19 December 2018

News Flash

पिंपळपान : गुणकारी कोरफड

कोरफडीच्या मुळाजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

गुणकारी कोरफड

कुमारी भेदनी तिक्ता शीता नेत्र्या रसायनी। मधुरा बृंहणी बल्या वृष्या वातविषप्रणुत्।।

गुल्मप्लीहायकृदबुद्धिकफज्वरहरी हरेत्। ग्रंन्ययााग्निदग्धविस्फोटपित्तरक्तत्वगामयान्।।

कोरफड बृहत्त्रयी या प्राचीन ग्रंथात वर्णिलेली नाही. शाङ्र्गधर संहितेत नोंद सापडते. आफ्रिकेच्या वारवंटी भागातून तिचा आयात झाली असावी. कोरफड मूळची पूर्व व दक्षिण आफ्रिकेमधील आहे. सोळाव्या शतकाच्या सुमारास ती समुद्रामार्गे वेस्ट इंडिज, भारत, चीन या देशात पोहोचली. सध्या वेस्ट इंडिज, दक्षिण अमेरिका व आफ्रिका येथे कोरफडीची व्यापारी तत्त्वावर लागवड होते. कोरफडीच्या एकूण २७५ जाती आहेत. त्यापैकी तीन जाती व त्यांचे संकरित वाण महत्त्वाचे आहे. १) अ‍ॅलो बारबाडेनसीस ही मूळची वेस्ट इंडिजमधील उत्तर आफ्रिकेतील जात आहे. २) अ‍ॅलोफेरॉस व त्यापासून मिळालेले संकरित ही जात मूळची दक्षिण आफ्रिकेतील आहे. ३) अ‍ॅलोपेरी ही जात मूळची सोकोट्राइन बेटावरची पण फारशी नावाजलेली नाही. भारतात व ईस्ट इंडिजमधून तसेच आफ्रिकेमधून कोरफडीच्या अनेक जाती आल्या. महाराष्ट्राचा किनारा, गुजरात व दक्षिण भारतातील जंगलात कोरफड नैसर्गिकरीत्या आढळते. आता मात्र भारतात सर्वत्र तिची व्यापारी तत्त्वावर लागवड करतात. कोरफड सर्वत्र विशेषत: रेताड जमीन, समुद्रकिनारा, उष्ण हवामााच्या प्रदेशात चांगली उगवते. कोरफड, कुमारी, कुंवर, अ‍ॅलोव्हेरा अशा विविध नावाने ओळखली जाते. तिची गणना रसोनादिकुल, गुडुच्यादिवर्ग व पलांडून वर्गात केली जाते. याचे मूळ लहान व मांसल असते. ही बहुवर्षांयू आहे.

सर्वत्र उगवणारी, भाल्याच्या आकारचे मांसल पान, तीस ते साठ सेंटीमीटर लांब व हिरव्या रंगाचे आणि चक्राकार असते. पानाच्या कडा काटेरी असतात. मूळ रुंद असून जमिनीत खोलवर जात नाही. मुळाला चार ते पाच अधिक फाटे फुटून कोरफडीची नवीन पिल्ले तयार होतात. हिवाळ्याच्या शेवटी कोरफडीला फुले येतात. ती लहान व लाल-पिवळसर रंगाची असतात. फुलांपासून क्वचितच बिया मिळतात. कोरफडीला चार सेंटीमीटर लांबीची फळे येतात. पुष्ट कोरफडीचा पिवळसर किंवा पांढरट गैर असतो. तो गुळचट किंवा कडू अशा दोन्ही चवींचा असतो. कोरफड सर्व प्रकारच्या हवामानात व कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगली येते. जमिनीलगत येणाऱ्या नव्या फांद्या अथवा मुळावरील कोंब असून नवीन लागवडीत करतात. साधारणपणे लागवडीचा कालावधी मार्च ते जून असतो. पावसाळा सोडून ४ ते ५ पाण्याच्या पाळ्या वर्षभर द्यावा लागतात.

कोरफडीच्या मुळाजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी लागते. १२ ते १४ महिन्यांनंतर झाडाची पाने औषधासाठी वापरता येतात. लागवडीपासून दुसऱ्या महिन्यांपासून उत्पन्न मिळू शकते. ते पाच वर्षांपर्यंत चालते. नंतर मात्र पुनर्लागवड करावी लागते. साधारणपणे १० ते १२ हजार किलो प्रति हेक्टरी एवढी ताजी पाने असू शकतात.

