलियुगातली ही म्हण आधुनिक पुरुषाने रचलेली असावी!). ऋषिपंचमीच्या व्रतात कश्यप, अत्रि, भारद्वाज, प्रभृती अशा सात ऋषींची अरुंधतीसह पूजा करतात. हे व्रत करणाऱ्याने केवळ शाकभाज्या, भगर, वरीचे तांदूळ, कंदमुळे, फळे खाऊन राहावे असा नियम आहे. या दिवशी जमीन नांगरून केलेले, उत्पन्न होणारे कोणतेही पदार्थ न खाण्याचा दंडक आहे. आजच्या काळी परसामध्ये असलेल्या, तयार होणाऱ्या, केलेल्या भाज्या-फळे सेवन करण्याची प्रथा आहे. पावसाळ्याच्या मध्यानंतर येणारा हा दिवस! पावसाळ्यात भाज्यांची कमतरता, हवेतील वातावरणामुळे होणारा वातप्रकोप, वाढणारी रूक्षता, थकवा या पाश्र्वभूमीवर, या ऋषींच्या विशेष भाजीला महत्त्व प्राप्त होते. या ऋषींच्या भाजीमध्ये सात भाज्या एकत्रित केल्या जातात. मुख्यत: माठ, लाल मुळा किंवा पांढरा मुळा, मक्याचे कणीस, भेंडी, वाटाणे, अळू, कारली, सुरण, पावते, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरवी मिरची यापैकी सात भाज्या एकत्र करून तयार करतात. पुन्हा सगळ्या भाज्या हेतुत: खायला सुरुवात करण्यासाठी या व्रताचा आग्रह केला असावा. फळभाज्या खाण्याची सुरुवात या दिवसापासून करतात. ऋषिपंचमीची भाजी तयार करताना त्यात लोणी, ताक टाकले जाते आणि किंचित काळे मीठ टाकले जाते. ही भाजी शरीरातील वात कमी करणारी, शरीराला बल देणारी, पचायला अत्यंत हलकी, अग्नी प्रदीप्त करणारी ठरते. नांगरून केलेल्या धान्याने वात वाढून प्रकोपाच्या मध्यावर व्याधी निर्माण होऊ  नये हाही उद्देश धर्मशास्त्रकारांचा दिसून येतो. व्रतामध्ये खाल्ले जाणारे पदार्थ अभ्यासून एक ध्यानात येते की, शाकभाज्या व फळे हे गर्भाशयाची शुद्धी करून त्यांचे दोष दूर करणारे आहे आणि प्रतिकार क्षमताही वाढवणारे आहे. रक्तवृद्धी करणारे, रक्तातील दोष दूर करून गर्भाशय बलवान करणारे असून गर्भाशयस्थ वाताची विकृती दूर करणारे आहे. पूर्वी पुरुषसुद्धा हे व्रत करीत असत हे यातील ‘पथ्यकर’ पदार्थाचा शरीराच्या स्वास्थ्यरक्षणासाठी उपयोग व्हावा म्हणूनच!

vikrantayur@gmail.com

First Published on: September 11, 2018 1:31 am