News Flash

सतत डोकं दुखतंय.!

डोकेदुखीच्या प्राथमिक प्रकारात डोकेदुखी हे प्रमुख लक्षण असते.

डॉ. राहुल चकोर, मेंदूविकारतज्ज्ञ

डोकेदुखी हा आजार नसून आजारामागील कारण आहे. त्यामुळे वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असल्यास त्यावर एखादी गोळी घेऊन तात्पुरता उपाय शोधण्याऐवजी त्यामागील कारण किंवा आजार शोधून त्या दृष्टीने उपचार सुरू केलेले केव्हाही चांगले. डोकेदुखी हे किरकोळ लक्षण वाटत असले तरी वेळीच त्यावर उपचार  केला नाही तर डोकेदुखीची तीव्रता वाढू शकते. मात्र वेळीच उपचार घेतल्यास गंभीर आजाराची लागण टाळता येऊ  शकते.

रोजच्या जीवनात अनेकदा डोकेदुखीचा त्रास होत असतो. अगदी पोट रिकामे असणे, ताप, पित्त आदी कारणांमुळे दररोज आपण डोकेदुखीचा सामना करीत असतो. मात्र याव्यतिरिक्त अर्धशिशी, मेंदूत गाठ होणे आदी कारणांमुळेही डोकेदुखीची लागण होते.  डोकेदुखीचे प्राथमिक व दुय्यम किंवा सेकंडरी असे दोन भाग करण्यात आले आहेत. डोकेदुखीमागील नेमके कारण शोधण्यासाठी या दोन प्रकारांचा विचार केला जातो.

डोकेदुखीच्या प्राथमिक प्रकारात डोकेदुखी हे प्रमुख लक्षण असते. अनेकदा उलटय़ा, भोवळ आदी लक्षणेही दिसून येत असली तरी डोकेदुखी हे मुख्य कारण असते. डोकेदुखीच्या दुसऱ्या प्रकारात मेंदूसंदर्भातील आजारामुळे डोकेदुखी होत असते. यामध्ये मेंदूला सूज येणे, रक्तस्राव होणे यांसारख्या आजारांचा समावेश होतो. त्यामुळे रुग्ण डोकेदुखीचे कारण घेऊन रुग्णालयात आल्यास प्रथम डोकेदुखी कुठल्या प्रकारातील आहे, ते तपासले जाते आणि त्यानुसार उपचार दिले जातात.

प्राथमिक डोकेदुखीचे प्रकार

अर्धशिशी : या प्रकारात अर्धे डोके दुखते. अनेकदा या प्रकारात मळमळ होऊन उलटी होण्याची शक्यताही असते. काही तासांनी डोके दुखण्याची तीव्रता कमी होते. मेंदूतील रक्तप्रवाहात असमतोल होऊन हा रक्तप्रवाह मेंदूच्या काही भागात वाढतो आणि कमी होतो. यामुळे मेंदूत विशिष्ट संप्रेरकांचे स्रवण होते. या संप्रेरकांच्या असमतोलामुळे डोके एकाच बाजूस दुखू लागते. साधारण १५ ते १७ वर्षांपासून ते ६० वर्षे वयोगटात अर्धशिशी आजार दिसून येतो. काही रुग्णांना अर्धशिशीचे डोके दुखत असताना अशक्तपणा आल्यासारखे वाटते, तर काहींना त्या काळापुरता शरीराला अर्धागवायू होऊन हातपाय हलवणेही शक्य होत नाही. अर्थात डोके दुखणे थांबले की अर्धागवायूही जातो. काही व्यक्तींमध्ये ज्या बाजूचे डोके दुखते, त्या बाजूच्या डोळ्याची हालचाल तेवढय़ा वेळेपुरती पूर्णत: बंद होते. या प्रकारच्या अर्धागवायूचा त्रास कायम टिकणारा नसतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

तणावातून उद्भवलेली डोकेदुखी : सततच्या मानसिक तणावामुळे मेंदूवर परिणाम होऊन वारंवार डोके दुखण्याच्या समस्या भेडसावत असतात. तणावाखाली असल्याने अपुरी झोप, अवेळी खाणे यांसारखे प्रश्नही उद्भवतात. त्याचा एकत्रित परिणाम मानसिक आरोग्यावर होतो आणि वारंवार डोके दुखते. या प्रकारात संपूर्ण डोक्याचा भाग दुखतो. अधिकतर कपाळ व कानपट्टीचा भाग दुखतो. तणावातून उद्भवलेल्या डोकेदुखीचेही दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात तणावामुळे कालांतराने म्हणजे आठवडय़ातून एक किंवा दोन वेळा डोकेदुखी होते तर दुसऱ्या प्रकारात ही डोकेदुखी वारंवार होते. तिसऱ्या प्रकारात कपाळ, डोळ्याभोवती व डोक्याच्या समोरचा भाग दुखतो. याबरोबरच डोळ्यांतून पाणी येणे, डोळे लाल येणे, नाकातून पाणी येणे ही लक्षणेही दिसतात.

डोकेदुखी हा आजार नसून दुसऱ्या आजाराचे लक्षण आहे, असे आपण म्हणतो. हा नेमका कुठला आजार आहे हे डोकेदुखीच्या दुसऱ्या प्रकारात तपासले जाते. मेंदूत गाठ येणे, रक्ताच्या गुठळ्या तयार होणे, टय़ुमर, रक्तवाहिन्या आकुंचन पावणे, मेंदूत जंतुसंसर्ग, मेंदूत रक्तस्राव होणे ही कारणे डोकेदुखीच्या दुसऱ्या प्रकारात येतात. ही कारणे गंभीर असून यामध्ये रुग्णाच्या जिवाला धोका असतो. अनेकदा असह्य़ झालेली डोकेदुखी असलेला रुग्ण तपासणीसाठी आल्यास त्याची सीटीस्कॅन तपासणी केली जाते. जर प्रथमच गंभीर दुखणे असेल तर आजाराचे निदान करून उपचार सुरू केले जातात.

सेकंडरी किंवा दुय्यम डोकेदुखी

रक्तवाहिनीत गुठळी होणे, रक्तस्राव होणे किंवा रक्तदाब अचानक कमी होणे या कारणांमुळे मेंदूचा रक्तप्रवाह कमी होतो. अतिरक्तदाब हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. कडक झालेल्या रक्तवाहिन्या जास्त दाबामुळे फुटतात. धूम्रपान, लठ्ठपणा, मधुमेह यांमुळे  मेंदूच्या रक्तवाहिन्यांसंबंधित आजार उद्भवतात. या कारणांमुळे रक्तवाहिन्या फुटणे किंवा गुठळय़ा होण्याची शक्यता असते. मेंदूचा आघात टाळण्यासाठी या कारणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या प्रकारात अर्धागवायूचा झटका येण्याची शक्यता असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2017 2:22 am

Web Title: head pain issue headache
Next Stories
1 सूंठ : किती महत्त्वाची?
2 राहा फिट : कृत्रिम अन्नघटकांची आवश्यकता किती?
3 पिंपळपान : केळे
Just Now!
X