कोरफड रेताड जमिनीत अधिक चांगली फोफावते. माती खूप खोल असण्याची गरज नाही. कारण मूळ फार खोलवर जात नाही. मुळांना खूप पाणी लागत नाही. पाने हवेतील ओलावा शोषून घेतात आणि वाढतात. कोरफड बंदिस्त जागेत टांगली तर रंग फिकट होतो. त्याला धुमारेपण फुटतात. तीन सेंटिमीटर अंतरावर ती लावावी. तीव्र उन्हाळ्यात पाण्याअभावी कोरफड सुकेल पण कधीच मरत नाही. थोडासा ओलावा, पाण्याचा शिडकावा मिळाल्याबरोबर कोरफडीला नवीन जीवन मिळते. ती तरारून वाढते. मुळाशी शेणखत, मलमूत्र, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस मिसळल्यास कोरफडीचे भरघोस उत्पन्न होते. कोरफडीला फार पाणी लागत नसल्याने तिला ‘वॉटरशाय’ असेही नाव आहे.

कोरफडीत एलोइन आणि बाबरेलाइन नावाचे स्फटिकीय ग्लुकोसाईड, एसोडिन, राळ, उडनशील तेल व काही प्रमाणात गॅलिक अ‍ॅसिड आहे. तडीचा गर चवीने कडू असून गुणाने थंड, भूक वाढविणारा, पाचक, रेचक, बल्यजनक रक्तस्तंभक, सूज कमी करणारा, जखम भरून आणणारा आहे. यकृत अन्ननलिकेचे कार्य कोरफडीच्या गराने सुधारते. मोठय़ा मात्रेने दिल्यास गाळ साफ होतो, कृमिनाश होतो. कोरफडीस घृतकुमारी, गृहकन्या, कुमारी अशी विविध नावे आहेत. घृतकुमारी तुपासारखे बुळबुळीत चिकट पान असलेली वनस्पती.

कोरफडीचा गर गुळचट चवीचा असतो. साल किंचित कडू असते. फडीची पात कापून त्याचा वापर केला जातो. मुळे काढली जात नाहीत. ती गुणाची व शरीरावर तिचा मधुर विपाक होतो. ती गुरू स्निग्ध, पिच्छिल असतात. कोरफड गर शरीरात पृथ्वी, जल तत्त्वाचे पोषण करतो. प्लिहा व आर्तववह स्रोतावर त्याचे विशेष कार्य आहे. वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांवर कार्य करते. ती मलमूत्र विरेचनीय आहे. ती केस आणि त्वचा विकारामध्ये खूप उपयोगी पडते. तिचा गर झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्यास तारुण्यपीटिका, मुरुम हे आठ-पंधरा दिवसांत नाहीसे होतात.

केसांसाठी कोरफड खूप उपयुक्त आहे.  कोरफडीचा गर केसांना लावल्यास केसांची वाढ होते. केसांतील कोंडा नाहीसा होतो.

गेली जवळपास चार तप मी रुग्णमित्रांकरिता विविध रोगांवर अनेकानेक वनस्पतींचा वापर सत्वर सुचवत असतो. जवळपास वीस वर्षे मी महर्षि अण्णासाहेब पटवर्धन पंचकर्म रुग्णालय चालविले. त्या काळात काविळ, जलोदर, यकृत व प्लिहेची सूज, विटाळ कमी येणे किंवा अजिबात न येणे आदी तक्रारींकरिता मोठय़ा संख्येने रुग्ण प्रवेशित होत. त्यांना मी सकाळी काहीही खाण्यापूर्वी कोरफडीच्या एका पानाचा गर खावयास देत असे. त्यामुळे लगेच त्यांच्या लघवीचा पिवळा व लाल रंग बदलून; यकृत व प्लिहेचे काम सुधारत असे. कोरफडीच्या गरापासून केलेले कुमारीसव खोकला, कफ, दमा या विकारांवर तसेच स्त्रियांच्या विटाळसंबंधित समस्येकरिता सत्वर गुण देते. काही कारणाने त्वचा भाजल्यास कोरफडीचा गर सत्वर त्या जागी लावावा. चोवीस तासांत गुण येतो. नेत्रविकारात काही काळ कोरफडीचा ताजा गर खाल्ल्यास निश्चयाने फायदा होतो. हरी परशुराम औषधालयाचा खोकला काढा हट्टी खोकल्यापासून तात्काळ गुण देतो, हे सांगावयास नकोच. लहान बालक अंगावरचे दूध पीत असेल तर स्तनाला काळ्या बोळाचा लेप लावण्याचा प्रघात आहे.

कोरफडीच्या गरापासून तयार केलेला काळा बोळ हा पारदशुद्धीकरिता उपयुक्त आहे. आयुर्वेदीय पद्धतीने धातूंची भस्मे किंवा मारणक्रिया निर्दोष व्हावी म्हणून कोरफडीच्या गरात अमृतीकरण हा संस्कार करावयास सांगितला आहे. कुंडलिनी जागृती किंवा अखंड जपसाधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून साधनेच्या सुरुवातीला रोज सकाळी पन्नास ग्रॅम कोरफडीचा गर, साखर, तूप, मध व दूध प्रत्येकी दहा ग्रॅम असे एकत्र मिश्रण प्राशन करण्याचा अनुभविक पाठ आहे.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on November 2, 2017 1:53 am

Web Title: health benefits of aloe vera