जून महिना म्हटलं की शाळा-कॉलेजेस आणि पाऊस अशी जोडी वर्षांनुवर्षे जमलेली. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात आकाशात ढगांची गर्दी सुरू होते. पावसाळी हवेचा एक खास अनुभव या काळात येतो. पाऊस पडायला सुरुवात झालेली नसते आणि ढगांमुळे हवा कुंद होते. हाच खरा तर ऋतुबदलाचा काळ. यानंतर पावसाची कधी रिमझिम तर कधी धो धो पडणारी संततधार सुरू होते. उन्हाळी काहिली कमी होते आणि मन हरखून जाते. पण अशा वेळी प्रकृतीकडे दुर्लक्ष झालं तर ते मात्र फार महागात पडतं. पावसाळय़ाची मजा लुटायची असेल तर ऋतुबदलापासूनच आपण आपली दिनचर्या हळूहळू बदलायला हवी.

पाऊस जसा आनंदी, उल्हसित मन घेऊन येतो, तसाच तो अनेक शारीरिक व्याधींनाही आपल्याबरोबर घेऊन येतो. या हवेत वाढणारे जीवाणू- विषाणू- कीटक- बुरशी यामुळे अनेक रोगांची साथ पसरते. यात प्रामुख्याने खालील रोगांचा प्रादुर्भाव होतो.

Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
Successful experiment of pistachio farming in Solapur
सोलापुरात पिस्ता शेतीचा यशस्वी प्रयोग!
climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…
What caused decline in production of cashew nuts in Konkan Unseasonal rains along with the impact of low rates
विश्लेषण : कोकणात ‘काजू बी’च्या उत्पादनात घट कशामुळे झाली? अवकाळी पावसाबरोबरच कमी दराचा फटका?
  • खोकला, सर्दी, घसादुखी.
  • वेगवेगळे ताप- मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉईड इ.
  • जुलाब किंवा आमांश.
  • आम्लपित्त, पोटफुगी, पोटदुखी.
  • मळमळ, उलटय़ा.
  • डोळय़ांमधील संसर्ग.

कारणे

  • पाण्याची पातळी (जलाशयांमधील) पावसामुळे ढवळून निघते. हे अस्वच्छ गढूळ पाणी पिण्यात आल्यास त्यामुळे उलटय़ा, जुलाब, मळमळ, आमांश असे रोग होतात. अनेकदा नळातून पिवळट पाणी येते. घराबाहेर पाणी पिताना अस्वच्छ जागी साठवणूक करण्यात येणारे पाणी प्यायल्यानेही असे त्रास होतात. खराब पाण्यात पोहताना पाणी तोंडातून जाऊन असे त्रास होतात.
  • काही वेळेस घराबाहेरचे अन्न खाण्यात आल्यानेही असे त्रास उद्भवतात. उघडय़ा अन्नावर माशा बसतात. या माशा इतर ठिकाणांहून संसर्गयुक्त पदार्थाचे वहन करीत असतात. त्यांच्या पायांना/पंखांना असे खराब पदार्थाचे कण चिकटतात व ते दुसऱ्या चांगल्या पदार्थाना दूषित करतात. हे पदार्थ आपच्या पोटात जाऊन विविध रोगांना आपण बळी पडतो.
  • भाज्या स्वच्छ पाण्यात धुऊन घेणं गरजेचं असतं. पावसाच्या पाण्यात/ चिखलात भिजलेल्या भाज्यांमध्ये संसर्ग निर्माण करणारे जंतू, कीटकांची अंडी, इ. असू शकतात. विशेषत: पालेभाज्या घेताना अनेकदा त्यात गांडूळसुद्धा सापडतात. फळांनासुद्धा हा मुद्दा लागू पडतो.
  • पावसात भिजल्याने कपडे ओलसर राहतात. अशा कपडय़ांतच एसीमध्ये किंवा पंख्याखाली बसल्यास गारवा बाधतो. श्वासातूनही थंड-ओलसर हवा आत जात असते. यामुळे सर्दी, शिंका, खोकला, घसादुखी असे त्रास उद्भवतात.
  • त्वचा सतत ओली राहिल्यास बुरशीचा संसर्ग होतो. पायातील ओले मोजे, ओले बूट यामुळे किंवा सतत पावसाच्या साचलेल्या पाण्यात काम करावे लागल्याने पायांच्या बोटांत चिखल्या होतात. नखेसुद्धा बुरशीच्या संसर्गाने खराब होतात.
  • पचनशक्ती कमकुवत झालेली असते. अशा वेळी तळलेले, तूपकट, गोड वा पचनास जड अन्नपदार्थाचे सेवन करण्यात आले तर पोट फुगते, पोटात दुखते, आम्लपित्ताचा त्रास होतो, मळमळते, पोटात गुडगुडते. याने डोकेही दुखते.
  • उघडय़ा जखमेने पाण्यात फिरल्यास लेप्टोस्पायरोयरोसिसचा संसर्ग होऊ शकतो. डासांमुळे मलेरिया-डेंग्यूसारखे ताप डोकं वर काढतात. दूषित पाण्यामुळे टायफॉईडला सामोरे जावे लागते. तसंच कावीळही होते.
  • ओल्या केसांमुळे डोक्यावरील त्वचेला बुरशीचा संसर्ग होतो, यामुळे केसात खपल्या धरतात. खाज येते व केस गळूही लागतात.

खबरदारी

  • पाणी उकळून, गाळून स्वच्छ करून प्यावे.
  • ऑफिसला जाताना मोजे/ कपडय़ांचा जास्तीचा जोड घेऊन जावा. ओल्या कपडय़ांत बसणे टाळावे. अंग व केस पुसण्यास एखादा नॅपकीनही बाळगावा.
  • शक्यतो चप्पल किंवा पूर्ण बंद असलेली सँडल घालावी.
  • पुरणपोळी, भजी, वडे, ब्रेड, बासुंदी अशा जड पदार्थाचे सेवन टाळावे किंवा माफक प्रमाणात असे पदार्थ घ्यावेत. दुधाची मिठाईसुद्धा जपून खावी.
  • तिखट पदार्थाना आलं, सूंठ, जिरं, मिरीपूड यांची जोड घ्यावी.
  • गोड पदार्थाना जायफळ, वेलची पूड (छोटी व बडी वेलची), लवंग अशा पदार्थाची जोड द्यावी.
  • रोज रात्री खालीलप्रमाणे काढा करून गरम गरमच घ्यावा. आले-काळी मिरी- दालचिनी-हळद पाण्यात उकळून काढा करावा. गाळून त्यात थोडा गूळ घालून प्यावे. यामुळे सर्दी-खोकला-अंगदुखी अशा तक्रारींना आळा बसतो. झाल्यास लवकर बरे वाटते.
  • जेवणानंतर रोज खालील सुपारी खावी.
  • बडीशेप-ओवा-काळे जिरे-ज्येष्ठमध-जायफळ पूड खाताना त्यामध्ये थोडे काळे मीठ घालून खावी. मीठ त्यात घालून ठेवू नये.
  • जेवणात सूप/ डाळीचे कढण/ भाताची पेज/ कोकम सार/ ताकाची कढी असे पातळ व गरम पदार्थ नेहमी समाविष्ट करावेत.
  • झिंकयुक्त (जस्त) आहार घ्यावा. लाल भोपळा, तीळ, खोबरे, शेंगदाणे इ. याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
  • जखम झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन इलाज करणं गरजेचं आहे.
  • कीटकनाशकांचा फवारा मारून घ्यावा. रोज लसूण व कांद्याची सालं घरात जाळून धूर करावा. याने डास कमी होतात.
  • शिळे/ उघडय़ावरील अन्न खाऊ नये. हलका आहार घ्यावा. उष्ण पदार्थ खावेत.
  • रुमालात ओव्याची पुरचुंडी बांधून नेहमी जवळ बाळगावी. सर्दी-खोकला-डोकेदुखी वाटू लागल्यास पुरचुंडी चुरून त्याचा सतत वास घेत राहावा. रात्री झोपताना सूंठ व वेखंड (१:४ प्रमाण) याचा लेप कपाळावर लावावा.
  • दोन दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा ताप, उलटय़ा व जुलाब अंगावर काढू नये. डॉक्टरांचा वेळेवर सल्ला घ्यावा.
  • कावीळ, टायफॉइड, एन्फ्लूएंझा अशा रोगांसाठी प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजेप्रमाणे लसीकरण करून घ्यावे. वयोवृद्ध, क्षीण व्यक्ती यांनी विशेषत्वाने याचा विचार करावा.
  • पावसाळय़ात उपवासाचे दिवस अधिक प्रमाणात असतात. उपवासाच्या दिवशी पदार्थामध्ये शेंगदाण्याचा मुबलक प्रमाणात वापर केला जातो. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना यामुळे अ‍ॅसिडिटी व अपचनाचे त्रास उद्भवण्याचा संभव असतो. तेव्हा हे पदार्थ जपून खावेत. त्याऐवजी फळांचा किंवा सुका मेव्याचा आहारात समावेश करावा (काजूचं प्रमाण कमी असावं.)

dr.sanjeevani@gmail.com